कोकण विभागीय आयुक्तपदी रुबल अग्रवाल यांची नियुक्ती
- by Aajchi Navi Mumbai
- Apr 03, 2026
- 23
सिद्धराम सालीमठ यांच्याकडून स्वीकारला पदभार
नवी मुंबई : प्रशासकीय क्षेत्रातील आपल्या धडाकेबाज कार्यशैलीसाठी ओळखल्या जाणाऱ्या ज्येष्ठ सनदी अधिकारी रुबल अग्रवाल यांनी (01 एप्रिल) कोकण विभागीय आयुक्त पदाची सूत्रे स्वीकारली आहेत. त्यांनी प्रभारी विभागीय आयुक्त सिद्धराम सालीमठ यांच्याकडून या पदाचा कार्यभार अधिकृतपणे स्वीकारला.
2008 च्या बॅचच्या आयएएस अधिकारी असलेल्या रुबल अग्रवाल यांनी आपल्या कारकिर्दीत विविध महत्त्वाच्या पदांवर काम करून आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटवला आहे. यापूर्वी त्यांनी सोलापूर येथे सहायक जिल्हाधिकारी म्हणून आपल्या सेवेला सुरुवात केली होती. त्यानंतर अहमदनगर जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आणि अहमदनगर तसेच जळगाव येथे जिल्हाधिकारी म्हणून त्यांनी यशस्वी कामकाज पाहिले आहे.
रुबल अग्रवाल या शिर्डीच्या श्री साईबाबा संस्थान ट्रस्टच्या पहिल्या महिला मुख्य कार्यकारी अधिकारी होत्या. त्यांच्या काळात साईबाबा समाधी शताब्दी महोत्सवाचे नियोजन अत्यंत भव्य आणि शिस्तबद्ध पद्धतीने करण्यात आले होते. तसेच पुणे महापालिकेत अतिरिक्त आयुक्त म्हणून कार्यरत असताना त्यांनी कोविडच्या भीषण संकटाचे व्यवस्थापन अत्यंत प्रभावीपणे केले. त्यांच्या या कामगिरीची दखल राज्य आणि राष्ट्रीय स्तरावर घेतली होती. यापूर्वी त्यांनी एकात्मिक बाल विकास सेवा योजनेच्या आयुक्त म्हणून राज्यातील 1 लाख 10 हजार अंगणवाड्यांचे जाळे सक्षमपणे हाताळले आहे. तसेच कोकण विभागीय आयुक्त पदावर येण्यापूर्वी त्या महामुंबई मेट्रो ऑपरेशन कॉर्पोरेशन लिमिटेडच्या व्यवस्थापकीय संचालक म्हणून कार्यरत होत्या.
रुबल अग्रवाल यांच्या उत्कृष्ट प्रशासकीय सेवेबद्दल त्यांना आतापर्यंत उत्कृष्ट जिल्हाधिकारी पुरस्कार (महाराष्ट्र शासन, 2016-17), महात्मा गांधी शांतता पुरस्कार (जळगावमध्ये कायदा व सुव्यवस्था राखल्याबद्दल), अरुण बोंगीरवार सार्वजनिक सेवा उत्कृष्टता पुरस्कार (पुणे शहरातील कोविड नियंत्रणासाठी), स्मार्ट सिटी डिजिटल पेमेंट आणि ई-गव्हर्नन्स पुरस्कार अशा अनेक प्रतिष्ठित पुरस्कारांनी गौरविण्यात आले आहे. पदभार स्वीकारल्यानंतर त्यांनी विभागातील कामकाजाचा आढावा घेण्यास सुरुवात केली असून, जनसामान्यांचे प्रश्न सोडविण्याला आपले प्राधान्य असेल, असे रुबल अग्रवाल म्हणाल्या.
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai