प्रकल्पग्रस्त नेत्यांची नामकरण आंदोलनाकडे पाठ
- by Aajchi Navi Mumbai
- Jul 04, 2026
- 33
8 जुलैला रश्मिता पोपेटा करणार मोर्चाचे नेतृत्व
पनवेल : नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला लोकनेते दि.बा.पाटील यांचे नाव देण्यास दिरंगाई केली जात असल्याने आगरी-कोळी समाजबांधवांमध्ये असंतोष पसरला आहे. याबाबत स्थानिक प्रकल्पग्रस्त रश्मिता पोपेटा हिने गेल्या आठवडाभरापासून उपोषण सुरु केले असून तिला सध्या रुग्णालयात भरती केले आहे. हॉस्पिटलमधूनही आंदोलन सुरूच ठेवले आणि याबाबत 8 जुलैला विधानभवनावर मोर्चाचे आयोजन केले जाणार असल्याची घोषणा आयोजकांनी केली आहे. या नामकरण आंदोलनाकडे मात्र स्थानिक नेत्यांनी व मंत्र्यांनी पाठ फिरवल्याने नाराजीचा सुर प्रकल्पग्रस्तांमध्ये उमटला आहे. ो
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला प्रकल्पग्रस्तांचे नेते दि.बा.पाटील यांचे नाव द्यावे अशी मागणी गेली अनेक वर्ष स्थानिक प्रकल्पग्रस्त करतआहेत. याबाबत मुख्यमंत्री फडणवीस तसेच केंद्रिय विमानउड्डाण मंत्री यांनाही याबाबतीत अनेकवेळा निवेदन देण्यात आली आहेत. विमानतळ सुरु होऊन सहा महिने उलटून गेले तरी सदर विमानतळाला दि.बा.पाटलांचे नाव देण्याबाबत कोणतीही हालचाल दिसत नसल्याने पुन्हा एकदा आंदोलनाची हाक स्थानिक प्रकल्पग्रस्तांनी दिली आहे. त्याचाच भाग म्हणून रश्मिता पोपेटा हिने आंदोलनाची दुसरी इनिंग सुरु केली आहे. तिने समाजाला पुन्हा एकदा दिबांसाठी आंदोलनाला चेतविले आहे.
गेले आठवडाभर रश्मिता पोपेटा या उपोषणावर असून प्रकृती खालवल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तेथूनही त्यांनी आपले उपोषण सुरुच ठेवल्याने वातावरणात तणाव निर्माण झाला आहे. गेल्या आठवडाभरात एकाही स्थानिक प्रकल्पग्रस्त नेत्यांनी, आमदारांनी वा मंत्र्यांनी उपोषणस्थळी भेट देवून किंवा सदर उपोषण मागे घेण्यासाठी कोणतेही प्रयत्न केल्याचे दिसत नाही. त्यामुळे स्थानिकांनी याबाबत मोठी नाराजी व्यक्त केली आहे. शासनाच्या व नेत्यांच्या असहकारामुळे चालू अधिवेशनात मोर्चा काढण्याचा निर्णय घेण्यात आला असून तो लोकनेते दिबा प्रेमी नामकरण समितीच्या बॅनरखाली काढण्यात येणार आहे.
या आंदोलनाची सुरुवात पनवेल शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकातून महाराजांना पुष्पहार घालून रश्मिताच्या हस्ते नारळ वाढवून होईल, अशी माहिती समितीचे प्रमुख सदस्य, माजी आमदार बाळाराम पाटील यांनी दिली. मोर्चात सुमारे 15 हजार आंदोलक सहभागी होतील अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. त्याकरिता पनवेल, उरण तालुका आणि शहरी भागात गाव बैठकांचे आयोजन करण्यात आले आहे. रश्मिता पोपेटा हिच्या आंदोलनाना पाठिंबा देणाऱ्या महिला संघटना, कलाकार संघटना, बैलगाडा संघटना, 27 गाव संघटना, 10 गाव संघटना, विविध राजकीय पक्ष, सामाजिक संस्था, औषध विक्री संघटना, आगरी समाज संघटना अशा विविध संघटना मोर्चात सक्रिय सहभाग घेणार असल्याचे त्या संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी कळविले आहे. आंदोलनात स्वतः रश्मिता पोपेटा, खासदार बाळ्यामामा ऊर्फ सुरेश म्हात्रे, माजी आमदार बाळाराम पाटील, सामाजिक कार्यकर्ते कांतीलाल कडू, माजी आमदार मनोहरशेठ भोईर, उरणच्या नगराध्यक्ष भावना घाणेकर, सुधाकर पाटील, स्थानिक सामाजिक संस्थांचे पदाधिकारी सहभागी होतील.
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai