813.3 किलो कपड्यांना मिळाले नवजीवन
- by Aajchi Navi Mumbai
- Apr 03, 2026
- 29
जुने कपडे संकलन उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद
नवी मुंबई ः महापालिका, प्रोजेक्ट मुंबई आणि मराठी साहित्य संस्कृती व कला मंडळ, वाशी यांच्या संयुक्त विद्यमाने वाशी येथील साहित्य मंदिर सभागृहात जुने सुस्थितीतील कपड्यांचे संकलन हा उपक्रम अत्यंत यशस्वीपणे राबविण्यात आला. या उपक्रमाला नवी मुंबईतील नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत वापरून झालेले चांगल्या स्थितीतील कपडे मोठ्या प्रमाणात जमा केले. संकलित करण्यात आलेले साधारणत: 813.3 किलो जुने कपडे कचऱ्यात जाण्याऐवजी त्यांना नवजीवन देण्यासाठी नवी मुंबई महापालिकेच्या सीबीडी बेलापूर येथील टेक्सटाईल रिकव्हरी फॅसिलिटी केंद्रात पाठवण्यात आले.
केंद्र सरकारच्या वस्त्रद्योग मंत्रालय अंतर्गत वस्त्र समिती आणि नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने सीबीडी बेलापूर येथे वस्त्र पुनर्प्रक्रिया प्रकल्प अत्यंत उत्तम प्रकारे राबविण्यात येत असून या प्रकल्पामध्ये जुने कपडे गोळा करून त्यांचे वर्गीकरण, प्रक्रिया तसेच त्यापासून नव्या वस्तूंची निर्मिती (अपसायकलिंग) केली जाते. यामुळे क्षेपणभूमीवर जाणारा कापडी कचरा लक्षणीय प्रमाणात कमी होण्यास मदत होत आहे. नवी मुंबई महानगरपालिका, केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्रालय, एसबीआय फाऊंडेशन आणि टिसर इंडिया यांच्या संयुक्त विद्यमाने राबविण्यात येणाऱ्या या केंद्रामध्ये महिला बचत गटांतील महिलांना मोठ्या प्रमाणात रोजगाराच्या संधी उपलब्ध झाल्या आहेत. महापालिका आयुक्त डॉ.कैलास शिंदे यांच्या मार्गदर्शनानुसार लोकसहभागावर भर देते येथे सोसायट्या, वसाहती, थ्री आर सेंटर्स अशा विविध ठिकाणाहून आलेल्या जुन्या कपड्यांची छाननी करून त्यांचा पुनर्वापर व अपसायकलिंग करण्यात येते. या उपक्रमामुळे कचरा व्यवस्थापनास चालना मिळत असून पर्यावरण संवर्धनालाही मोठा हातभार लागत आहे.
वाशीतील मराठी साहित्य संस्कृती व कला मंडळाने या अभिनव उपक्रमात पुढाकार घेतला असून प्रोजेक्ट मुंबई या संस्थेच्या सहकार्याने या कपडा संकलनाचे प्रभावी नियोजन करण्यात आले. यावेळी प्लास्टिक कचऱ्याचेही संकलन करून ते पुनर्वापरासाठी पाठवण्यात आले. या उपक्रमाला अतिरिक्त आयुक्त सुनिल पवार व घनकचरा व्यवस्थापन विभागाचे उपआयुक्त डॉ.अजय गडदे यांचे मार्गदर्शन लाभले असून मंडळाचे अध्यक्ष सुभाष कुळकर्णी, प्रोजेक्ट मुंबईचे अधिकारी रोहित फडतरे, टिसर ट्रस्टच्या वैशाली कदम तसेच मंडळाचे सभासद यांचे बहुमोल सहकार्य लाभले. नागरिकांना पर्यावरणपूरक सवयी अंगिकारण्यासाठी प्रोत्साहित करीत नवी मुंबई अधिक स्वच्छ व सुंदर करण्याच्या उद्देशाने या उपक्रमात सहभागी झालेल्या सर्व नागरिकांचे यावेळी नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने आभार मानण्यात आले.
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai