करंजा बंदर ‘गाळात’
- by Aajchi Navi Mumbai
- Dec 13, 2025
- 57
गाळ काढण्यासाठी 100 कोटींच्या निधीची मागणी
नवी मुंबई : करंजा बंदरात गाळाच्या समस्येमुळे बोटी अडकल्या जात असल्याने मच्छीमारांच्या उपजीविकेवर थेट परिणाम होत आहे. गाळाच्या समस्येमुळे हजारो मच्छीमार बोटींना ओहोटीच्या वेळी बंदरात मासळी उतरविण्यासाठी येणाऱ्या आणि बंदरातून मासळी उतरवून बाहेर जाण्यासाठी बंदरात बाहेरच चार-चार तास समुद्रातच वाट पाहावी लागते. या समस्येवर उपाययोजना करण्यासाठी मासेमारी संघटनांनी एकत्र येत सरकारकडे मदतीसाठी साकडे घातले आहे. गाळ काढण्यासाठी 100 कोटींच्या निधीची मागणी केली आहे.
सुमारे 13 वर्षांच्या दीर्घ प्रतीक्षेनंतर सात- आठ महिन्यांपूर्वी 256 कोटी रुपये खर्चून उभारण्यात आलेले करंजा मच्छीमार बंदर अखेर कार्यान्वित झाले आहे. त्यामुळे या करंजा मच्छीमार बंदरातून आता सुमारे 500 कोटींची मासळी निर्यात होऊ लागली आहे. बंदराची उंची कमी असल्याने मच्छीमार बोटी क्षतीग्रस्त होण्याच्या प्रमाणात वाढ झाली आहे. करंजा मच्छीमार बंदरासाठी 149 कोटी खर्च करून फक्त प्लॅटफॉर्म तयार करण्यात आले आहेत. छपराचे काम येथील मच्छीमार सोसायटी आणि मच्छीमारांनी स्वखर्चाने केले. त्यामध्ये आता नव्याने बंदरात मोठ्या प्रमाणावर साचत चाललेल्या गाळाची समस्येत भर पडली आहे. समुद्रात मोठी ओहोटी निर्माण झाल्याने जवळपास 250 ते 300 मासेमारी बोटी बंदरातच गाळात अडकून पडत आहेत. खाडीतील गाळामुळे बोटी समुद्रात मासेमारीसाठी जाऊ शकत नसल्याने हजारो मच्छीमारांच्या उपजीविकेवर थेट परिणाम झाला. या गाळामुळे बोटींना किनाऱ्याजवळ आणणे, तसेच समुद्रात घेऊन जाणे अत्यंत कठीण झाले. मासेमारबांधवांना बोटी काढण्यासाठी दिवस-रात्र मेहनत करावी लागली. बंदराची उंची, उर्वरित विकासासाठी आणि गाळ काढण्यासाठी गेल्या सात वर्षांपासून राज्य सरकारकडे 183 कोटींचा प्रस्ताव प्रलंबित आहे; मात्र त्याला आतापर्यंत प्रशासकीय मंजुरी मिळालेली नाही. या बंदरातील गाळाच्या समस्येमुळे मच्छीमार हवालदिल झाले आहेत. आता करंजा मच्छीमार बंदरात मच्छीमार बोटी रुतू लागल्याने मच्छीमारांमध्ये संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन मुंबई बंदर विभागाने करंजा बंदर धक्क्याची पाहणी केली. साचलेल्या गाळाची खोली आणि त्याचे प्रमाण तपासण्यात आले. बंदरातील समस्यांबाबत संबंधित विभागाचे अधिकारी राजेश अग्रवाल यांनी पाहणी केली आहे. मात्र त्यानंतरही कोणतीही कार्यवाही झालेली नाही. यामुळे बंदरातील गैरसोयी जशाच्या तशा आहेत. बंदर विभागाने तत्काळ गाळ काढण्याची प्रक्रिया सुरू करण्यासाठी आवश्यक माहिती गोळा केली असून, याचा सविस्तर अहवाल सरकारकडे सादर करण्यात येणार आहे. या संकटावर तातडीने तोडगा काढण्यासाठी करंजा मच्छीमार सहकारी संस्थेने सरकारकडे विशेष मागणी केली आहे. बोटी व्यवस्थित कार्यान्वित होण्यासाठी, किमान 100 कोटींचा तातडीचा निधी मंजूर करण्यात यावा, अशी मागणी संस्थेने केली आहे.
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai