मुंबईत युती तर नवी मुंबई-ठाण्यात संघर्षपुर्ण लढत!
- by Aajchi Navi Mumbai
- Dec 26, 2025
- 24
तुल्यबळ उमेदवारांमुळे शिंदे-नाईक युतीसाठी उदास
मुंबई ः एकनाथ शिंदे आणि गणेश नाईक यांनी जरी महायुती एकत्रीत लढण्यासाठी भेट घेतली असली तरी नवी मुंबई व ठाण्यात शिंदेसेना-भाजप यांच्यातच सत्तेसाठी जोरदार संग्राम होण्याची शक्यता राजकीय वर्तुळात आहे. याउलट मुंबईत मात्र सत्ता मिळवण्यासाठी भाजपने कोणत्याही परिस्थितीत शिवसेनेला सोबत घेऊन लढण्याचे निश्चित केल्याने तेथे मात्र महायुती एकत्र लढणार आहे. त्यामुळे नवी मुंबईत शिंदे व नाईक तर मुंबईत ठाकरे बंधु व भाजपा यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे.
राज्यात 29 महापालिकांच्या निवडणुकींचे बिगुल वाजले आहे. अनेक महापालिकांत महायुती व महाविकास आघाडीत मोठा सत्ता- संघर्ष असला तरी राज्यात मुंबई आणि ठाणे महापालिकेच्या निवडणुकीची चर्चा जोरात आहे. मुंबई महापालिका निवडणुकीसाठी ठाकरे बंधुंची झालेली युती ही मुंबई महापालिकेवरील सत्ता पुन्हा मिळवते का? अशी चर्चा राज्यात आहे. त्याचबरोबर ठाणे महापालिकेवर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची असलेली सत्ता ते कायम राखतात का? याबाबतही उलटसुलट चर्चा सध्या राज्यात सुरु आहे. मात्र मुंबई व ठाण्यालगत असलेल्या नवी मुंबई महापालिकेवर मात्र गणेश नाईक सत्ता कायम राखतील अशी चर्चा राजकीय वर्तुळात आहे. त्यामुळे या निवडणुकीत मुंबईत शिंदे-भाजप एकत्र तर ठाणे व नवी मुंबईत मात्र त्यांच्यात मोठा संघर्ष पाहायला मिळणार आहे.
मुंबईत मुळ शिवसेनेचे मागील निवडणुकीत 84 नगरसेवक होते. त्याचवेळी भाजपने 82 नगरसेवक मुंबईत निवडून आणूनही ठाकरे यांना मुंबई महापालिकेत सत्ता स्थापन करण्याची संधी दिली होती. शिंदे यांनी शिवसेना फोडल्यानंतर त्यापैकी अर्ध्याहुन अधिक नगरसेवकांनी शिंदेसेनेत प्रवेश केल्याने सध्यातरी उबाठाचे पारडे हलके वाटत आहे. यावेळी मुंबई महापालिकेसाठी उद्धव ठाकरे यांनी मागील निवडणुकीत 7 जागा जिंकणाऱ्या मनसेशी युती केली आहे. मनसेशी युती केल्याने उद्धवठाकरे यांचे पारडे थोडे जड झाल्याचे बोलले जात आहे. त्यातच काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस स्वतंत्र निवडणुक लढवणार असल्याने त्यांच्या या निवडणुकीत किती जागा येतात यावर महापौर कोणाचा असेल हे निश्चित होईल. भाजपने गेली पाच वर्षे मुंबईत आपला मतदार कसा वाढेल याकडे लक्ष केंद्रित केले होते. त्यांनी कोणत्याही परिस्थितीत मुंबई महापालिका जिंकण्याचे ध्येय समोर ठेवले असून स्वतःला 130-140 तर शिंदे यांना 80-90 जागेचा प्रस्ताव देऊन महायुतीत ही निवडणुक लढवण्याचे ठरवले आहे.
दरम्यान, संपुर्ण राज्याचे लक्ष ठाणे महापालिकेच्या निवडणुकीकडे लागले आहे. शिंदे यांची या पालिकेवर गेली 20 वर्ष एकहाती सत्ता असून यावेळी शिंदे यांची सत्ता उलटवून त्यांचे पंख छाटण्याची रणनिती भाजपने आखली आहे. त्यासाठी त्यांनी आपले बिनीचे शिलेदार गणेश नाईक यांना कामाला लावले असून ठाण्यातच शिंदे यांचे राजकीय पंख छाटण्याचे योजले आहे. नाईक आगरी समाजाचे नेते असल्याने त्यांच्या अनुभवाचा व प्रतिमेचा त्यांनी मोठ्या खुबीने वापर करुन घेतला असून शिंदे यांना ठाण्यातच अडकवण्याचे निश्चित केले आहे.
नवी मुंबई महापालिका निवडणुकीसाठी भाजपने नाईक यांना पुर्णतः मोकळीक दिल्याची चर्चा राजकीय वर्तुळात असून शिंदे यांनीही नाईकांना नवी मुंबईत कात्रजचा घाट दाखवण्याची रणनिती आखली आहे. मागील निवडणुकीत शिवसेनेचे 38 नगरसेवक निवडून आले होते. त्यापैकी सूमारे 30 हून अधिक नगरसेवक सध्या शिंदेसेनेत असून अन्य पक्षातील अनेकांना त्यांनी निवडणुकीच्या तोंडावर पक्षात घेतले.
शिंदे व गणेश नाईक यांनी युतीसंदर्भात जरी भेट घेतली आणि युतीसाठी समन्वय समिती स्थापन केली असली तरी युतीमुळे कार्यकर्त्यांना न्याय देता येणार नाही अशी भावना दोन्हींकडून आहे. सध्या शिवसेना व भाजपत युतीसाठी चर्चेचे गुऱ्हाळ जरी सुरु असले तरी युती होणार नसल्याचे दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांना याची जाणिव आहे. ऐनवेळी दगाफटका नको म्हणून दोन्ही पक्षाच्या नेत्यांनी आपल्या उमेदवारांना तयार राहण्याचे आदेश यापुर्वीच दिले आहेत. ही चर्चेची गुऱ्हाळे उमेदवारी अर्ज दाखल होईपर्यंत सुरु राहणार असल्याचे एका ज्येष्ठ नेत्याने आजची नवी मुंबईशी बोलताना सांगितले. त्यामुळे मुंबईत भाजप व शिंदेसेना एकत्रित लढणार असून ठाणे व नवी मुंबईत मात्र मोठा सत्तासंघर्ष पाहायला मिळणार आहे.
- मुंबईतील जागावाटपाचा फॉर्म्युला
मुंबईतील जागावाटपाचा नवा फॉर्म्युला समोर आला आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, मुंबई महापालिकेच्या 227 जागांपैकी भाजप 140 आणि एकनाथ शिंदेंची शिवसेना 87 जागा लढवणार असल्याची माहिती मिळत आहे. या महापालिकेमध्ये महायुतीतील अजित पवारांची राष्ट्रवादी स्वतंत्र लढणार आहे. त्यामुळे भाजप आणि शिवसेना मिळून 227 जागा लढवणार आहेत. जवळपास 210 जागांवर एकमत झाल्याचे चित्र आहे. - नवी मुंबईत कोण मारणार बाजी?
सध्या ऐरोली विधानसभा मतदारसंघात शिंदेसेनेचा तर बेलापुर मतदारसंघात भाजपचा जोर दिसत आहे. जोपर्यंत उमेदवार अर्ज माघारी घेण्याची तारीख उलटुन चित्र स्पष्ट होत नाही तोपर्यंत नवी मुंबईतील चित्र अधांतरी आहे. उबाठा व मनसे यांचे मतदार कोणत्या पक्षाला मतदान करतात यावरही या निवडणुकीचे भवितव्य ठरणार आहे. तुर्ततरी दोन्ही पक्षांकडे तुल्यबळ उमेदवार असल्याने शिंदेसेना व भाजपत सत्तेसाठी मोठा संघर्ष पाहायला मिळणार आहे.
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai