नोकरीच्या आमिषाने 17 जणांकडून 41 लाख उकळले
- by Aajchi Navi Mumbai
- Jul 04, 2026
- 33
12 जणांविरोधात तुर्भे पोलिसांत गुन्हा दाखल
नवी मुंबई : परदेशात जहाजावर चांगल्या पगाराची नोकरी लावून देण्याच्या बहाण्याने एका टोळीने 17 सुशिक्षित बेरोजगार तरुणांकडुन तब्बल 41 लाख 75 हजार रुपये उकळून त्यांना कुठल्याही प्रकारची नोकरी न देता आपले कार्यालय बंद करुन पलायन केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. तुर्भे पोलिस ठाण्यात बोगस कंपन्यांच्या चालकांसह एकुण 12 जणांविरोधात गुन्हा दाखल करुन त्यांचा शोध सुरु केला आहे.
या प्रकरणातील टोळीने सफ्टेंबर-2025 मध्ये नेरुळ येथील हावरे सेंच्युरियन मॉलमध्ये डीएलएस सोल्यूशन एलएलपी आणि एक्सव्हीएम शिपिंग कंपनी नावाचे कार्यालये थाटले होते. त्यानंतर या टोळीने परदेशात जहाजावर चांगल्या पगाराची नोकरी लावून देण्याची वेगवेगळ्या माध्यमातून जाहिरातबाजी सुरु केली होती. या जाहिरातबाजीला भुलून अनेक बेरोजगार तरुणांनी या कार्यालयात संपर्क साधला असता, या टोळीने त्यांना परदेशात 600 डॉलरची नोकरी लावण्याचे अमिष दाखवले. त्यासाठी त्यांना 4 लाख रुपये भरण्यास सांगितले. नोकरी मिळेल या आषेने तरुणांनी पैसे भरण्याची तयारी दर्शविल्यानंतर या टोळीने विविध कंपन्या, कर्मचारी आणि सहकाऱ्यांच्या बँक खात्यांवर एकूण 41 लाख 75 हजार रुपये या तरुणांकडुन उकळले. काही दिवसानंतर त्यांनी या तरुणांचे फोन घेण्यास टाळाटाळ सुरु केली. अखेर या तरुणांनी नेरुळ येथील डीएलएस मरीन सोल्युशन एलएपी कंपनीचे कार्यलय गाठले असता, सदरचे कार्यालय बंद असल्याचे तरुणांच्या निदर्शनास आले. त्यानंतर या तरुणांनी डीजी शिपींगच्या अधिकृत पेजवर नोंदणीकृत आरपीएसएल कंपन्यांची यादी तपासली असता, त्यात डीएलएस मरीन सोल्युशन एलएलपी कंपनी व तिचे आरपीएसएल लायसन्स नंबर हे लियाकत अली पारकर यांच्या नावावर वसई नायगाव येथे नोंदणीकृत असल्याचे समजले. फसवणूक झाल्याचे या तरुणांना लक्षात आल्यानंतर या तरुणांनी एकत्रितपणे नवी मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या आर्थिक गुप्त वार्ता कक्षाकडे याबाबत तक्रार दाखल केली होती. या अर्जाच्या प्राथमिक चौकशीनंतर तुर्भे पोलिस ठाण्यात बोगस कंपन्यांच्या चालकांसह एकुण 12 जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
- फरार झालेले आरोपी
याप्रकरणात गुन्हा दाखल करण्यात आलेल्यामध्ये मोहम्मद गुल्फान बशीर काझी, आशिष नाथाजी काळे, योगेश नाथाजी काळे, राहुल काडयान उर्फ रोहित सिंग, आनंदन नवीन कुमार (संचालक, ओसीयन स्पार्क शिप मॅनेजमेंट), मायकल माजीनी (संचालक, एक्सहीएम शिपिंग), पम्मीकुमारी रणजीत सिंग, एजंट पवित्र रणवीर सिंग, एजंट सुनील कुमार चमनलाल एजंट अक्षय अशोक वाळणेकर, एजंट राघव, दिनेश केळकर यांच्यासह इतरांचा समावेश आहे.
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai