कडधान्य प्रक्रिया युनिट उभारणीसाठी मिळणार अनुदान
- by Aajchi Navi Mumbai
- Jul 25, 2026
- 31
योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन अर्ज प्रक्रिया सुरू
नवी मुंबई :कडधान्य पिकांच्या मूल्यवर्धनास चालना देऊन शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवणे आणि काढणीपश्चात पायाभूत सुविधा बळकट करण्याच्या उद्देशाने सन 2026-27 कडधान्य आत्मनिर्भर्ता अभियान सुरू करण्यात आले आहे. या अभियानांतर्गत कडधान्य प्रक्रिया युनिट स्थापन करण्यासाठी इच्छुक पात्र घटकांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. कडधान्य मूल्यसाखळी अधिक कार्यक्षम आणि सक्षम करण्याच्या हेतूने ही योजना राबवली जात असून, याद्वारे प्रक्रिया उद्योगांना मोठे आर्थिक पाठबळ दिले जाणार आहे.
या योजनेचा लाभ शेतकरी उत्पादक संस्था, क्लस्टर स्तर महासंघ, प्राथमिक कृषी पतसंस्था, वैयक्तिक अर्जदार, उद्योजक तसेच कोणत्याही अधिनियमांतर्गत नोंदणीकृत असलेल्या इतर उपक्रमांना घेता येणार आहे. पात्रतेच्या निकषांनुसार, गट लाभार्थी संस्था या किमान मागील दोन वर्षांपासून विधिवत नोंदणीकृत आणि कार्यरत असाव्यात. तसेच वैयक्तिक अर्जदाराचे वय किमान 21 वर्षे पूर्ण असणे आवश्यक आहे. एका कुटुंबातील (स्वतः, पती/पत्नी व अविवाहित मुले) केवळ एकाच व्यक्तीस या आर्थिक साह्याचा लाभ अनुज्ञेय राहील. याशिवाय अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, महिला, डोंगराळ क्षेत्रे आणि आकांक्षी तालुके या घटकांतील अर्जदारांना योजनेत विशेष प्राधान्य दिले जाणार आहे.
योजनेअंतर्गत मिळणाऱ्या अर्थसाह्याबाबत सांगायचे तर, प्रकल्प खर्चाच्या 33 टक्के किंवा कमाल 25 लाख रुपये प्रति युनिट (यापैकी जे कमी असेल ते) इतके अनुदान मंजूर केले जाईल. हे अनुदान प्रामुख्याने यंत्रसामग्री खरेदी तसेच इमारत, गोदाम व साठवण पायाभूत सुविधांच्या बांधकामासाठी दिले जाईल. यामध्ये इमारत, गोदाम किंवा साठवण सुविधांच्या बांधकामासाठी अनुदानाचा हिस्सा हा एकूण पात्र अनुदानाच्या जास्तीत जास्त 30 टक्क्यांपर्यंतच मर्यादित असेल. जमीन, वीज आणि मनुष्यबळ यांसारख्या खर्चासाठी कोणतेही अनुदान देय असणार नाही.
प्रकल्पासाठी आवश्यक असलेल्या एकूण खर्चापैकी किमान 15 टक्के रक्कम तसेच कार्यभांडवलासाठी लागणारा मार्जिन मनी अर्जदारास स्वतः उभारणे बंधनकारक आहे. योजनेतून मिळणारी रक्कम ही अनुदान स्वरूपात असणार असून, उर्वरित रक्कम अर्जदाराने मार्जिन मनी किंवा बँक कर्जाद्वारे उभारणे आवश्यक राहील. कडधान्य क्षेत्रात प्रक्रिया उद्योगांची उभारणी करून स्वतःचा उद्योग सुरू करू इच्छिणाऱ्या उद्योजक व संस्थांसाठी ही एक उत्तम संधी उपलब्ध झाली आहे.
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai