Breaking News
कापड निर्यातीला 43 हजार कोटींचा तोटा; निर्यातदार चिंतेत
मुंबई : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी बुधवारी भारतावर 25 टक्के अतिरिक्त टॅरिफ लावण्याच्या आदेशावर स्वाक्षरी केली. त्यामुळे भारतामध्ये अमेरिकेत निर्यात होणाऱ्या वस्तूंवरील एकूण टॅरिफ आता 50 टक्क्यांवर पोहोचला आहे. टॅरिफमध्ये वाढ झाल्याने भारतीय निर्यातदारांना त्याचा मोठा फटका बसला आहे. भारतीय वस्तूंच्या किमती 30 ते 35 टक्के वाढणार असल्याने देशातील प्रमुख निर्यातदार कंपन्या चिंतेत आहेत. या टॅरिफ बॉम्बचा तब्बल 43 हजार कोटींचा फटका एकट्या कपडा उद्योगाला बसण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
ट्रम्प यांच्या टॅरिफ बॉम्बनंतर अमेरिकेतील कंपन्या भारतीय वस्तूंच्या आयातीबाबत काय निर्णय घेणार याकडे सर्वांची लक्ष लागले होते. सूत्रांच्या माहितीनुसार भारतीय निर्यातदारांना अमेरिकन खरेदीदारांनी पत्रे व ई-मेल पाठवले आहेत. ज्यामध्ये त्यांनी पुढील सूचना मिळेपर्यंत शिपमेंट थांबवण्याची विनंती केली आहे. भारत अमेरिकेला लागणाऱ्या एकूण औषधांपैकी निम्मी जेनेरिक औषधे पुरवतो. या करामुळे औषधांच्या किमती वाढतील. मसाले, कपडे आणि चपलांच्या किमती 40 टक्क्यांनी वाढतील. अमेरिकन कंपन्यांची इच्छा आहे की टॅरिफमुळे वाढलेल्या खर्चाचा भार भारतीय निर्यातदारांनी उचलावा. वेल्सपन लिव्हिंग, गोकलदास एक्सपोर्ट्स, इंडो काउंट व ट्रायडेंटसारख्या भारतातील मोठ्या निर्यातदार कंपन्या त्यांची 40 ते 70 टक्के निर्यात एकट्या अमेरिकेत करतात. त्यामुळे भारतातील प्रमुख निर्यातदार कंपन्या चिंतेत आहेत.
जगात केवळ ब्राझीलवर अमेरिकेने जास्त कर लादलेला आहे. भारत रशियाकडून तेल विकत घेत असल्याचा ठपका ठेवत जोपर्यंत भारत हे बंद करणार नाही तोपर्यंत आपण टॅरिफ आकारत राहू असं म्हटलं आहे. या निर्णयाचा भारतीय कापड उद्योगावर सर्वात जास्त गंभीर परिणाम होण्याची शक्यता आहे. यामुळे एकूण खर्चात 30 ते 35 टक्के वाढ होईल. तसेच अमेरिकेतून येणाऱ्या ऑर्डर्समध्ये 40 ते 50 टक्के घट होईल. तज्ज्ञांच्या मते यामुळे 4 ते पाच अब्ज डॉलर्सचं म्हणजेच 35 ते 43 हजार कोटी रुपयांचे नुकसान होऊ शकते.
अमेरिकेने जपान, युरोपीय संघ, दक्षिण कोरिया 15 टक्के, लाओस, म्यानमार 40 टक्के, पाकिस्तान 19 टक्के, श्रीलंका 20 टक्के, ब्रिटन 10 टक्के, तैवान, व्हिएतनाम, बांगलादेश 20 टक्के तर सुरुवातीला भारतावर 25 टक्के आयात शुल्क लावले होते. ट्रम्प यांनी भारतावरही 25 टक्के टॅरिफ लादण्याची घोषणा केल्यानंतर आठवड्याभरातच 25 टक्क्यांची आणखी वाढ केल्यामुळे भारतावरील एकूण आयातशुल्क 50 टक्क्यांवर पोहोचले आहे. ब्राझीलनंतर सर्वात आयात शुल्क देणारा भारत हा दुसरा देश ठरला आहे. ब्राझीलने अमेेरिकेच्या या निर्णयाचा कठोर विरोध केला असून भारताने मात्र याबाबत सावध भुमिका घेतली आहे. ट्रम्प यांनी टॅरिफ वाढवताच मोदी सरकारने अमेरिकेसोबत झालेल्या 3.6 अब्ज डॉलर्सच्या कराराला स्थगिती दिली आहे.
अमेरिकेचा हा निर्णय अत्यंत दुर्दैवी, अवास्तव आणि अन्यायकारक असल्याची टिप्पणी भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल यांनी एक्सवर (ट्विटर) केली आहे. जयस्वाल म्हणाले, ट्रम्प यांची ही कृती अन्यायकारक व अवास्तव आहे. भारत आपल्या राष्ट्रीय हितांचे रक्षण करण्यासाठी आवश्यक सर्व पावलं उचलेल. दरम्यान, त्यानंतर भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्रम्प यांच्या अरेरावीला संयमी उत्तर दिलं आहे. मोदी म्हणाले, भारत आपल्या शेतकऱ्यांच्या, पशूपालकांच्या, मच्छिमारांच्या हिंतांबाबत कुठल्याही प्रकारची तडजोड करणार नाही. मोदी यांची ही टिप्पणी थेट वॉशिंग्टनसाठी संदेश असल्याचे मानले जात आहे.
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai