शेवटचा मालुसरे हरपला..
- by Aajchi Navi Mumbai
- Jan 30, 2026
- 123
अजित पवार यांच्या अकाली एक्झिटने महाराष्ट्र नेतृत्वहीन
मुंबई ः बारामती येथे झालेल्या विमान दुर्घटनेत राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे दुःखद निधन झाले. त्यांच्या अशा अनपेक्षितपणे अपघाती मृत्युने संपुर्ण महाराष्ट्राला मोठा धक्का बसला आहे. गुरुवारी शासकीय इतमामात त्यांच्या पार्थिवाला लाखोंच्या उपस्थितीत अग्नि देण्यात आला. महाराष्ट्र अजित पवार यांच्या या अकाली एक्झिटने 78 वर्षात प्रथमच राजकीय नेतृत्वहीन झाल्याचे चित्र देशाच्या राजकीय पटलावर निर्माण झाले आहे. या भावनेमुळे महाराष्ट्राचा शेवटचा मालुसरे हरपल्याची प्रतिक्रिया राजकर्त्यांसह सामान्य नागरिकांकडून व्यक्त होत आहे.
बुधवारी 28 जानेवारी रोजी बारामती येथे जिल्हा परिषदेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अजित पवार यांच्या चार सभा होत्या. या सभांसाठी ते सकाळीच नेहमीप्रमाणे लवकर बाहेर पडले होते. मुंबईहून बारामतीसाठी सकाळी विमान निघालं होतं. सकाळी 8.43वा. गोजुबावी येथे लँडिंगदरम्यान विमानाचा अपघात झाला. यावेळी अजित पवारांसह पाचजण विमानात होते. विमानाचा अपघात इतका भीषण होता की, त्यात सर्वांचा मृत्यू झाला. पवार यांच्या या अकाली एक्झिटने राज्यावर शोककळा पसरली असून सरकारने बुधवारी सार्वजनिक सुट्टी जाहीर करुन राज्यात तीन दिवसांचा दुखवटा जाहीर केला. गुरुवारी केंद्रिय गृहमंत्री अमित शहा, रामदास आठवले, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व इतर मंत्र्यासह अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत पवार यांच्या पार्थिवावर विद्या प्रतिष्ठानच्या मैदानावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी लाखोंच्या संख्येने राष्ट्रवादी पक्षाचे कार्यकर्ते उपस्थित होते. ‘अजितदादा अमर रहे’ अशा घोषणांच्या गर्जेनेत लाखोंच्या जनसमुदयाने आपल्या लाडक्या नेत्याला अखेरचा निरोप दिला.
महाराष्ट्राचे राजकीय नेतृत्व यापुर्वी यशवंतराव चव्हाण, सुधाकरराव नाईक, सुधाकर चव्हाण, शरद पवार, प्रमोद महाजन, गोपीनाथ मुंडे व विलासराव देशमुख यासारख्या जनमानसात प्रभाव असलेल्या दिग्गजांनी केले आहे. देशाला जेव्हा आवश्यकता भासली तेव्हा यापैकी अनेकांनी महाराष्ट्राचे प्रतिनिधीत्व केंद्रात केले आहे. दिल्लीत संबंधित राजकारण्यांचे वजन असल्याने महाराष्ट्राला नेहमीच सन्मानाची वागणुक मिळाली आहे. परंतु, यापैकी सध्या शरद पवार हयात असून वयोमानामुळे ते सक्रिय राजकारणापासून दूर आहेत. महाराष्ट्रात यांच्या पतडीत बसेल असा राजकारणी म्हणून अजित पवार यांच्याकडे पाहिले जात होते. परंतु, अजित दादा यांच्या अनपेक्षितपणे जाण्याने महाराष्ट्राच्या राजकारणात कधीही भरुन न येणारी प्रचंड मोठी पोकळी निर्माण झाली आहे. राजकारणातला ‘दादा माणूस’ अचानकपणे काळाच्या पडद्याआड गेल्याने संपुर्ण महाराष्ट्र हळहळला. पवार यांच्या जाण्याने संपुर्ण महाराष्ट्राची जाण असलेला व प्रशासनावर मजबुत पकड असलेला नेता गमावल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे. महाराष्ट्राचा आवाज निर्भिड व सक्षमपणे दिल्ली दरबारी ठेवणारा नेता हरपल्याची भावना सर्वसामान्यांसह राजकीय कार्यकर्त्यांमध्ये आहे. सध्या अजितदादांच्या तोडीचा एकही नेता कोणत्याही पक्षात नसल्याने महाराष्ट्राचे राजकीय जहाज विना शिडीचे भरकटण्याची भिती अनेकांनी व्यक्त केली आहे.
काँग्रेस पक्षात सध्या अनेक नेते असले तरी त्यांचा वकूब जिल्ह्यापुरता मर्यादित असल्याने निदान महाराष्ट्रात नेतृत्व देणारा नेता सध्यातरी काँग्रेसमध्ये अस्तित्वात नाही. एकनाथ शिंदे नेतृत्व करत असलेल्या शिवसेनेचे भविष्यात नाव व चिन्ह याबाबतचा निर्णय त्यांच्या विरोधात गेल्यास त्यांचीही अवस्था काँग्रेससारखी होईल अशी चर्चा राजकीय वर्तुळात आहे. शिंदे यांचे संपुर्ण राजकारण हे धन व फोडाफोडीवर असल्याने भविष्यात ते भाजपासमोर कितपत तग धरतील यात साशंकता आहे. याउलट उबाठा-मनसे जरी एकत्र आले तरी त्यांच्याकडे महाराष्ट्राला वैचारीक आणि प्रगतीशील दिशा देणारे नेतृत्व नाही. राज ठाकरे यांच्याकडून सुरुवातीला जनतेला प्रचंड अपेक्षा होत्या परंतु, त्यांचीही भुमिका ‘बोलाचीच कडी आणि बोलाचाच भात’ अशी राहिल्याने मनसे काही भागांपुरतीच मर्यादित राहिली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची दोन शकले झाल्याने सध्या वयोमानामुळे शरद पवार यांच्या नेतृत्वाला मर्यादा आहे. त्यामुळे अजितदादा यांच्यानंतर त्यांच्या पक्षाचे काय होईल? हाही चर्चेचा विषय आहे.
भाजप महाराष्ट्रात जरी मोठा पक्ष म्हणून अस्तित्वात आला असला तरी भाजपकडेही राज्याचे नेतृत्व करेल असा एकही नेता नाही. पुर्वी भाजपात प्रमोद महाजन, गोपीनाथ मुंडे यांच्यासारखे सक्षम नेते होते. परंतु, त्यांच्या अकाली जाण्याने महाराष्ट्राची भुमिका ठामपणे मांडणारा एकही नेता भाजपात नाही. सध्या गडकरी जरी दिल्लीत महाराष्ट्राचे नेतृत्व करत असले तरी त्यांची जनमानसावर पकड नाही. फडणवीस जरी मुख्यमंत्री असले तरी त्यांचे राजकीय भविष्य हे दिल्लीच्या मर्जीवर असल्याने राज्याच्या हितार्थ ते दिल्ली विरोधी भुमिका घेऊ शकत नसल्याने त्यांच्या नेतृत्वाला मर्यादा असून त्यांच्या बारभाई राजकारणामुळे ते सर्वमान्य नाहीत. राज्यातील सुसंस्कृत राजकारणाचा बाज फडणवीसांनी खराब केल्याचे खापर त्यांच्यावर फोडले जाते.
सध्या राजकारणात शरद पवार यांच्यानंतर अजित पवारच धडाडीचे व कार्यक्षम राजकीय नेते म्हणून ओळखले जात होते. महाराष्ट्र जाणणारे, प्रशासनावर वचक असणारे, शिस्तप्रिय राजकारणी, रोखठोक व्यक्तीमत्व आणि सभेदरम्यान कोपरखळ्या मारुन हसवणारा दिलदार नेता अशी त्यांची ओळख होती. शरद पवार यांनी जसे महाराष्ट्राचे अस्तित्व दिल्लीत निर्माण केले तशाच प्रकारची क्षमता त्यांच्याकडे असल्याने भविष्यात केंद्र सरकारच्या लोकशाही विरोधी धोरणांना आव्हान देण्याची धमक दादांकडे होती असे राजकीय समिक्षकांचे म्हणणे आहे. परंतु, पवार यांच्या अकाली एक्झिटने महाराष्ट्रातील सक्षम नेतृत्व गमावल्याने राज्याकडे आतातरी त्या क्षमतेचे कोणतेच राजकीय नेतृत्व दिसत नसल्याने महाराष्ट्र प्रथमच नेतृत्वहीन झाल्याचे चित्र देशात आहे. याची जाणिव सर्वसामान्य जनता व राजकर्त्यांना असल्याने महाराष्ट्राचा शेवटचा मालूसरे गेल्याच्या प्रतिक्रिया अजित दादा यांच्या मृत्यूनंतर राज्यभरात उमटत आहेत.
राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं अपघाती निधन हा महाराष्ट्राला प्रचंड मोठा धक्का आहे. एक कर्तृत्वान नेत्याला महाराष्ट्र आज मुकला आहे. हे जे नुकसान झालं ते भरुन निघणारं नाही. काही जणांनी या अपघातामागे काही तरी राजकारण आहे, अशा प्रकारची भूमिका घेतली. याच्यात राजकारण नाही. हा निव्वळ अपघात आहे. त्याच्या यातना महाराष्ट्राला आणि आम्हा सर्वांना होत आहेत. कृपा करुन इथे राजकारण नाही एवढंच सांगायचे आहे. - शरद पवार.
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai