वाशी गृहप्रकल्पात बेकायदा गौणखनिज उत्खनन
- by संजयकुमार सुर्वे
- Dec 26, 2025
- 24
तहसील ठाणे यांच्याकडे तक्रार; 27 कोटी वसूलीची मागणी
नवी मुंबई ः वाशी सेक्टर 17 येथील भुखंड क्र. 28,29, 32 व 33 वर सुरु असलेल्या गृहप्रकल्पाला इनक्लुसिव्ह हाऊसिंग योजनेत घरे न बांधण्याची सवलत नवी मुंबई महापालिकेने दिली असल्याची बाब आजची नवी मुंबईने समोर आणल्यानंतर संबंधित गृहप्रकल्पात विकासकाने 12,437 ब्रास गौणखनिजाचे अतिरिक्त उत्खनन केल्याची धक्कादायक बाब जिल्हाधिकारी कार्यालयाच्या दक्षता पथकाने उघडकीस आणली आहे. याबाबत जिल्हाधिकारी कार्यालयाने संबंधित विकासकावर दंडात्मक कारवाई करुन वसूली चलनासह कार्यालयात अहवाल सादर करण्याचे आदेश तहसीलदार ठाणे यांना दिल्याने खळबळ माजली आहे.
नवी मुंबई महापालिकेने विकासक मे. टीपीव्ही व्हेंचर्स यांना बांधकाम परवानगी दिली असून त्यामध्ये तीन मजले बेसमेंटचा समावेश आहे. या बेसमेंटचा वापर संबंधित विकासक वाहनतळासाठी करणार असल्याचे सदर बांधकाम परवानगीत नमुद आहे. विकासकाने या खोदकामासाठी 70 मीटर रुंदीचा, 92 मी. लांबीचा व 11.7 मी. खोलीचा खड्डा असे एकुण 26624 ब्रास खोदकाम केल्याचे दक्षता पथकाने जिल्हाधिकारी कार्यालयाला पाठवलेल्या आपल्या अहवालात नमुद केले आहे. त्याचबरोबर विकासकाने 1813 ब्रास पायलिंग केल्याचे दक्षता पथकाने नमुद केले आहे. विकासकाने सदर उत्खननापोटी 16,000 ब्रास स्वामित्वधन जिल्हाधिकारी कार्यालय ठाणे यांच्याकडे भरल्याचे निष्पन्न झाले आहे. त्यामुळे एकुण 28437 ब्रास गौणखनिज उत्खनन केले असले तरी स्वामित्वधन मात्र 16000 ब्रास साठीच भरल्याने याबाबत योग्य ती कारवाई करुन वसूली चलनासह कार्यवाहीचा अहवाल आपल्या कार्यालयात सादर करावा असे आदेश जिल्हाधिकारी कार्यालय ठाणे यांनी तहसीलदार ठाणे यांना दिले आहेत. दरम्यान, तहसीलदार ठाणे यांनी याबाबत सुनावणी घेऊन विकासकाचे म्हणणे नोंदवून पुढील आदेशासाठी प्रकरण बंद केले आहे.
सामाजिक कार्यकर्ते संजयकुमार सुर्वे यांनी संबंधित विकासकाने सदर गौणखनिज वाहतुक करताना आदेशातील मुद्दा क्र. 6 चे उल्लंघन केल्याचे तहसीलदार ठाणे यांना लेखी कळवलेआहे. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या मंजुरीच्या आदेशातील मुद्दा क्र. 6 नुसार कोणत्याही प्रकारचे गौणखनिज महाखनिज प्रणालीद्वारे निर्गमीत केलेले वाहतुक पास व ईटीपी शिवाय वाहतुक करताना आढळून आल्यास ते अवैध समजण्यात येईल असे नमुद केले आहे. दरम्यान, संबंधित विकासकाने वाहतुक केलेल्या ईटीपीची एकुण संख्या 425 असून प्रत्येक ईटीपी नंबर द्वारे चार ब्रास गौणखनिजाचे वाहतुक केल्याचे दिसत आहे. म्हणजेच संबंधित विकासकाने एकुण उत्खननाच्या फक्त 1700 ब्रास वाहतुक ईटीपी नंबरद्वारे केल्याचे दिसत आहे. त्यामुळे एकुण उत्खननाच्या 27,737 ब्रास गौणखनिजाची वाहतुक ही ईटीपी नंबरशिवाय केल्याने ती सकृतदर्शनी बेकायदेशीर वाहतुक ठरत आहे. त्यामुळे संबंधित विकासकाकडून 27 कोटी रुपये दंडापोटी वसुल करण्याची मागणी संजयकुमार सुर्वे यांनी तहसीलदार ठाणे यांच्याकडे केली आहे. याबाबत ठाणे तहसील कार्यालय कोणती कारवाई करते हे पाहणे औत्युक्याचे ठरणार आहे.
जिल्हाधिकारी यांच्या तपास पथकाने संबंधित विकासकाने 28437 ब्रास उत्खनन केल्याचा अहवाल सादर केला आहे. माहिती अधिकार अंतर्गत जिल्हाधिकारी कार्यालयाने विकासकाने 1700 ब्रास वाहतुक ही ईटीपी नंबरद्वारे केल्याचे उघड केले आहे. त्यामुळे 27,737 ब्रास गौण-खनिज वाहतुक नियमबाह्य ठरते. - संजयकुमार सुर्वे, सामाजिक कार्यकर्ते
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
संजयकुमार सुर्वे