पालिका रुग्णालयात होणार डेथ ऑडिट
- by Aajchi Navi Mumbai
- May 08, 2026
- 33
आरोग्य सेवेचा आयुक्तांनी घेतला आढावा
नवी मुंबई ः महापालिकेच्या वतीने पुरविल्या जात असलेल्या आरोग्य सेवांच्या गुणवत्ता वाढीसाठी नियोजनबध्द पावले उचलण्याच्या दृष्टीने महापालिका आयुक्त डॉ.कैलास शिंदे यांनी आरोग्य विभागातील प्रमुख वैदयकीय अधिकाऱ्यांची आढावा बैठक घेत प्राथमिक नागरी आरोग्य केंद्रापासून सार्वजनिक रुग्णालयापर्यंत सर्व ठिकाणी दिल्या जाणाऱ्या सेवांचे मुख्यालय पातळीवर नियमितपणे मूल्यमापन करावे व त्यात सुधारणा करावी असे निर्देश दिले.
महापालिकेच्या वतीने क्षेत्रीय स्तरावर 26 प्राथमिक नागरी आरोग्य केंद्रांच्या माध्यमातून वैदयकीय तपासणी व उपचार केले जातात. येथून संकलित होणारी नागरिकांच्या आरोग्य स्थितीची माहिती अचूक व अद्ययावत असावी याकडे कटाक्षाने लक्ष देण्याचे निर्देश देतानाच या माहितीची मुख्यालय स्तरावरुन आढावा घेऊन पडताळणी करण्यात यावी असे निर्देशित करण्यात आले. अशाच प्रकारे माता बाल रूग्णालये व सार्वजनिक रूग्णालये येथील रूग्ण व उपचारांचाही नियमित आढावा घेण्यात यावा अशा सूचना देण्यात आल्या.
महापालिकेमार्फत नियमितपणे सुरु असणारे लसीकरण कार्यक्रम, तपासणी मोहीमा, आरोग्य शिबीरे याचा लाभ जास्तीत जास्त नागरिकांनी घ्यावा यादृष्टीने अधिक प्रभावी कामगिरी व्हायला हवी असे सूचित करतानाच यामध्ये स्थानिक नगरसेवकांचा सक्रिय सहभाग घ्यावा जेणेकरुन जास्तीत जास्त नागरिक यामध्ये सहभागी होतील असे आयुक्तांनी सूचित केले. महापालिका क्षेत्रातील मागील तीन वर्षांतील जन्मदर व मृत्यूदराचा वर्षनिहाय आढावा घेताना आयुक्तांनी प्रत्येक मृत्यूची कारणमीमांसा करुन डेथ ऑडिट करावे आणि मृत्यूमागील कारणांचा अभ्यास करुन पुढील काळातील सुयोग्य उपचारांसाठी व मृत्यूदर कमी करण्यासाठी त्याचा उपयोग करुन घ्यावा असे निर्देशित केले. आरोग्यशास्त्र हे संशोधन व चिकित्सेवर अवलंबून असल्याने तशा प्रकारे अभ्यास करुन सेवेची गुणवत्ता वाढविण्यावर भर दयावा असे आयुक्तांनी सूचित केले. नवी मुंबई महापालिकेच्या वतीने कॅन्सर विषयक तपासण्या केल्या जात असून त्याची नोंद केली जाते तसेच पॉझिटिव्ह रूग्णांवर टाटा ॲक्ट्रेकच्या माध्यमातून पुढील उपचार केले जातात. या विविध प्रकारच्या कॅन्सर तपासण्यांची आकडेवारी आयुक्तांनी जाणून घेतली व सर्व प्रकारच्या कॅन्सर स्क्रिनींगची संख्या वाढवावी असे सूचित केले. राष्ट्रीय कुटुंब आरोग्य सर्वेक्षण कार्यक्रमांतर्गत माता व बाल आरोग्य, कुटुंब नियोजन, प्रजनन क्षमता आणि मृत्यू दराची अद्ययावत माहिती संकलित करण्यात येत असते. ही संकलित माहिती म्हणजे शहरातील आरोग्य स्थितीची सर्वसाधारण दर्शक असून या डाटाचे विविध प्रकारे विश्लेषण करावे आणि त्यामधील निष्कर्षानुसार आरोग्य सेवेत आवश्यक सुधारणा करावी असे आयुक्तांनी सांगितले. यासाठी महापालिकेने शहरातील अनुभवी तज्ज्ञ डॉक्टरांचा टास्क फोर्स तयार करावा. त्यांच्यासोबत नियमित बैठका घ्याव्यात. राष्ट्रीय स्तरावरील डाटाशी तुलनात्मक मूल्यमापन करावे आणि त्यानुसार आरोग्य सेवेचे नियोजन करावे अशा मौलिक सूचना आयुक्तांनी यावेळी केल्या.
प्रत्येक महिन्याच्या पहिल्या सोमवारी आरोग्य विभागाची आढावा बैठक घेणार असल्याचे सूचित करीत आयुक्त डॉ.कैलास शिंदे यांनी सर्वसामान्य रुग्णांना खाजगी रुग्णालयातही महात्मा फुले जनआरोग्य योजना व इतर कल्याणकारी योजनांच्या अंतर्गत सुपर स्पेशालिटी वैद्यकीय उपचार उपलब्ध करुन देण्याच्या दृष्टीने कार्यवाही करावी असेही निर्देश नमुंमपा आरोग्य विभागाने दिले. याप्रसंगी अतिरिक्त आयुक्त सुनिल पवार, वैदयकीय आरोग्य अधिकारी डॉ.राजेश म्हात्रे आणि तिन्ही सार्वजनिक रुग्णालयांचे वैदयकीय अधिक्षक, माता बाल रुग्णालयांचे वैदयकीय अधिकारी व आरोग्य विषयक कार्यक्रमांचे वैदयकीय अधिकारी तसेच नमुंमपा पीजी मेडिकल संस्थेचे डीन डॉ. ज्ञानेश बेलेकर उपस्थित होते.
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai