गणेश नाईकांचा जनता दरबार उच्च न्यायालयाच्या दरबारात
- by Aajchi Navi Mumbai
- Sep 19, 2025
- 115
किशोर पाटकर यांची उच्च न्यायालयात जनहित याचिका
नवी मुंबई : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि वनमंत्री गणेश नाईक यांच्यातील वाद शिगेला पोहचला असून आता नाईकांच्या जनता दरबारालाच शिंदेसेनेने न्यायालयाच्या दरबारात ओढले आहे. आ.गणेश नाईक नवी मुंबईत जनता दरबार घेऊन संपूर्ण प्रशासकीय यंत्रणेला संपूर्ण दिवस वेठीस धरत असल्याचा आरोप करुन शिंदेसेनेचे जिल्हाप्रमुख किशोर पाटकर यांनी मुंबई उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली आहे. मात्र जनता दरबार घेण्यास कोणी कितीही विरोध केला तरी जनता दरबार थांबणार नाही अशी प्रतिक्रिया नाईक यांनी गुरुवारी झालेल्या जनता दरबारात दिली.
राज्यात सत्ताबदल झाल्यानंतर गणेश नाईक मंत्रिमंडळात वर्णी लागल्यापासून शिंदे आणि नाईक यांच्यातील सत्तासंघर्षाला अधिकच धार चढली आहे. शिंदे यांचे वर्चस्व कमी करण्यासाठी गणेश नाईक यांना फडणवीस यांनी फुस लावल्याचे बोलले जाते. एरवी नाईक हे मध्यम मार्ग चोखळणारे असल्याने त्यांच्या या नव्या भुमिकेबाबत आश्चर्य व्यक्त केले जात आहे. शिंदे यांच्या कोपरी-पाचपाखाडी मतदारसंघातील भेटीदरम्यान नाईक यांनी ठाण्यात यापुढे कमळ फुलेल असे वक्तव्य करत शिंदे यांना डिवचले होते. त्यानंतर ठाण्यात जनता दरबार घेत नाईक यांनी आक्रमक भूमिका घेतली. मंत्री पदाच्या कालावधीत नाईकांनी नवी मुंबईत पुन्हा एकदा जनता दरबार सुरू केला आहे. वाशी येथील विष्णुदास भावे नाट्यगृह येथे वेगवेगळ्या शासकीय प्राधिकरणातील अधिकाऱ्यांना बोलावून 11 तास त्यांना ताटकळत ठेवून लोकांचे प्रश्न मार्गी लावण्याचा प्रयत्न या दरबाराच्या माध्यमातून केला जातो. या दरबारामुळे शासकीय अधिकाऱ्यांचा महत्वाचा कामकाजाचा वेळ वाया जातो तसेच वेळप्रसंगी या दरबारात अधिकाऱ्यांचा पाणउताराही केला जात असल्याचा आरोप विरोधकांचा आहे. पाटकर यांच्या या जनहित याचिकेने महायुतीत पुन्हा एकदा मिठाचा खडा पडला आहे. जनता दरबार बेकायदा आणि नियमांना धरून नसल्याने थांबविला जावा अशी मागणी त्यांनी याचिकेतून केली आहे.
मंत्री हा एका प्रदेशाचा नव्हे तर संपूर्ण राज्याचा असतो. मंत्र्याला जर एखाद्या प्रदेशात किंवा परिसरात लोकांची गाऱ्हाणी ऐकायची असतील तर त्याठिकाणी जाण्याचा त्याला पूर्ण अधिकार आहे. जनतेच्या समस्या सोडविणे लोकप्रतिनिधीचे कर्तव्य आहे. कोणी अशाप्रकारची याचिका दाखल केली असेल तर माझी हरकत नाही. पण कोणी कितीही विरोध केला तरी आपला जनता दरबार थांबणार नाही. - आ. गणेश नाईक, वनमंत्री
- याचिका कशाच्या आधारे?
एकनाथ शिंदे यांचे निकटवर्तीय मानले जाणारे बेलापूर विधानसभा मतदारसंघातील पक्षाचे जिल्हाप्रमुख किशोर पाटकर यांनी गुरुवारी उच्च न्यायालयात याचिका दाखल करत नाईक यांचा जनता दरबार बेकायदा आणि नियमांना धरून नसल्याने थांबविला जावा अशी मागणी केली. गणेश नाईक हे पालघर जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत. त्यामुळे त्या जिल्ह्यात त्यांनी जनता दरबार घ्यावेत. नवी मुंबईसारख्या शहरात नाईक घेत असलेल्या दरबारांमध्ये शासकीय अधिकाऱ्यांना उपस्थित रहावे लागते. त्यामुळे विविध विभागातील वरिष्ठ अधिकारी संपूर्ण दिवसभर या दरबारात अडकून पडतात. नागरिकांची गैरसोय होते, असा मुद्दा या याचिकेत मांडण्यात आला. तसेच अशा दरबारातून नगरविकास, उद्योग, महसूल अशा विभागातील अधिकाऱ्यांना आदेश देण्याचा कायदेशीर अधिकार नाईक यांना नाही, असा मुद्दाही पाटकर यांच्या याचिकेत उपस्थित करण्यात आला आहे.
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai