नैना प्रकल्प ठरणार महाराष्ट्राच्या विकासाचे नवे ग्रोथ इंजिन
- by Aajchi Navi Mumbai
- Oct 26, 2026
- 32
15 लाख रोजगारनिर्मितीचे उद्दिष्ट; भूमिपुत्रांना प्राधान्य देण्याची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ग्वाही
उरण बायपास पुलासह विमानतळ जोडणाऱ्या तीन पुलांचे लोकार्पण; नैना क्षेत्रातील पायाभूत सुविधांच्या कामांचा शुभारंभ
पनवेल : नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या प्रभाव क्षेत्रातील नैना (नवी मुंबई विमानतळ प्रभाव अधिसूचित क्षेत्र) प्रकल्पाच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या विकासाला नवे ग्रोथ इंजिन मिळणार आहे. या परिसराच्या नियोजनबद्ध विकासातून सुमारे 15 लाख रोजगारनिर्मितीचे उद्दिष्ट असून, त्यापैकी पाच लाख रोजगार उच्च वेतनाचे असतील. या रोजगारसंधींमध्ये भूमिपुत्रांना प्राधान्य देण्यात येईल. शेतकऱ्यांचा विश्वास संपादन करून त्यांना विकासाचे भागीदार बनविण्यासह आधुनिक पायाभूत सुविधा आणि सक्षम कनेक्टिव्हिटीच्या माध्यमातून ‘तिसरी मुंबई’ विकसित केली जाईल, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.
पनवेल, रायगड येथे मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते नैना क्षेत्रातील विविध विकासकामांचा शुभारंभ, भूधारकांना मालमत्ता पत्रकांचे वितरण तसेच नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाशी कनेक्टिव्हिटी वाढविणाऱ्या महत्त्वपूर्ण प्रकल्पांचे लोकार्पण करण्यात आले. यामध्ये नैना टीपीएसमधील विविध पायाभूत सुविधा प्रकल्पांचे भूमिपूजन, एसबीआर-9, बीआर-4 आणि बीआर-5 या पुलांचे लोकार्पण तसेच उरण बायपास पुलाचा समावेश आहे. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ हा केवळ विमान वाहतुकीचा प्रकल्प नसून, संपूर्ण परिसराच्या आर्थिक विकासाला चालना देणारा महत्त्वाचा घटक आहे. विमानतळाच्या प्रभाव क्षेत्राचा नियोजनबद्ध आणि कालबद्ध विकास करण्यासाठी एकात्मिक विकास आराखडा तयार करण्यात आला असून, नगररचना योजनांच्या माध्यमातून नैना परिसराचा विकास करण्यात येत आहे. या प्रक्रियेतून रोजगारनिर्मिती, उद्योगवाढ आणि आर्थिक संधींना चालना मिळेल, असे मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले. विकास म्हणजे केवळ रस्ते, इमारती आणि नागरी वसाहती उभारणे नव्हे, तर नागरिकांना रोजगार, पाणीपुरवठा आणि अन्य मूलभूत सुविधा उपलब्ध करून देणेही तितकेच महत्त्वाचे आहे. नैना क्षेत्रात एज्युसिटी, मेडिसिटी, स्पोर्ट्स सिटी, एरोसिटी आणि नॉलेज सिटी यांसारख्या संकल्पनांच्या माध्यमातून विविध आर्थिक आणि सामाजिक संधी निर्माण केल्या जातील. यामुळे मुंबई, नवी मुंबई, रायगड, ठाणे आणि पालघर या परिसराच्या विकासाला नवी दिशा मिळेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. नैना प्रकल्पाच्या विकासात शेतकरी आणि भूधारकांचा विश्वास संपादन करणे महत्त्वाचे आहे. भूधारकांच्या हातात जमिनीशी संबंधित कागदपत्रे दिल्यानंतरच विकासकामांचे भूमिपूजन करण्याचा निर्णय शासनाने घेतला होता. त्यानुसार गावनिहाय मोजणी, भूखंडांची ओळख, मालकी नोंदी आणि आवश्यक कागदपत्रांची प्रक्रिया पुढे नेण्यात येत आहे. भूधारकांचे प्रश्न मार्गी लागेपर्यंत राज्य सरकार त्यांच्या पाठीशी उभे राहील, अशी ग्वाही मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिली. ठाणे, नवी मुंबई, रायगड आणि पालघर हा परिसर आगामी काळात राज्याच्या आर्थिक विकासाचे प्रमुख केंद्र ठरेल. या भागाचा विकास करताना भूमिपुत्रांना सोबत घेऊन त्यांच्या हिताचे संरक्षण केले जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.
उरण शहरातील वाहतूक कोंडी कमी करून प्रवासाचा वेळ वाचविण्यासाठी सिडकोच्या वतीने द्रोणागिरी परिसरात हॉटेल आनंदी ते उरण शहरादरम्यान 50.26 कोटी रुपये खर्चून बायपास पुलाची उभारणी करण्यात आली आहे. या पुलाची एकूण लांबी 941 मीटर असून, त्यामध्ये 640 मीटर लांबीचा पूल, 153 मीटरचा पोहोच रस्ता आणि 148 मीटरचा जोडरस्ता आहे.11 मीटर रुंदीच्या या पुलावर वाहनांसाठी 7.5 मीटरचा मार्ग उपलब्ध असून, दोन्ही बाजूंना प्रत्येकी 1.75 मीटर रुंदीचे पदपथ आहेत. या पुलामुळे उरण शहरातील वाहतूक कोंडी कमी होण्यासोबतच प्रवास अधिक सुलभ आणि जलद होण्याची अपेक्षा आहे. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला पूर्वेकडून जलद आणि अखंड वाहतूक संपर्क उपलब्ध करून देण्यासाठी सिडकोने 953 कोटी रुपये खर्चाचा एसबीआर-9, बीआर-4 आणि बीआर-5 या तीन पुलांचा प्रकल्प पूर्ण केला आहे. पनवेल खाडी ओलांडून उभारण्यात आलेल्या या पुलांमुळे पुणे, पनवेल, ठाणे आणि कल्याण परिसरातून राष्ट्रीय महामार्ग 4बीमार्गे विमानतळ, उलवे किनारी मार्ग, मुंबई ट्रान्स हार्बर लिंक (एमटीएचएल) आणि अमरा मार्गाशी थेट संपर्क साधणे शक्य होणार आहे. या तीन पुलांची मध्यवर्ती गोलाकार वाहतूक बेटासह एकूण लांबी 2,593 मीटर असून, पुलांची एकूण रुंदी 60 मीटर आहे. दोन्ही दिशांना प्रत्येकी चार मार्गिकांचा मुख्य रस्ता आणि प्रत्येकी दोन मार्गिकांचे सेवा रस्ते उपलब्ध आहेत. याशिवाय, 100 मीटर व्यासाचे मध्यवर्ती गोलाकार वाहतूक बेट उभारण्यात आले आहे. विमानतळाच्या पूर्व आणि पश्चिम बाजूस उभारण्यात आलेल्या क्लोव्हरलीफ इंटरचेंजमुळे सिग्नलविरहित आणि अखंड वाहतूक प्रवाहाला चालना मिळणार आहे.
या कनेक्टिव्हिटी प्रकल्पांमुळे विमानतळापर्यंत पोहोचणे अधिक सोयीचे होण्याबरोबरच परिसरातील औद्योगिक, व्यावसायिक आणि नागरी विकासालाही गती मिळण्याची अपेक्षा आहे. नैना क्षेत्रातील नियोजनबद्ध विकास, भूधारकांना मालमत्ता पत्रकांचे वितरण आणि महत्त्वपूर्ण कनेक्टिव्हिटी प्रकल्पांमुळे नवी मुंबई, पनवेल आणि रायगड परिसराच्या विकासाला नवी चालना मिळणार आहे. भूमिपुत्रांचा सहभाग, रोजगारनिर्मिती आणि आधुनिक पायाभूत सुविधांच्या बळावर ‘तिसरी मुंबई’ महाराष्ट्राच्या आर्थिक प्रगतीतील महत्त्वाचे केंद्र बनविण्याचा शासनाचा प्रयत्न आहे.
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai