मुंबईत बेस्ट सेवेला ब्रेक
- by Aajchi Navi Mumbai
- Jun 20, 2026
- 36
कर्मचाऱ्यांचा संप; लाखो प्रवाशांना फटका
मुंबई - बृहन्मुंबई विद्युत पुरवठा आणि परिवहन कर्मचाऱ्यांच्या संयुक्त कृती समितीने विविध प्रलंबित मागण्यांसाठी गुरुवारी मध्यरात्रीपासून बेमुदत संप पुकारला. त्यामुळे मुंबईतील सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेवर मोठा परिणाम झाला. संपामुळे मुंबईतील बेस्ट बस सेवा विस्कळीत झाली असून, लाखो प्रवाशांना त्याचा फटका बसला. राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी बेस्ट कामगार कृती समितीच्या सदस्यांची बैठक घेऊन संप मागे घेण्याचे आवाहन केले.
बेस्टच्या विद्युत आणि परिवहन अशा दोन्ही सेवांच्या सुमारे 23 हजार कर्मचाऱ्यांनी विविध मागण्यांसाठी शुक्रवारपासून बेमुदत संपाची हाक दिल्याने शहरातील बससेवा विस्कळीत झाली. बेस्टच्या रोज 2766 बस मुंबईत धावतात. त्यापैकी फक्त 36 बस शुक्रवारी प्रवासी सेवेत होत्या. त्यामुळे कामावर आणि शाळा-कॉलेजांकडे जाणाऱ्या नागरिकांची मोठी गैरसोय झाली आहे. दादर, घाटकोपर, कुर्ला, अंधेरी यांसारख्या प्रमुख रेल्वे स्थानकांबाहेर प्रवाशांची मोठी गर्दी पाहायला मिळाली. टॅक्सी आणि रिक्षांसाठीही लांबच लांब रांगा लागल्याचे चित्र होते. बेस्ट संयुक्त कामगार कृती समितीने सांगितले की, अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या मागण्यांबाबत प्रशासनाला वारंवार निवेदने देण्यात आली होती. मात्र, त्यावर कोणताही ठोस निर्णय न झाल्याने संपाचा निर्णय घ्यावा लागला. कर्मचाऱ्यांच्या प्रमुख मागण्यांमध्ये बेस्टचा अर्थसंकल्प मुंबई महानगरपालिकेच्या मुख्य अर्थसंकल्पात विलीन करणे, कंत्राटीकरण आणि पीपीपी तत्त्वावरील मालमत्ता पुनर्विकासाला विरोध, वेटलिस्टवरील कर्मचाऱ्यांना कायम सेवेत सामावून घेणे, बेस्टमधील 10 हजार रिक्त पदे तातडीने भरणे तसेच निवृत्त कर्मचाऱ्यांची प्रलंबित देणी त्वरित अदा करणे, सातव्या वेतन आयोगाची अंमलबजावणी, पदोन्नती प्रक्रिया राबवणे आणि खासगीकरणाला आळा घालणे यांचा समावेश आहे.
राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी सायंकाळी बेस्ट कामगार कृती समितीच्या सदस्यांची बैठक घेतली. त्यावेळी कामगारांच्या मागण्यांचा सहानुभूतीने विचार केला जाईल असे आश्वासन सरनाईक यांनी करत संप मागे घेण्याचे आवाहन केले आहे.
- रिक्षाचालकांकडून जादा भाडे
बससेवा विस्कळीत होण्याच्या शक्यतेमुळे प्रवासी पर्यायी वाहतुकीचा आधार घेत आहेत. याच संधीचा फायदा घेत काही रिक्षा चालकांकडून जादा भाडे आकारले जात आहे. विशेषतः शेअर रिक्षा चालकांनी अचानक भाडेवाढ केल्याने प्रवाशांना आर्थिक फटका बसत आहे. त्यामुळे प्रवाशांमध्ये नाराजीचे वातावरण निर्माण झाले आहे.
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai