वस्त्र पुनर्प्रक्रिया सुविधा प्रकल्पास राज्यस्तरीय पारितोषिक
- by Aajchi Navi Mumbai
- Apr 25, 2026
- 31
नवी मुंबई ः ‘राजीव गांधी प्रशासकीय गतिमानता (प्रगती) अभियान व स्पर्धा’ यामध्ये ‘सर्वोत्कृष्ट कल्पना उपक्रम’ कॅटेगरीमध्ये नवी मुंबई महापालिकेच्या ‘थ्रेड्स ऑफ चेंज’ या अभिनव उपक्रमास ‘राज्यस्तरीय व्दितीय’ क्रमांकाचे पारितोषिक प्राप्त झाले आहे.
महापालिका आयुक्त डॉ.कैलास शिंदे यांच्या मार्गदर्शनानुसार, अतिरिक्त आयुक्त सुनिल पवार यांच्या नियंत्रणाखाली, उद्यान विभागाच्या उपआयुक्त स्मिता काळे यांनी सादर केलेल्या ‘वस्त्र पुनर्प्रक्रिया सुविधा’ प्रकल्पास हा बहुमान प्राप्त झाला असून कापडी कचऱ्याला नवे रूप देऊन कचरा कमी करणाऱ्या व स्वच्छतेला नवा आयाम देणाऱ्या या पर्यावरणपूरक प्रकल्पाची नोंद सर्व स्तरावर कौतुकाने घेतली जात आहे. केंद्र सरकारच्या वस्त्र मंत्रालयाच्या वस्त्र समितीमार्फत नवी मुंबई महापालिकेच्या वतीने सीबीडी बेलापूर सेक्टर 1 येथे हे वस्त्र पुनर्प्रक्रिया सुविधा (टीआरएफ) केंद्र सुरू असून यामध्ये एसबीआय फाऊंडेशन, टिसर आर्टिसन्स ट्रस्ट, आयडीएच इंडिया या संस्थांचा सहयोग आहे. या अंतर्गत वस्त्र कचरा संकलनासाठी 100 हून अधिक सोसायट्यांमध्ये वापरल्यानंतर टाकून दिले जाणारे सुस्थितीतील कपडे पुनर्प्रक्रियेकरिता देण्यासाठी विशिष्ट प्रकारच्या वस्त्र संकलन पेट्या ठेवण्यात आलेल्या आहेत. त्याठिकाणी संकलित वस्त्रांची नोंद करण्याकरिता लॉगबुक ठेवण्यात आलेले आहे व सोसायटीनिहाय पेट्या टॅगींग करण्यात आलेल्या आहे. सदर कपडे संकलित करून टीआरएफ केंद्रात आणण्यासाठी टिपर वाहन उपलब्ध करून देण्यात आलेले असून केंद्राच्या ठिकाणी वाहनातून आणलेल्या कपड्यांचे त्यांच्या प्रतवारीनुसार वर्गीकरण करण्यात येते. त्याचप्रमाणे तेथे कोशा स्कॅनरव्दारे कापूस, पॉलिस्टर, रेशीम अशा वेगवेगळ्या प्रकारच्या कपड्यांचे वर्गीकरणही केले जाते. त्यानंतर त्या वस्त्रांवर त्यांच्या गुणवत्तेनुसार योग्य प्रक्रिया केली जाते.
ऑगस्ट 2025 पासून आत्तापर्यंत वापरानंतरच्या वस्त्राचा 41,500 किलो कचरा याठिकाणी आणण्यात आला असून त्यावर पुनर्प्रक्रिया करून त्यापासून 400 हून अधिक उत्पादने तयार करण्यात आलेली आहेत. याविषयीच्या जनजागृतीसाठी 75 कार्यशाळा घेण्यात आलेल्या असून 11500 हून अधिक कुटुंबे या उपक्रमाशी जोडली गेलेली आहेत. विशेष म्हणजे टीआरएफ केंद्रामध्ये विविध प्रकारच्या कापडी वस्तू व साहित्य निर्मितीसाठी 300 हून अधिक महिलांना कौशल्य विकासात्मक प्रशिक्षण देण्यात आलेले असून 150 हून अधिक महिलांना प्रतिमहिना 9 ते 15 हजार इतका रोजगार उपलब्ध झालेला आहे. इतरांनाही असा प्रकल्प राबविता यावा यादृष्टीने या प्रकल्पातील प्रक्रियेची मानक कार्यप्रणाली तयार करण्यात आलेली असून हा प्रकल्प ‘स्वच्छ भारत मिशन’ आणि ‘शाश्वत विकास’ ही उद्दिष्टे साध्य करणारा आहे. वापरानंतरच्या वस्त्र कचऱ्याचे प्रमाण सर्वत्र मोठे असून सध्या फॅशनच्या बदलत्या ट्रेंडमुळे ते सातत्याने वाढते आहे. अशा परिस्थितीत केंद्र सरकारची वस्त्र समिती आणि नवी मुंबई महानगरपालिका एकत्रितपणे राबवित असलेला हा प्रकल्प नागरी घनकचरा व्यवस्थापन, चक्रीय अर्थव्यवस्थेला चालना आणि महिला सक्षमीकरण या तिन्ही धोरणात्मक उद्दिष्टांची एकत्रित अंमलबजावणी करणारा महानगरपालिका स्तरीय देशातील पहिला प्रकल्प आहे.
आता महाराष्ट्र शासनाच्या वतीने राजीव गांधी प्रशासकीय गतिमानता (प्रगती) स्पर्धेमध्ये ‘थ्रेड्स ऑफ चेंज’ या पर्यावरणशील व महिला सक्षमीकरणाला नवे आयाम देणाऱ्या प्रकल्पाच्या नाविन्यपूर्णतेची नोंद घेत पथदर्शी स्वरूपाच्या संकल्पना, प्रयोग म्हणून ‘टीआरएफ’ सुविधा केंद्रास राज्यस्तरीय व्दितीय पारितोषिक प्रदान करण्यात आलेले आहे. या राज्यस्तरीय पुरस्काराने नवी मुंबई महानगरपालिकेच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोवला गेला असून सर्व स्तरांतून अभिनंदन करण्यात येत आहे. आगामी काळात या बहुउपयोगी प्रकल्पाचा विस्तार करण्यात येणार आहे.
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai