4600 कोटींच्या अर्थसंकल्पाला मंजुरी

नवी मुंबई : महापालिकेच्या स्थायी समितीने सादर केलेल्या अर्थसंकल्पामध्ये महासभेने 450 कोटींची वाढ सुचवून 4600 कोटींच्या अर्थसंकल्पाला अंतिम मंजुरी दिली आहे. अर्थसंकल्पामध्ये स्थायी समिती आणि महासभेने वाढ केलेली रक्कम 750 कोटी झाली आहे.

पालिका आयुक्त अण्णासाहेब मिसाळ यांनी 18 फेब्रुवारी रोजी 2020-21 या वर्षासाठीचे 3850 कोटी रुपयांचे अंदाजपत्रक स्थायी समिती सभेत सादर केले होते. त्यानंतर या अर्थसंकल्पावर स्थायी समिती सभेत चर्चा करून 300 कोटी रुपयांची वाढ करण्यात आली होती. बुधवार, 11 मार्च रोजी संपन्न झालेल्या मार्च महिन्याच्या सर्वसाधारण सभेत स्थायी समितीचे सभापती नवीन गवते यांनी सदर अर्थसंकल्प महासभेत मांडला. महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीची घोषणा कोणत्याही क्षणी होण्याची शक्यता असल्याने अर्थसंकल्प मांडलेल्याच दिवशी चर्चा करून मंजुरी देण्यात आली. महापालिकेत निवडून आलेले 111 नगरसेवक आणि 5 स्वीकृत नगरसेवक असे एकूण 116 नगरसेवक आहेत. अर्थसंकल्पाच्या चर्चेसाठी आयोजित करण्यात आलेल्या सभेला अनेक नगरसेवक अनुपस्थित होते. अर्थसंकल्पासारख्या महत्त्वाच्या विषयावर फक्त 18 सदस्यांनी चर्चा करून विविध नागरी विकासकामांच्या सूचना आणि उत्पन्नात वाढ सुचविली. सदस्यांनी नाला व्हिजन, भुयारी मार्ग, उड्डाणपूल, पार्किंग, उद्यानांचा विकास, पर्यटनस्थळांचा विकास, मार्केट, रस्ते आदी विषयांवर चर्चा केली. तर अनेक नगरसेवकांनी मागील अर्थसंकल्पात मांडलेली कामे अद्याप झाली नसल्याने प्रशासनावर नाराजी व्यक्त केली. सभागृह नेते रवींद्र इथापे यांनी सभागृहाच्या वतीने अर्थसंकल्पात वाढ सुचविली. महापौर जयवंत सुतार यांनी मागील अर्थसंकल्पातील तरतुदी प्रशासन बदलल्याने राहून गेल्याचे सांगत प्रशासनाच्या कामकाजावर नाराजी व्यक्त केली. शाळांमध्ये सीसीटीव्ही बसविण्याचे काम प्रशासनाच्या उदासीनतेमुळे रखडले असून, भरती प्रकिया आणि साहित्य खरेदीला प्रशासनाने वेळकाढूपणा केल्याचा आरोप महापौर सुतार यांनी केला.