विकासदरात घसरण

मुंबई : गुरुवारी विधानसभेत राज्याचा आर्थिक पाहणी अहवाल 2019-20 मांडण्यात आला. यामध्ये अनेक बाबींवर प्रकाश टाकण्यात आला. हरियाणा, कर्नाटक, तेलंगणा आणि तामिळनाडू नंतर दरडोई उत्पन्नात महाराष्ट्र पाचव्या क्रमांकावर पोहोचला आहे. दुसरीकडे मात्र आर्थिक मंदीचा महाराष्ट्राला फटका बसल्याचे दिसून येत आहे. गेल्या वर्षी आर्थिक विकासदर 7.5 सांगितला गेला होता. मात्र यंदा तो घसरुन 5.7 वर आला आहे.

कृषी व संलग्न कार्ये क्षेत्रात 2019-20 मध्ये 3.1 टक्के वाढ अपेक्षित आहे. पहिल्या सुधारित अंदाजानुसार सन 2017-18 चे सांकेतिक स्थूल राज्य उत्पन्न 26,32.792 कोटी होते, तर 2017-18 मध्ये 23,82,570 कोटी रुपये होते. तर उद्योग क्षेत्रात महाराष्ट्राची घसरण झाली आहे. 2018-19 मध्ये उद्योग क्षेत्राची वाढ 7.1 टक्के इतकी होती. ही वाढ 2019-20 मध्ये तब्बल दीड टक्क्यांनी कमी होऊन 5.5 टक्क्यांपर्यंत खाली येण्याचा अंदाज आहे. तसेच विदेशी गुंतवणुकीत घट झाली असून महाराष्ट्रातील रोजगारही घटल्याचे अहवालात म्हटले आहे. राज्याच्या या आर्थिक पाहणी अहवालात कृषी, राज्यांचे दरडोई उत्पन्न, विविध योजना, सिंचन, जलसाठा, वित्तपुरवठ्यावर सविस्तर माहिती देण्यात आली.