1086 विजेत्यांना अखेरची संधी
- by Aajchi Navi Mumbai
- Oct 23, 2026
- 21
3 नोव्हेंबरपर्यंत कागदपत्र सादर करता येणार
मुंबई : कोन, पनवेल येथील गिरणी कामगारांसाठीच्या 2414 सदनिकांच्या सोडतीतील 1086 विजेत्यांनी अद्याप म्हाडाच्या मुंबई मंडळाकडे कागदपत्रे सादर केलेली नाहीत. या विजेत्यांना अनेकदा मुंबई मंडळाकडून कागदपत्रे सादर करण्यासाठी संधी देण्यात आली. मात्र तरीही 1086 विजेत्यांनी कागदपत्रे सादर केलेली नाहीत. त्यामुळे आता या विजेत्यांना शेवटची संधी देण्याचा निर्णय घेतला आहे. या शेवटच्या संधीत जे विजेते कागदपत्रे सादर करणार नाहीत, त्यांच्या जागी प्रतीक्षा यादीवरील विजेत्यांना संधी देण्यात येणार आहे. त्यानुसार 1086 विजेत्यांना 26 ऑक्टोबर ते 3 नोव्हेंबरदरम्यान कागदपत्रे सादर करता येणार आहेत.
मुंबईत गिरणी कामगारांना केवळ 25 हजार घरे उपलब्ध होत असल्याने उर्वरित दीड लाखांहून अधिक गिरणी कामगारांना मुंबईबाहेर महामुंबईत एमएमआरडीएच्या भाडेतत्त्वावरील योजनेतील 50 टक्के घरे देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला. त्यानुसार कोन, पनवेल येथील एमएमआरडीएच्या भाडेतत्त्वावरील गृहप्रकल्पातील 2417 घरे मुंबई मंडळाला उपलब्ध झाली होती. या घरांसाठी मंडळाने 2016 मध्ये सोडत काढली. या घरांचा ताबा 2024 पासून देण्यास सुरुवात केली. मंडळाने विजेत्यांकडून कागदपत्रे जमा करून घेत, त्यांची पात्रता निश्चित करून, आतापर्यंत 1251 संबंधितांना घरांचा ताबा दिला. मात्र त्याचवेळी दुसरीकडे अद्यापही 1086 विजेत्यांनी घरांसाठी कागदपत्रे सादर केलेली नाहीत. कागदपत्रे सादर करण्यासाठी वारंवार मुदतवाढ देऊनही हे विजेते पुढे आलेले नाहीत. त्यामुळे घरेही रिक्त राहत असून प्रतीक्षा यादीवरील विजेत्यांचीही प्रतीक्षा लांबत आहे. या पार्श्वभूमीवर अखेर आता मंडळाने अद्याप पुढे न आलेल्या कामगार-वारसांना शेवटची संधी देण्याचा निर्णय घेतला आहे.
- प्रस्तावाला मंजुरी
या निर्णयानुसार मंडळाने यासंबंधीचा प्रस्ताव म्हाडाचे उपाध्यक्ष संजीव जयस्वाल यांच्याकडे मान्यतेसाठी पाठविला होता. या प्रस्तावाला मान्यता मिळाल्याची माहिती मंडळातील अधिकाऱ्यांनी दिली. त्यामुळे आता या निर्णयाची अंमलबजावणी सुरू केली आहे. 1086 विजेत्यांना 26 ऑक्टोबर ते 3 नोव्हेंबरदरम्यान कागदपत्रे सादर करण्याची संधी देण्यात आली आहे. यासंबंधीची माहिती आणि 1086 विजेत्यांच्या नावांची यादी म्हाडाच्या अधिकृत संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्याचे काम अंतिम टप्प्यात आहे. गुरुवारी संध्याकाळी वा शुक्रवारी सकाळपर्यंत ही यादी प्रसिद्ध होईल, असेही अधिकाऱ्यांनी सांगितले. त्यामुळे विजेत्यांनी पुढे येऊन कागदपत्रे सादर करावीत, असे आवाहन मंडळाने केले आहे.
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai