भारतात 28 कोरोनाग्रस्त रुग्ण

नवी दिल्ली : चीनमध्ये पसरलेला कोरोना व्हायरसने जगभरात दहशत निर्माण केली आहे. भारतातही कोरोना व्हायरसग्रस्त रुग्णांची संख्या 28 वर पोहोचल्याची माहिती केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्ष वर्धन यांनी दिली आहे. इटलीमधून भारतात पर्यटनासाठी आलेल्या एका ग्रुपमधील 16 जण कोरोनाग्रस्त आहेत. तर त्यांच्या संपर्कात आलेला एक भारतीय चालकही कोरोनाबाधित आहे. याशिवाय दिल्लीतील एक, हैदराबादमधील एक आणि आग्र्यातील सहा जण कोरोनाग्रस्त आहे. दिल्लीतील व्यक्तीच्या संपर्कात आल्यानेच आग्र्यातील सहा जणांना कोरोना व्हायरसची लागण झाल्याचे समोर आले आहे. हे सहा जण त्या व्यक्तीचे नातेवाईक आहेत.

आरोग्यमंत्री डॉ. हर्ष वर्धन यांनी आज वरिष्ठ वैद्यकीय अधिकार्‍यांसोबत बैठक घेतली आणि कोरोनाचा सामना करण्यासाठीच्या तयारीचा आढावा घेतला. सध्या कोरोना व्हायरसच्या तपासणीसाठी 15 प्रयोगशाळा उपलब्ध आहेत. आणखी 19 प्रयोगशाळांची निर्मिती सरकारकडून केली जाणार आहे, अशी माहिती डॉ. हर्ष वर्धन यांनी दिली आहे. तसंच परदेशातून येणार्‍या प्रत्येक प्रवाशांची आता कसून तपासणी केली जात आहे. याआधी केवळ 12 देशांसाठी अ‍ॅडव्हायझरी जारी केली होती. सध्या केरळात 3 बाधित रुग्ण कोरोनाच्या विळख्यातून बाहेर आले असून त्यांची प्रकृती आता स्थिर आहे. कोरोनाला रोखण्यासाठी परदेशातून येणार्‍या नागरिकांची तपासणी केली जात असून यासाठी स्वतंत्र व्यवस्था उभी करण्यात आली आहे. कोरोनामुळे घाबरुन जाऊ नका पण खबरदारी घ्या, असं आवाहन आरोग्यमंत्र्यांनी केले आहे.