महिला सक्षमीकरणाला गती देण्यासाठी ममता म्हात्रे यांचा पुढाकार
- by Aajchi Navi Mumbai
- Apr 15, 2026
- 23
प्रशिक्षण ते बाजारपेठपर्यंत संपूर्ण साखळी उभारण्याची मागणी
पनवेल : पनवेल महापालिकेच्या महिला व बालकल्याण समितीच्या सभापती ममता प्रितम म्हात्रे यांनी समिती सदस्यांसह महिलांच्या सर्वांगीण आर्थिक सक्षमीकरणासाठी एक व्यापक आणि धोरणात्मक प्रस्ताव महापौर व आयुक्त यांच्याकडे सादर केला. केंद्र व राज्य शासनाच्या विविध योजनांचा प्रभावी वापर करून महिलांना स्वावलंबी, उद्योजक व आर्थिकदृष्ट्या सक्षम बनवण्याचा या प्रस्तावाचा मुख्य उद्देश आहे. या प्रस्तावामध्ये राष्ट्रीय शहरी आजीविका अभियान, राष्ट्रीय ग्रामीण आजीविका अभियान, प्रधानमंत्री मुद्रा योजना, स्टार्टअप इंडिया अभियान तसेच महाराष्ट्र शासनाच्या धोरणांचा आधार घेत महिलांसाठी प्रशिक्षण, उत्पादन, विक्री व बाजारपेठ या संपूर्ण साखळीचा विकास करण्यावर विशेष भर देण्यात आला आहे.
सभापती ममता म्हात्रे यांनी नमूद केले की, पालिकेमार्फत महिला प्रशिक्षण शिबिरे आयोजित केली जात असली तरी प्रशिक्षणानंतर उत्पादन निर्मिती, गुणवत्ता नियंत्रण, ब्रँडिंग व विक्री व्यवस्थापन या टप्प्यांमध्ये अनेक अडचणी निर्माण होत आहेत. यामुळे महिलांनी तयार केलेल्या उत्पादनांना योग्य बाजारपेठ मिळत नाही आणि अपेक्षित आर्थिक सक्षमीकरण पूर्णत्वास जात नाही. या पार्श्वभूमीवर महिलांना ‘प्रशिक्षण ते थेट ग्राहक’ असा सक्षम मार्ग उपलब्ध करून देण्यासाठी खालील ठोस उपाययोजना सुचविण्यात आल्या आहेत. पनवेल महापालिकेच्या हद्दीतील उद्यानांच्या बाहेरील अनधिकृत टपऱ्या हटवून संबंधित प्रभागातील महिला व महिला बचत गटांनी तयार केलेल्या खाद्यपदार्थ व इतर उत्पादनांच्या विक्रीसाठी अधिकृत स्टॉल उपलब्ध करून देण्यात यावेत. महापालिका व सिडकोच्या आरक्षित जागांवर नियमित आठवडा बाजार आयोजित करून त्यामध्ये महिला बचत गटांच्या उत्पादनांसाठी स्वतंत्र स्टॉल उपलब्ध करून द्यावेत. यामुळे महिलांच्या उत्पादनांना स्थिर, नियमित आणि विश्वासार्ह बाजारपेठ उपलब्ध होईल. महिलांना विविध प्रकारची उत्पादने तयार करण्यासाठी आवश्यक कौशल्य विकसित करण्यासाठी नियोजनबद्ध प्रशिक्षण कार्यक्रम राबविण्यात यावेत. तसेच प्रशिक्षणानंतर उत्पादनांची प्रत्यक्ष निर्मिती करण्यासाठी आवश्यक साधनसामग्री, यंत्रणा व सुविधा उपलब्ध करून देण्यात याव्यात. महिला व महिला बचत गटांनी तयार केलेल्या उत्पादनांच्या विक्रीसाठी वर्षभर चालणारी कायमस्वरूपी व्यापारी ग्राहक पेठ उभारण्यात यावी. यामुळे महिलांना त्यांच्या उत्पादनांसाठी स्वतःचे स्थायी विक्री व्यासपीठ मिळेल व मोठ्या प्रमाणावर रोजगारनिर्मिती होईल. या प्रस्तावामध्ये भारतीय जनता पक्षाच्या महिला सक्षमीकरणाच्या धोरणांना अनुसरून “आर्थिक स्वावलंबन हीच खरी सबलीकरणाची किल्ली” या विचाराला प्राधान्य देण्यात आले आहे. वरील सर्व उपाययोजना शासन निर्णयांच्या अनुषंगाने तातडीने राबविल्यास पनवेल महानगरपालिका क्षेत्रातील महिलांना मोठ्या प्रमाणावर रोजगारनिर्मिती व आर्थिक सक्षमीकरण साध्य होईल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला. सदर प्रस्तावाची तातडीने दखल घेऊन प्रभावी अंमलबजावणी करावी, अशी मागणी ममता म्हात्रे यांनी महिला बालकल्याण समिती सदस्यांसोबत प्रशासनाकडे केली आहे.
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai