प्रियकराच्या मदतीने पतीची निर्घृण हत्या
- by Aajchi Navi Mumbai
- Jul 18, 2026
- 23
थरारक हत्याकांडाचा 11 महिन्यांनी उलगडा
नवी मुंबई ः अनैतिक संबंधात पती अडथळा ठरत असल्याने पत्नीने प्रियकराच्या मदतीने पत्नीची हत्या केल्याच्या घटनेचा तब्बल 11 मन्यािंनी उलगडा झाला आहे. ऐरोलीतील यादवनगर परिसरात गेल्या वर्षी ऑगस्टमध्ये सदर घटना घडली होती. तसेच पुरावे नष्ट करण्यासाठी मृतदेहाचे मुंडके, धड आणि पाय असे तीन तुकडे करून ते गवळी देव डोंगर परिसरातील घनदाट जंगलात वेगवेगळ्या ठिकाणी फेकून दिल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. या प्रकरणी पोलिसांनी बलीराम सूर्यनाथ कुशवाह (50) यांची पत्नी सुनिता कुशवाह (40) आणि तिचा प्रियकर राहुल दशरथ प्रजापती (30) या दोघांना अटक केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बलीराम कुशवाह हे ऐरोलीतील यादवनगर येथे पत्नी आणि दोन मुलांसह राहत होते. याच काळात सुनिता हिचे घणसोली येथे राहणाऱ्या रिक्षाचालक राहुल प्रजापती याच्याशी प्रेमसंबंध जुळले. या संबंधांची माहिती बलीराम यांना मिळाल्यानंतर त्यांनी त्याला तीव्र विरोध केला. त्यानंतर पतीला कायमचा मार्गातून दूर करण्याचा कट सुनिता आणि राहुल यांनी रचल्याचे तपासात स्पष्ट झाले. या कटाची अंमलबजावणी करण्यासाठी सुनिताने आधी दोन्ही मुलांना दोन दिवसांसाठी त्यांच्या मावशीकडे पाठवले. त्यानंतर 9 ऑगस्ट 2025 रोजी मध्यरात्री बलीराम गाढ झोपेत असताना दोघांनी त्यांचा गळा आवळला. त्यानंतर धारदार चाकूने गळ्यावर वार करून त्यांची हत्या करण्यात आली, असे पोलिस तपासात समोर आले आहे. हत्येनंतर आरोपींनी घरातच मृतदेहाचे मुंडके, धड आणि पाय असे तीन तुकडे केले. हे तुकडे वेगवेगळ्या गोण्या आणि चादरीत गुंडाळून राहुलच्या रिक्षातून रात्रीच्या अंधारात गवळी देव परिसरातील जंगलात नेण्यात आले. तेथे तीन वेगवेगळ्या ठिकाणी मृतदेहाचे तुकडे फेकून पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले. गुन्ह्यानंतर संशय येऊ नये म्हणून सुनिताने यादवनगरमधील घर भाड्याने दिले आणि मुलांसह राहुलसोबत घणसोली येथे राहण्यास सुरुवात केली. नातेवाईकांकडे बलीराम घर सोडून गेल्याचे सांगून ती वेळ मारून नेत होती. मात्र जवळपास आठ महिन्यांनंतर बलीराम यांचा भाऊ गावाहून आल्यानंतर त्याने भावाबाबत चौकशी केली. त्यावेळीही सुनिताने भांडण झाल्यानंतर बलीराम घर सोडून गेल्याचे सांगितले. संशय अधिक बळावल्याने एप्रिल 2026 मध्ये रबाळे एमआयडीसी पोलीस ठाण्यात बलीराम बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल करण्यात आली.
बेपत्ता तक्रारीनंतर पोलिसांनी तांत्रिक तपास सुरू केला. दरम्यान, सुनिता आणि राहुल यांनी जुने मोबाईल आणि सिमकार्ड बदलून नवे मोबाईल वापरण्यास सुरुवात केली होती. मात्र जुन्या कॉल डिटेल रेकॉर्डच्या तपासणीत राहुल वेगवेगळे मोबाईल क्रमांक वापरत असला, तरी त्याचा सातत्याने सुनिताशीच संपर्क असल्याचे स्पष्ट झाले. दुसरीकडे, पोलिस चौकशीत सुनिता पतीबाबत प्रत्येक वेळी वेगवेगळी माहिती देत असल्याने संशय आणखी गडद झाला. अखेर दोघांना ताब्यात घेऊन स्वतंत्रपणे चौकशी करण्यात आली. त्यांच्या जबाबातील विसंगती उघड झाल्यानंतर केलेल्या कसून चौकशीत दोघांनीही हत्येची कबुली दिली. कबुलीजबाबाच्या आधारे मृतदेहाचे अवशेष शोधण्यासाठी पोलिसांनी गवळी देव परिसरात शोधमोहीम सुरू केली आहे. मात्र गुन्हा घडून तब्बल 11 महिने उलटल्याने पावसाळा, वन्य प्राण्यांचा वावर आणि नैसर्गिक बदलांमुळे पुरावे नष्ट झाले असण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे मृतदेहाचे अवशेष शोधणे हे तपास पथकासमोर मोठे आव्हान ठरले आहे. या प्रकरणाचा पुढील तपास रबाळे एमआयडीसी पोलीस करीत असून, गुन्ह्यात वापरण्यात आलेली शस्त्रे, मृतदेहाची विल्हेवाट लावताना वापरलेले साहित्य आणि इतर पुरावे जप्त करण्याच्या दृष्टीने तपास सुरू आहे.
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai