नवी मुंबईच्या प्रगतीचे उड्डाण
- by Aajchi Navi Mumbai
- Dec 26, 2025
- 27
नवी मुंबई ः गेले 20 वर्ष विमान उड्डाणाच्या प्रतिक्षेत असलेल्या नवी मुंबईकरांचे स्वप्न अखेर नाताळच्या मुहूर्तावर पुर्णत्वास आल्याचे नवी मुंबईकरांनी याची डोळा पाहिल्याने त्यांचा आनंद गगनात मावेनासा झाला होता. हे उड्डाण पाहण्यासाठी हजारो नागरिकांनी विमानतळ परिसरातील रस्त्यांवर गर्दी केली होती. तर या उड्डाणात प्रत्यक्ष साक्षीदार व्हावे म्हणून अनेकांनी हजारो रुपयांचे तिकीट खरेदी करुन या प्रवासाचा आनंद लुटला. हे विमानाचे उड्डाण नवी मुंबईच्या पुढील प्रगतीचे उड्डाण असल्याची प्रतिक्रिया अनेक दिग्गजांनी व्यक्त केली.
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर नाताळच्या मुहूर्तावर सकाळी 8 वाजता बेंगळुर वरुन 6ई640 हे विमान धावपट्टीवर उतरले. या पहिल्या विमानाला पारंपरिक वॉटर कॅनन सॅल्यूटने सन्मानित करण्यात आले. सकाळी 8.40 वाजता 6 ई 882 या विमानाने हैदराबादसाठी आकाशात झेप घेतली. या उड्डाणाने नवी मुंबईकरांनी आपल्या डोळ्यात गेली 20 वर्ष जपलेले स्वप्न प्रत्यक्षात उतरल्याचे पाहिल्याने त्यांचा आनंदाला पारावार उरला नव्हता. पहिल्याच दिवशी या विमानतळावरुन 4000 प्रवाशांनी प्रवासाचा लाभ घेतला. अनेक प्रवाशांनी पहिल्या प्रवासाचे साक्षीदार होण्यासाठी हजारो रुपये खर्च करुन तिकीटे विकत घेऊन प्रवासाचा आनंद घेतला. हजारो नवी मुंबईकरांनी पहिले विमान उतरण्याचे व उड्डाणाचे क्षण आपल्या नजरेने आपल्या मनात कैद केले. प्रत्यक्ष विमानतळावरील उत्साह वाखाणण्याजोगा होता. या उड्डाण सोहळ्यासाठी या प्रकल्पाचे खरे शिल्पकार प्रकल्पग्रस्तांना खास आमंत्रित करण्यात आले होते. दिवसभरात येथून 30 विमानांनी गोवा, कोची व बेंगळुर येथे उड्डाण केल्याची माहिती सिडकोच्यावतीने देण्यात आली. या विमानतळावरुन सुरुवातीला आकासा, इंडिगो, स्टार एअरलाईन्स व एअर इंडिया या कंपनीची वाहतुक सेवा नागरिकांना उपलब्ध होणार आहे.
सूमारे 20 हजार कोटी खर्च करुन सिडकोने सार्वजनिक-खाजगी भागीदारीतून हे नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ विकसीत केले आहे. सिडकोचा या प्रकल्पातील भागीदारी 26 टक्के असून उर्वरित भागीदारी ही अदानी समुहाची आहे. या विमानतळाचा शिलान्यास 2016 मध्ये पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते करण्यात येऊन 2023 साली पहिले विमानउड्डाणाचे लक्ष निर्धारित करण्यात आले होते. 100 कि.मी परिसरात दोन विमानतळे असणारे नवी मुंबई शहर हे आंतरराष्ट्रीय नकाशावर आले आहे. या विमानतळाला जोडणारे अनेक प्रकल्प पुर्णत्वास आले असून मेट्रो व रेल्वे मार्गाने हे विमानतळ इतर शहरांना जोडण्याच्या प्रकल्पांना केंद्राने मंजुरी दिली आहे. या विमानतळाच्या दोन धावपट्या असून सुरुवातीला एक धावपट्टी कार्यान्वित करण्यात आली आहे. या विमानतळाची प्रवासी वाहतुक क्षमता 9 कोटी असून तीसरी धावपट्टी भविष्यात विकसीत झाल्यास ही क्षमता 15 कोटींपर्यंत नेण्याचे स्वप्न असल्याचे सिडको व्यवस्थापकीय संचालक विजय सिंघल यांनी सांगितले. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरुन झालेले पहिले उड्डाण हे नवी मुंबई व एमएमआर क्षेत्राच्या पुढील प्रगतीचे उड्डाण असल्याचेही ते म्हणाले.
- प्रचंड रोजगार निर्मिती
विमानतळ कार्यान्वित होत असल्याने टप्याटप्यात या परिसरात प्रचंड रोजगार निर्मिती होणार आहे. विमानतळामुळे पंचतारांकित हॉटेल्स, नागरिकांना ने-आण करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर टॅक्सी व इतर वाहतुकीची साधने, वाणिज्य संकुले, विमान परिचलन व डागडुजी सारख्या क्षेत्रात प्रचंड रोजगाराची निर्मिती होणार आहे. ही निर्मिती एकाच वेळी होणार नसून ती विमानतळाचा जसजसा विकास होईल तसतसे रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील. - देशांतर्गत मालवाहतूकीस चालना
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ हे चहुबाजुंनी रेल्वे, मेट्रो व महामार्गाने जोडण्यात येणार आहे. हे विमानतळ जवाहरलाल नेहरु पोर्ट ट्रस्ट लगत असल्याने या विमानतळामुळे देशांतर्गत मालवाहतूकीस मोठी चालना मिळणार आहे. या विमानतळाची मालवाहतूक क्षमता ही प्रतिवार्षिक 10 लाख मे.टन असल्याने या विमानतळावरुन देशातील अन्य भागात त्वरीत मालाची ने-आण करणे शक्य होणार आहे. त्याचा फायदा आयात-निर्यातीवर अवलंबून असणाऱ्या उद्योगजगताला होणार आहे. - आंतरराष्ट्रीय उड्डाणे
देशांतर्गत उड्डाणांचे जाळे कार्यान्वित झाल्यानंतर या विमानतळावरुन आंतरराष्ट्रीय उड्डाणांना सुरुवात करण्यात येणार आहे. यामुळे मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचा भार कमी होणार आहे. राज्यातील अनेक शहरे महामार्गाने या विमानतळ जोडण्याचे काम सुरु असल्याने आंतरराष्ट्रीय उड्डाणासाठी हे विमानतळ सोईचे ठरणार आहे. त्यामुळे मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ व नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ या दोघांच्या कार्यक्षमतेत वाढ होणार आहे.
- घरांच्या किमंती महागणार
विमानतळ परिसरात मोठी रोजगार निर्मिती होत असून त्याचा प्रत्यक्ष परिणाम लगेच जाणवू लागला आहे. येथील घरांच्या किमंती 25 टक्के दराने वाढल्या असून घरांचे भाडेही महागले आहे. त्याचा प्रत्यक्ष फायदा या क्षेत्रात गुंतवणुक केलेल्या नागरिकांना झाला असून, त्याचा फटका मात्र या परिसरात रोजगारामुळे वास्तव्यास आलेल्या नागरिकांना बसत आहे.
नवी मुंबई विमानतळाची वैशिष्ट्यं काय?
- विमानतळ उभारणीस एकूण खर्च 1 लाख कोटींहून जास्त झाला आहे.
- नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ एकूण 1160 हेक्टरवर विमानतळ उभारले आहे.
- जगातील सर्वात मोठ्या लंडन येथील हिर्थो विमानतळाशी नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाची तुलना करण्यात येत आहे.
- पॅसेंजर आणि कार्गो अशा दोन्ही सुविधा नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर आहेत.
- नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर 350 एअरक्राफ्ट पार्किंगची सुविधा असेल.
- टर्मिनलमध्ये डिजिटल आर्टच्या माध्यमातून भारतीय संस्कृतीचे दर्शन घडवले जाणार आहे.
- नवी मुंबई विमानतळामुळे मुंबई विमानतळावरील 70 टक्के लोड कमी होणार आहे.
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai