वृक्षांच्या बुंध्याभोवतीचे काँक्रिट हटवा
- by Aajchi Navi Mumbai
- Jul 18, 2026
- 24
वृक्ष पाहणीदरम्यान उपायुक्तांचे अभियंत्यांना निर्देश
पनवेल ः महानगरपालिका हद्दीत सुरू असलेल्या मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर वृक्ष उन्मळून पडण्याच्या घटनांची गंभीर दखल घेऊन आयुक्त मंगेश चितळे यांच्या आदेशानुसार दि. 15 जुलै 2026 रोजी उपायुक्त (वृक्ष प्राधिकरण) स्वरूप खारगे यांनी वृक्ष प्राधिकरण विभागाचे विभाग प्रमुख विवेक जळे तसेच संबंधित अभियंत्यांसमवेत शहरातील विविध सार्वजनिक रस्त्यांलगत असलेल्या वृक्षांची संयुक्त पाहणी केली.
संयुक्त पाहणीदरम्यान अनेक वृक्षांच्या बुंध्याभोवती सिमेंट काँक्रिट, डांबर, पेव्हर ब्लॉक तसेच इतर अभेद्य बांधकाम करण्यात आल्याचे निदर्शनास आले. अशा प्रकारच्या काँक्रिटीकरणामुळे वृक्षांच्या मुळांना आवश्यक हवा, पाणी यांचा पुरवठा होत नाही. परिणामी मुळांची नैसर्गिक वाढ खुंटून वृक्षांची जमिनीवरील पकड कमकुवत होते आणि अतिवृष्टी व वादळी वाऱ्याच्या वेळी वृक्ष उन्मळून पडण्याचा धोका वाढतो. या बाबीची गांभीर्याने दखल घेत उपायुक्त स्वरूप खारगे यांनी संबंधित अभियंत्यांना अशा ठिकाणांचे तातडीने सर्वेक्षण करून वृक्षांच्या बुंध्याभोवती आवश्यक त्या प्रमाणात काँक्रिटीकरण, सिमेंट काँक्रिट व पेव्हर ब्लॉक काढून मोकळी मातीची जागा उपलब्ध करून देण्याच्या सूचना दिल्या. तसेच भविष्यात रस्ते, पदपथ, सुशोभीकरण व इतर विकासकामांदरम्यान वृक्षांच्या संरक्षणासाठी आवश्यक खुली जागा राखण्याबाबतही निर्देश देण्यात आले.
पनवेल महापालिकेमार्फत सर्व गृहनिर्माण संस्था, व्यापारी संकुले, शासकीय व निमशासकीय कार्यालये तसेच खासगी वृक्षधारकांना आवाहन करण्यात येत आहे की, त्यांच्या आवारातील वृक्षांच्या बुंध्याभोवती पूर्णपणे करण्यात आलेले पेव्हर ब्लॉक, सिमेंट काँक्रिट अथवा इतर अभेद्य बांधकाम आवश्यक त्या प्रमाणात काढून वृक्षांच्या मुळांना हवा, पाणी व नैसर्गिक वाढीसाठी मोकळी जागा उपलब्ध करून द्यावी. तसेच पावसाळ्याच्या कालावधीत धोकादायक, वाळलेले किंवा झुकलेले वृक्ष अथवा फांद्या आढळल्यास तात्काळ विहित परवानगी घेऊन कार्यवाही करावी.
पर्यावरण संरक्षण, वृक्षसंवर्धन आणि नागरिकांची सुरक्षितता या बाबींना सर्वोच्च प्राधान्य देत पनवेल महानगरपालिका आवश्यक प्रतिबंधात्मक उपाययोजना सातत्याने राबवत असून, या मोहिमेत नागरिकांनी सक्रिय सहभाग व सहकार्य करावे. - मंगेश चितळे, आयुक्त पनवेल महानगरपालिका
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai