सिम्प्लेक्सचा होणार क्लस्टर पुनर्विकास
- by Aajchi Navi Mumbai
- Jul 18, 2026
- 25
पालिकेची अधिसूचना; 30 दिवसांत मागवणार सूचना आणि हरकती
नवी मुंबई : घणसोली सेक्टर-7 येथील सिम्प्लेक्स हाऊसिंग कंडोमिनियमसाठी महापालिकेने नागरी पुनरुत्थान आराखड्याची अधिसूचना 14 जुलै 2026 रोजी प्रसिद्ध केली असून, त्यावर पुढील 30 दिवसांत सूचना आणि हरकती मागविण्यात आल्या आहेत. या प्रक्रियेमुळे साडेतीन हजार घरांच्या पुनर्विकासाचा मार्ग मोकळा झाला असून साडेतीन हजार सदनिका धारकांना दिलासा मिळाला आहे.
घणसोलीतील सिम्प्लेक्स ही माथाडी कामगारांची मोठी वसाहत आहे. अनेक वर्षांपूर्वी उभारलेल्या या इमारती निकृष्ट दर्जाच्या बांधकामामुळे धोकादायक बनल्या आहेत. अनेक इमारतींच्या भिंती आणि खांबांना तडे गेले असून छताचे प्लास्टर कोसळण्याच्या घटनाही घडत आहेत. त्यामुळे रहिवाशांना असुरक्षित परिस्थितीत राहावे लागत असल्याने संपूर्ण वसाहतीच्या पुनर्विकासाची मागणी अनेक वर्षांपासून होत होती. या मागणीसाठी रहिवाशांनी विविध आंदोलनेही केली होती. इमारतींच्या पुनर्विकासासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली खासदार नरेश म्हस्के आणिशिवसेना /जिल्हाप्रमुख किशोर पाटकर यांनी पाठपुरावा केला होता. त्यानंतर महापालिकेने नागरी पुनरुत्थान आराखड्याची अधिसूचना प्रसिद्ध केली आहे. या निर्णयाचे शिवसेना नगरसेवक सौरभ शिंदे यांनी स्वागत केले आहे.
महापालिकेने प्रसिद्ध केलेल्या अधिसूचनेनुसार हा आराखडा महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन व नगररचना अधिनियम, 1966 तसेच एकत्रित विकास नियंत्रण व प्रोत्साहन नियमावलीतील विनियम 14.8 अंतर्गत तयार करण्यात आला आहे. शहरातील अधिकृत, मोडकळीस आलेल्या आणि पुनर्विकासाची गरज असलेल्या इमारतींचा नियोजनबद्ध विकास करण्यासाठी नागरी पुनरुत्थान योजना राबविण्यात येत असून, पहिल्या टप्प्यात घणसोली सेक्टर-7 मधील क्लस्टर क्रमांक 4 अर्थात सिम्प्लेक्स हाऊसिंग कंडोमिनियमचा समावेश करण्यात आला आहे.
सिम्प्लेक्समधील बहुतांश कुटुंबे सध्या एकखोलीच्या घरांमध्ये वास्तव्यास असून, पुनर्विकासाची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर त्यांना नव्या घरांची संधी उपलब्ध होणार आहे. या प्रकल्पामुळे नवी मुंबईतील इतर जुन्या सिडको वसाहतींमधील क्लस्टर पुनर्विकासाच्या प्रस्तावांनाही गती मिळण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.
- अधिसूचनेत काय?
महापालिकेच्या अधिसूचनेनुसार, घणसोली सेक्टर-7 मधील क्लस्टर क्रमांक 4 अंतर्गत सी-1 ते सी-5, डी-1 ते डी-5, ई-1 ते ई-10, एफ-1 ते एफ-10 आणि एच-1 ते एच-4 या इमारतींचा समावेश करण्यात आला आहे. या क्लस्टरचे एकूण क्षेत्रफळ 67 हजार 146.20 चौरस मीटर असून अंतिम क्षेत्रफळ व हद्द प्रत्यक्ष मोजणीनंतर निश्चित करण्यात येणार आहे. - आयुक्तांच्या अधिकारात आराखडा प्रसिद्ध
महापालिकेने स्पष्ट केले आहे की, राज्य शासनाने गेल्या काही वर्षांत नागरी पुनरुत्थान योजनेसंदर्भात विविध महत्त्वाचे निर्णय घेतले आहेत. जानेवारी 2026 मध्ये शासनाने 300 चौ. फुटांपेक्षा कमी कार्पेट क्षेत्र असलेल्या सदनिकांबाबतच्या नियमांमध्ये शिथिलता देण्याचे आदेश दिले. त्यानंतर एप्रिल 2026 मध्ये सिडको विकसित इमारतींसाठी 75 टक्के लहान सदनिकांची अट लागू राहणार नसल्याचे स्पष्ट केले आहे. याच अनुषंगाने 17 जून 2026 रोजी झालेल्या उच्चाधिकार समितीच्या बैठकीत घणसोलीतील सिम्प्लेक्स हाऊसिंग क्लस्टरचा नागरी पुनरुत्थान आराखडा अधिसूचित करण्याची शिफारस करण्यात आली होती. त्यानुसार आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांनी आपल्या अधिकारांचा वापर करून ही अधिसूचना प्रसिद्ध केली आहे.
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai