14 गावांतील प्रलंबित प्रश्न मार्गी लागणार
- by Aajchi Navi Mumbai
- Apr 25, 2026
- 25
नवी मुंबई : नवी मुंबई महापालिकेत समाविष्ट करण्यात आलेल्या 14 गावांतील विविध प्रलंबित प्रश्न आणि मूलभूत सुविधांच्या विकासाबाबत गुरुवारी महापालिका मुख्यालयात बैठक पार पडली. 15 मेपर्यंत सर्व हस्तांतरण प्रक्रिया पूर्ण करण्याच्या सूचना महापौरांनी प्रशासनाला दिल्या. तसेच गावांचा महापालिकेत समावेश झाल्यानंतर नागरिकांना आवश्यक सेवा देण्यासाठी ही प्रक्रिया लवकर पूर्ण होणे गरजेचे असल्याचे त्यांनी सांगितले. यामुळे 14 गावांतील अनेक दिवसांपासून प्रलंबित असलेल्या प्रश्नांना गती मिळणार असून, नागरिकांना लवकरच मूलभूत सुविधा उपलब्ध होतील, अशी अपेक्षा आहे.
नगरसेवकांच्या माध्यमातून वारंवार पत्रव्यवहार करूनही प्रशासनाकडून अपेक्षित प्रतिसाद मिळत नसल्याने त्यांच्या मागणीनुसार या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. महापालिका मुख्यालयात पार पडलेल्या या बैठकीस महापौर सुजाता पाटील यांनी अध्यक्षस्थान भूषविले. या बैठकीत 14 गावांतील दप्तर व मालमत्ता हस्तांतरण प्रक्रिया तातडीने पूर्ण करण्यावर भर देण्यात आला. या वेळी नागरिकांच्या मूलभूत सुविधांबाबतही चर्चा करण्यात आली. जन्म-मृत्यू नोंदणी सेवा तातडीने सुरू करण्याचे आदेश देण्यात आले. तसेच आरोग्यसेवा, शिक्षण व्यवस्था, कचरा व्यवस्थापन आणि रस्ते दुरुस्ती व विकासकामांना प्राधान्य देण्याचे निर्देश प्रशासनाला देण्यात आले. 14 गावांतील नागरिकांना महापालिका क्षेत्रातील इतर भागांप्रमाणे दर्जेदार व सुलभ सुविधा मिळणे आवश्यक आहे. त्यासाठी प्रशासन आणि लोकप्रतिनिधी यांच्यात समन्वय राहणे अत्यंत महत्त्वाचे असून, त्याच दृष्टीने ही बैठक आयोजित करण्यात आल्याचे महापौर सुजाता पाटील यांनी बैठकीत नमूद केले. पहिल्या टप्प्यात आरोग्य, शिक्षण (महानगरपालिका शाळा), कचरा व्यवस्थापन आणि रस्ते यांसारख्या अत्यावश्यक मूलभूत सुविधा प्राधान्याने पुरवण्याचे आदेश आयुक्तांना दिले आहेत. तसेच, दप्तर जमा करताना कोणती कागदपत्रे उपलब्ध आहेत याची सविस्तर माहिती पुढील बैठकीत सादर करण्याच्या सूचनाही केल्या आहेत. भविष्यकालीन नागरी सुविधांसाठी आवश्यक असलेल्या जागा तात्काळ पालिकेकडे हस्तांतरित करण्याबाबतही चर्चा करण्यात आली. 15 मे नंतर पुन्हा एकदा आढावा बैठक घेऊन कामाच्या प्रगतीची पाहणी केली जाईल. या बैठकीत जन्म-मृत्यू नोंदणी प्रक्रिया तातडीने सुरू करण्यासोबतच, 14 गावांतील कार्यालयीन दप्तर आणि मालमत्तांचे हस्तांतरण 15 मे पर्यंत पूर्ण करण्याच्या सूचना प्रशासनाला देण्यात आल्या. या बैठकीला महापालिका आयुक्त डॉ. कैलास शिंदे, सभागृह नेते सागर नाईक, नगरसेवक शशिकांत भोईर, भरत भोईर, प्रतीक्षा पाटील तसेच पालिकेचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai