जनगणनेसाठी 2500 प्रगणक तर 400 पर्यवेक्षक
- by Aajchi Navi Mumbai
- Feb 06, 2026
- 26
जनगणना 2027 विषयी पहिले प्रशिक्षण सत्र नवी मुंबईत संपन्न
नवी मुंबई ः जनगणना कार्य निर्देशालय महाराष्ट्र यांच्या वतीने जनगणना 2027 विषयक कार्यवाही सुरु होणार असून त्या अनुषंगाने नवी मुंबई महापालिकेचे चार्ज अधिकारी व जनगणनेशी संबधीत अधिकारी यांचा पहिल्या टप्प्यातील प्रशिक्षण कार्यक्रम महापालिका आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांच्या मार्गदर्शनानुसार मुख्यालयातील ज्ञानकेंद्रात संपन्न झाला. याप्रसंगी सहा.संचालक जनगणना अनुमोल एम. आणि सांख्यिकी अधिकारी रुचिता तेलंग यांनी जनगणना कामकाजाविषयी सविस्तर माहिती दिली.
नवी मुंबई महानगरपालिकेचे परिमंडळ 2 उपआयुक्त तथा शहर जनगणना अधिकारी संजय शिंदे तसेच परिमंडळ 1 चे उपआयुक्त सोमनाथ पोटरे यांनी उपस्थित प्रशिक्षकांचे पालिकेच्या वतीने स्वागत केले. जनगणना हे राष्ट्रीय काम असून 1872 मध्ये पहिली जनगणना झाली होती. यापूर्वी झालेल्या 2011 च्या जनगणनेनंतर 2021 मध्ये जनगणना होणे अपेक्षित होते. तथापि कोव्हिड कालावधीमुळे त्यावेळी जनगणना होऊ शकली नाही ती आता सुरु होत असून ही देशातील 16 वी आणि स्वातंत्र्यानंतरची 8 वी जनगणना आहे. सन 2027 च्या या जनगणनेचे वैशिष्ट म्हणजे ही पहिली डीजिटल जनगणना असून यामध्ये मोबाईल ॲपव्दारे माहितीची नोंदणी होणार आहे तसेच पत्याचे जिओ टॅगिंग केले जाणार आहे. याकरिता एचएलओ हे विशेष ॲप वापरले जाणार आहे. जनगणनेच्या पहिल्या टप्प्यात घर यादी गटानुसार माहिती संकलीत केली जाणार असून दुसऱ्या टप्प्यात नागरिकांची इतर माहिती संकलित केली जाणार आहे. विशेष म्हणजे नागरिक हे ॲपव्दारे स्वत:च्या माहितीची नोंदणी अर्थात स्वगणना करु शकतात. या प्रशिक्षणामध्ये जनगणनेच्या पहिल्या टप्प्यात करावयाच्या कामाची सविस्तर माहिती सहा.संचालक जनगणना अनुमोल एम. व सांख्यिकी अधिकारी रुचिता तेलंग यांनी सादरीकरणाव्दारे दिली.
या प्रसंगी बोलतांना शहर जनगणना अधिकारी तथा उपआयुक्त संजय शिंदे यांनी जनगणना हे राष्ट्रीय महत्वाचे काम असल्याचे सांगत यामध्ये केवळ मनुष्यांची संख्या माहिती करुन घेणे इतकेच हे काम मर्यादित नाही, तर देशाचा आर्थिक, सामाजिक विकास व इतर बाबींमध्ये जनगणनेतील माहितीचा उपयोग होतो असे सांगितले. राष्ट्रीय स्तरावर होणारे हे काम निश्चित केलेल्या कालावधीतच करावयाचे असल्याने तशा प्रकारचे कालमर्यादित नियोजन करणे गरजेचे आहे. नवी मुंबई महापालिकेने प्रत्येक कामाप्रमाणेच यामध्येही इतरांनी उदाहरण घ्यावे असे रोल मॉडेल सारखे काम करावे अशी अपेक्षा राज्य स्तरावरुन व्यक्त केली जात असल्याचे सांगत यादृष्टीने आपल्या सर्वांची मोठी जबाबदारी असल्याचेही ते म्हणाले.
जनगणनेचे काम साधारणत: 2500 हून अधिक प्रगणक करणार असून त्यावर 400 हून अधिक पर्यवेक्षकांचे निरीक्षण असणार आहे. महापालिका आयुक्त डॉ. कैलास शिंदे हे प्रमुख जनगणना अधिकारी असून उपआयुक्त संजय शिंदे हे शहर जनगणना अधिकारी म्हणून जबाबदारी पार पाडणार आहेत. प्रत्येक विभागाचे सहा.आयुक्त तथा विभाग अधिकारी हे त्या विभागाचे चार्ज ऑफिसर म्हणून काम करणार आहेत. जनगणना 2027 च्या अनुषंगाने हाऊस लिस्टींग कामकाजास पहिल्या टप्प्यात सुरुवात होणार असून त्याचे पहिले प्रशिक्षण संबधित अधिकारी व कर्मचारी यांना देण्यात आले. जनगणना कायदा 1948 नुसार नागरिकांमार्फत प्रगणकांना दिली जाणारी माहिती ही पूर्णपणे गोपनीय राखली जाते व हा दस्ताऐवज केवळ केंद्रीय जनगणना विभागाच्या अखत्यारित असतो. त्यामुळे नवी मुंबईकर नागरिकांनी जनगणना कामकाजासाठी घरी येणाऱ्या प्रगणकांना अचूक व सत्य माहिती देऊन जनगणनेच्या राष्ट्रीय कार्यात संपूर्ण सहकार्य करावे असे आवाहन महापालिका आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांच्या वतीने करण्यात येत आहे.
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai