एपीएमसीतील 2 अधिकारी लाच स्वीकारताना ताब्यात
- by Aajchi Navi Mumbai
- May 22, 2026
- 20
नवी मुंबई : सिडको, नव मुंबई महापालिका पाठोपाठ एपीएमसी प्रशासनातील भ्रष्टाचारवृत्ती समोर आली आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) मंगळवारी केलेल्या कारवाईत स्वच्छता विभागातील दोन वरिष्ठ अधिकाऱ्यांना 1 लाख 40 हजार रुपयांची लाच स्वीकारताना रंगेहात अटक केली. थकीत देयकाचा धनादेश देण्यासाठी कंत्राटदाराकडे 15 टक्के कमिशनची मागणी केल्याप्रकरणी ही कारवाई करण्यात आली.
या प्रकरणात घनकचरा व्यवस्थापन व स्वच्छता उपसचिव डॉ. दीपक आवटी आणि स्वच्छता प्रभारी निरीक्षक समीर म्हात्रे यांना अटक करण्यात आली आहे. एसीबीच्या नवी मुंबई पथकाने एपीएमसीच्या मुख्य प्रशासकीय इमारतीतील उपसचिव कार्यालयात सापळा रचून ही कारवाई केली.मिळालेल्या माहितीनुसार, एपीएमसी परिसरातील स्वच्छता कामाचे कंत्राट सांभाळणाऱ्या एका कंत्राटदाराचे मोठ्या रकमेचे देयक प्रशासनाकडे काही महिन्यांपासून प्रलंबित होते. हे देयक मंजूर करून धनादेश सुपूर्द करण्यासाठी संबंधित अधिकाऱ्यांनी एकूण रकमेच्या 15 टक्के कमिशनची मागणी केल्याचा आरोप आहे. लाच देण्यास नकार देत संबंधित कंत्राटदाराने एसीबीकडे तक्रार दाखल केली होती.
तक्रारीची गोपनीय पडताळणी केल्यानंतर पोलीस उपअधीक्षक धर्मराज सोनके यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष पथकाने कारवाईची योजना आखली. ठरल्याप्रमाणे तक्रारदार कंत्राटदार लाचेची रक्कम घेऊन उपसचिव कार्यालयात गेला. त्यावेळी दोन्ही अधिकाऱ्यांनी 1 लाख 40 हजार रुपयांची रोख रक्कम स्वीकारताच एसीबीच्या पथकाने त्यांना रंगेहात पकडले. घटनास्थळावरून लाचेची रक्कमही जप्त करण्यात आली.
या कारवाईमुळे आशिया खंडातील मोठ्या कृषी बाजारपेठांपैकी एक असलेल्या एपीएमसीतील प्रशासकीय कारभारावर पुन्हा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. स्वच्छतेसारख्या मूलभूत सेवांशी संबंधित कामांमध्येही कंत्राटदारांकडून कमिशनची मागणी होत असल्याचा आरोप पुढे आल्याने व्यापारी आणि बाजार समितीतील घटकांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे. या प्रकरणात आणखी काही अधिकारी किंवा कर्मचाऱ्यांचा सहभाग आहे का, तसेच यापूर्वीही अशा प्रकारे कंत्राटदारांकडून पैसे उकळण्यात आले होते का, याचा तपास एसीबीकडून सुरू असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai