पोलीस आयुक्तालयात बदल्यांचे सत्र
- by Aajchi Navi Mumbai
- May 22, 2026
- 22
नवी मुंबई ः पोलीस आयुक्तालयात 15 मे रोजी व्यापक बदल्यांचे सत्र राबविण्यात आले. सह पोलीस आयुक्त पदावरील बदल्यांपासून सुरुवात झालेल्या या प्रक्रियेत चार नवे पोलीस उपायुक्त नियुक्त करण्यात आले असून, त्याच दिवशी 474 पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश जारी करण्यात आले. त्यामुळे नव्या उपायुक्तांकडे कोणते परिमंडळ आणि विभाग सोपवले जाणार, याकडे संपूर्ण पोलीस दलाचे लक्ष लागले आहे.
नवी मुंबई पोलीस दलाचे अपर पोलीस आयुक्त दीपक साकोरे यांना शासनाने पदोन्नती देताना नवी मुंबई पोलीस दलातच त्यांना सह पोलीस आयुक्तपदी नियुक्ती देण्याची खबरदारी घेतली आहे. सह पोलीस आयुक्त संजय येनपुरे यांची विशेष पोलीस महानिरीक्षक (व्हीआयपी सुरक्षा) या पदावर बदली झाल्यानंतर हे पद रिक्त झाले होते. याच पदावर साकोरे यांची पदोन्नतीने नियुक्ती करण्यात आली. वाहतूक विभागाचे उपायुक्त तिरुपती काकडे, परिमंडळ-3 चे प्रशांत मोहिते, मुख्यालय प्रशासनाचे संजयकुमार पाटील आणि परिमंडळ-1 चे पंकज डहाणे यांची बदली झाली आहे. त्यांच्या जागी पोलीस उपायुक्त योगेश चव्हाण, राहुल खाडे, विशाल ठाकूर आणि विजय खरात यांची नियुक्ती नवी मुंबई पोलीस दलात करण्यात आली आहे. तसेच 8216;डायल 1128217; विभागासाठी प्रीती टिपरे यांच्या जागी तानाजी चिखले यांची नियुक्ती करण्यात आली आहे. नव्याने नियुक्त उपायुक्तांना नवी मुंबईचे पोलीस आयुक्त मिलिंद भारंबे कोणती जबाबदारी देतात, याबाबत उत्सुकता आहे.
पोलीस कर्मचाऱ्यांच्या बदल्यांमध्ये 10 पोलीस उपनिरीक्षक, 29 सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक, 182 पोलीस हवालदार, 65 पोलीस नाईक, 61 पोलीस शिपाई, 44 महिला पोलीस शिपाई, 23 महिला पोलीस नाईक, 57 महिला पोलीस हवालदार आणि तीन महिला सहाय्यक पोलीस उपनिरीक्षकांचा समावेश आहे. बदली झालेल्या सर्व अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना तातडीने कार्यमुक्त करण्याचे निर्देश देण्यात आले असून, विलंब झाल्यास संबंधित प्रभारी अधिकाऱ्यांना जबाबदार धरण्यात येणार असल्याचे आदेशात स्पष्ट करण्यात आले आहे.
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai