नालेसफाईची कामे समाधनकारक
- by Aajchi Navi Mumbai
- May 22, 2026
- 16
प्रत्यक्ष पाहणीवेळी महापौरांनी व्यक्त केला विश्वास
नवी मुंबई ः 15 मे पर्यंत कामे पूर्ण करण्याचे निर्देश देण्यात आले होते. त्यास अनुसरुन नालेसफाई व होल्डिंग पाँडची पाहणी केली असून प्रशासनाने समाधानकारक काम केले असल्याचे निदर्शनास येत असून या पावसाळयात नागरिकांना त्रास होणार नाही असा विश्वास वाटतो. पण पावसाळापूर्व केलेली कामे तेव्हाच यशस्वी मानता येतील जेव्हा पावसाळयात नागरिकांच्या घरात पाणी जाणार नाही असे मत महापौर सुजाता पाटील यांनी व्यक्त केले. सुरु असलेली कामे अशीच गतीमानतेने सुरु ठेवावीत असे आदेशित करत भर पावसात पुन्हा पाहणी दौरा करणार असल्याचे त्यांनी सांगितले.
आगामी पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर महापौर सुजाता पाटील यांनी दिघ्यापासून बेलापूरपर्यंत सुरुवात करत नैसर्गिक नालेसफाई कामांची तसेच विशेषत्वाने होल्डिंग पाँड स्वच्छतेची पाहणी केली. याप्रसंगी त्यांच्यासमवेत उपमहापौर दशरथ भगत, महापालिका आयुक्त डॉ. कैलास शिंदे, आरोग्य समितीचे सभापती डॉ. जयाजी नाथ तसेच आपापल्या विभागांमध्ये तेथील स्थानिक नगरसेवक उपस्थित होते. शहर अभियंता शिरीष आरदवाड, अतिरिक्त शहर अभियंता अरविंद शिंदे, परिमंडळ 1 उपआयुक्त सोमनाथ पोटरे, परिमंडळ 2 उपआयुक्त संजय शिंदे, घनकचरा व्यवस्थापन विभाग उपआयुक्त डॉ.अजय गडदे व इतर अधिकारी या दौऱ्याप्रसंगी उपस्थित होते.
दिघा येथील ग्रीन वर्ल्ड जवळील नाल्यामधून एमसीडीसीएलच्या मोठया वायर्स जात असल्याने नाल्यात नागरिकांमार्फत टाकला जाणार कचरा अडकून राहतो. ही परिस्थिती अनेक ठिकाणी निदर्शनास येते, त्यामुळे या वायर्स एकत्रितपणे वरच्या बाजूला बांधून ठेवाव्यात जेणेकरुन प्रवाहातील वाहते पाणी अडणार नाही व रस्त्यावर येणार नाही याची काळजी घेण्याचे निर्देश महापौर महोदयांनी दिले. या स्वच्छ केलेल्या नाल्यांमध्ये नागरिकांनीही प्लास्टिक बॉटल, प्लास्टिक पिशव्या अथवा कचरा न टाकण्याची दक्षता घ्यावी जेणेकरुन ते पुन्हा अस्वच्छ होणार नाही असे आवाहनही महापौरांनी केले. काही ठिकाणी उद्योगसमुहांच्या बाजूने वाहत असलेल्या नाल्यांमध्ये कंपनीच्या बाजूने कचरा टाकला जातो. त्याला प्रतिबंध करण्यासाठी उद्योग समूहांसोबत समन्वय साधण्याचेही महापौरांनी निदर्शित केले. दिघा, ऐरोली, घणसोली, कोपरखैरणे, तुर्भे, एपीएमसी मार्केट, एमआयडीसी क्षेत्र, वाशी, सानपाडा, जुईनगर, नेरुळ, बेलापूर अशा विविध क्षेत्रांमधील नाले सफाईची पाहणी करण्यासोबतच होल्डिंग पाँड क्षेत्रांचीही महापौरांनी पाहणी केली. होल्डिंग पाँडमध्ये 70 ते 80 टक्के गाळ भरलेला असून खारफुटीमुळे गाळ काढण्यास परवानगी मिळत नाही. याबाबत वनमंत्री गणेश नाईक यांच्यामार्फत परवानगी मिळण्यासाठी प्रयत्न सुरु असून त्याला लवकरच यश येईल असा विश्वास महापौरांनी व्यक्त केला. तोपर्यंत होल्डिंग पाँडच्या जेवढ्या भागाची परवानगी आहे तेथील गाळ काढणे सुरु असून होल्डिंग पाँडच्या ठिकाणी जास्त क्षमतेचे पाणी उपसा पंप बसवले जात आहेत. जेणेकरुन अतिवृष्टी काळात होल्डिंग पाँडमध्ये जमा होणारे पावसाचे पाणी उपसून खाडी भागात टाकण्यात येईल. होल्डिंग पाँड हे नवी मुंबई शहराचे सुरक्षा कवच असून ते संरक्षित राखण्यासाठी गतीमान पावले उचलण्यात येत आहेत असेही महापौरांनी सांगितले. नवी मुंबई क्षेत्रात काही सखल भाग असून भरती आणि अतिवृष्टी एकाचवेळी आल्यास त्या भागात काही प्रमाणात पाणी साचते. अशा ठिकाणी अधिकच्या पाणी उपसा पंपांची आधीच सोय करुन ठेवावी असे निर्देश महापौर महोदयांनी दिले. पावसाळी कालावधीत सर्व विभाग कार्यालये तसेच मुख्यालय या ठिकाणी चोवीस तास हेल्पलाईन कार्यान्वित असेल व आपत्त्कालीन मदत कक्ष सुरु राहील याची प्राधान्याने अंमलबजावणी करावी असेही महापौरांमार्फत निदर्शित करण्यात आले. दिघ्यापासून सुरु झालेल्या या पाहणी दौऱ्यात चांदणी चौगुले, गौरी आंग्रे, सायली शिंदे, दिव्या गायकवाड, प्रणाली लाड, सोनवी लाड, डॉ.प्रणाली पाटील, भाऊ भापकर, सुनिल कुरकुटे, शुभांगी पाटील, शशिकला पाटील, कविता पाटील, सलुजा सुतार, अमित मेढकर आदी पदाधिकारी, नगरसेवक नगरसेविका आपापल्या क्षेत्रामध्ये उपस्थित होते.
एकंदरीतच नवी मुंबईतील नाले सफाई कामांची पाहणी केल्यानंतर समाधानकारक काम झाले असल्याचे दिसून येत असून या कामाचा वेग असाच सुरु ठेवावा व नवी मुंबईकर नागरिकांना पावसाळयात पाणी भरणार नाही असा दिलासा देणारे काम करावे असे निर्देश देत नवी मुंबईच्या महापौर सुजाता पाटील यांनी दिले.
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai