महाराष्ट्राला जागतिक दागिने उत्पादन-निर्यातीचे केंद्र बनविणार
- by Aajchi Navi Mumbai
- Oct 26, 2026
- 24
महापे येथे 22 एकरांवर ‘इंडिया ज्वेलरी पार्क’च्या कामाचा शुभारंभ; उद्योगांना सर्वतोपरी सहकार्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आश्वासन
नवी मुंबई : महाराष्ट्राला जागतिक स्तरावरील दागिने उत्पादन आणि निर्यातीचे प्रमुख केंद्र बनविण्याच्या दिशेने महत्त्वपूर्ण पाऊल उचलण्यात आले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते नवी मुंबईतील महापे येथे ‘इंडिया ज्वेलरी पार्क, मुंबई’ प्रकल्पाच्या कामाचा शुभारंभ करण्यात आला. सुमारे 22 एकर क्षेत्रावर विकसित होणारा हा अत्याधुनिक प्रकल्प राज्याच्या औद्योगिक विकासाला, निर्यातीला आणि रोजगारनिर्मितीला चालना देणारा ठरेल, असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला.
मुंबई आणि महाराष्ट्राकडे असलेले कुशल मनुष्यबळ, दागिने उद्योगातील अनुभवी कारागीर, उद्योजकतेची परंपरा, व्यापाराचे विस्तृत जाळे आणि अनुकूल औद्योगिक वातावरण ही राज्याची प्रमुख बलस्थाने आहेत. या क्षमतांचा प्रभावी वापर करून महाराष्ट्राला जागतिक दागिने उद्योगातील महत्त्वाचे केंद्र बनविण्याची संधी ‘इंडिया ज्वेलरी पार्क’च्या माध्यमातून उपलब्ध झाली आहे. सरकार आणि उद्योग क्षेत्रातील समन्वयातून हा प्रकल्प साकार होत असून, भविष्यात दागिने उद्योगाच्या विकासात तो महत्त्वाची भूमिका बजावेल, असे फडणवीस यांनी सांगितले.
जागतिक व्यापारातील बदल आणि अमेरिका व चीनसारख्या प्रमुख बाजारपेठांमधील घडामोडींमुळे उद्योगांसमोर नवी आव्हाने निर्माण होत आहेत. या परिस्थितीत उद्योगांनी बदलत्या बाजारपेठांचा अभ्यास करून आधुनिक तंत्रज्ञानाचा स्वीकार, उत्पादनातील नावीन्य आणि निर्यातीच्या नव्या संधींवर भर देणे आवश्यक आहे. ‘इंडिया ज्वेलरी पार्क’ मुळे दागिने उद्योगाला आधुनिक सुविधा आणि विकासासाठी सक्षम व्यासपीठ उपलब्ध होईल, असे मुख्यमंत्री म्हणाले. उद्योगांच्या विकासासाठी केवळ जमीन उपलब्ध करून देणे पुरेसे नसून वीज, पाणी, रस्ते, भांडवल, पायाभूत सुविधा आणि विविध विभागांच्या परवानग्या वेळेत मिळणेही तितकेच महत्त्वाचे आहे. ‘इंडिया ज्वेलरी पार्क’च्या उभारणीत कोणत्याही अडचणी निर्माण झाल्यास संबंधित अधिकाऱ्यांनी तत्परतेने मदत करावी. प्रकल्पाचे काम वेगाने पूर्ण करण्यासाठी शासनाकडून आवश्यक ते सर्व सहकार्य करण्यात येईल, असे आश्वासन फडणवीस यांनी दिले. उद्योगांच्या गरजा समजून घेऊन प्रशासकीय अडथळे दूर करणे आणि शासन-उद्योग भागीदारी मजबूत करणे, ही सरकारची भूमिका असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 2047 पर्यंत विकसित भारत घडविण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. हे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी उत्पादन, निर्यात, रोजगारनिर्मिती आणि उद्योजकतेला चालना देणे आवश्यक आहे. भारताची पाच ट्रिलियन डॉलर अर्थव्यवस्थेकडे वाटचाल सुरू असताना महाराष्ट्रही एक ट्रिलियन डॉलर अर्थव्यवस्थेचे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी प्रयत्नशील आहे. ‘इंडिया ज्वेलरी पार्क’सारखे प्रकल्प राज्याच्या आर्थिक विकासाला गती देण्यासोबतच जागतिक बाजारपेठेत महाराष्ट्राची ओळख अधिक भक्कम करतील, असे मुख्यमंत्री फडणवीस यांनी नमूद केले. या प्रकल्पाच्या उभारणीसाठी उद्योग क्षेत्रातील नेतृत्वाने केलेल्या प्रयत्नांचे महत्त्व भविष्यातही अधोरेखित केले जाईल. आज उभारण्यात येणाऱ्या या प्रकल्पाचे महत्त्व पुढील 30 ते 40 वर्षांनंतरही जाणवेल, असेही त्यांनी सांगितले. या वेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, मंत्री गणेश नाईक, आमदार मंदा म्हात्रे, इंडिया ज्वेलरी पार्क मुंबईचे अध्यक्ष किरीट भंसाली यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते.
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai