नैवेद्य-अलबेला वरील विघ्न टळले
- by Aajchi Navi Mumbai
- Sep 21, 2026
- 51
अनियमीतता नसल्याचा चौकशी समितीचा अहवाल; सत्ताधाऱ्यांना चपराक
नवी मुंबई ः वाशी सेक्टर 9 मधील ‘नैवेद्य’ आणि ‘अलबेला’ इमारतींना बेकायदा भोगवटा प्रमाणपत्र दिल्याचे गंभीर आरोप सत्ताधारी भाजपाने केला होता. पालिका आयुक्त शिंदे यांनी याबाबत नेमलेल्या राज्यस्तरीय चौकशी समितीने या प्रकरणात कोणतीही अनियमीतता व भ्रष्टाचार झाला नसल्याचा स्पष्ट अहवाल आयुक्तांना सादर केल्याची चर्चा महापालिकेत आहे. त्यामुळे भ्रष्टाचाराचे आरोप करुन केकाण यांची हकालपट्टी करण्याच्या सत्ताधाऱ्यांच्या मनसुब्यांवर पुन्हा एकदा पाणी फेरल्याची चर्चा सध्या राजकीय वर्तुळात आहे.
शिवसेना नगरसेवक किशोर पाटकर व अविनाश लाड यांच्या प्रभागात बांधण्यात आलेल्या ‘नैवेद्य’ आणि ‘अलबेला’ इमारतींना दिलेल्या भोगवटा प्रमाणपत्रावर कांगावा करत सत्ताधारी भाजपने सभागृह डोक्यावर घेतले होते. सभागृहात उप अग्निशमन अधिकारी पुरुषोत्तम जाधवयांना उभे करुन त्यांची साक्ष काढण्याचा अनोखा प्रयत्न सत्ताधाऱ्यांनी केला होता. पुरुषोत्तम जाधव यांनी नगररचना विभाग आणि राजकीय दबावामुळे अग्निशमन विभागाचा ना हरकत दाखला दिल्याचे सांगत तो एकतर्फी रद्द करण्याचा निर्णय घेतला. या संपुर्ण प्रकरणाची तातडीने दखल घेत पालिका आयुक्त कैलास शिंदे यांनी महाराष्ट्र राज्य अग्निशमन सेवा संचालक संतोष वारिक आणि नगररचना सह-संचालक विजय कुमार वाघमोडे यांच्या चौकशी समितीची नियुक्ती केली. समितीने सर्व दस्तऐवज, नस्ती आणि परवानग्यांची कसून तपासणी करुन संबंधित अधिकाऱ्यांचे जबाब नोंदवले. केवळ तांत्रिक व प्रक्रियात्मक त्रुटी वगळता कोणताही बेकायदेशीर व्यवहार झाला नसल्याचा स्पष्ट अहवाल समितीने पालिका आयुक्तांना सादर केल्याचे समजते. दरम्यान, या प्रकारामुळे उप-अग्निशमन अधिकारी पुरुषोत्तम जाधव यांच्यावरच आता प्रशासकीय कारवाईची टांगती तलवार आली आहे. दबावाचा दावा करणाऱ्या जाधवांनी वेळीच महापालिका आयुक्त किंवा वरिष्ठांकडे लेखी तक्रार का दाखल केली नाही, असा रोखठोक सवाल उपस्थित करत आयुक्त डॉ. कैलाश शिंदे यांनी जाधवांनाच कारणे दाखवा नोटीस बजावून प्रशासकीय कात्रीत पकडले आहे. विशेष महासभेत केकाण यांना कार्यमुक्त करण्याचा घेतलेला निर्णय आणि राजकीय स्वार्थासाठी अधिकाऱ्यांचा करण्यात आलेला वापर या अहवालामुळे सत्ताधाऱ्यांच्या अंगाशी आला आहे.
- आ. मंदा म्हात्रेंची प्रशासकीय कुरघोडी
वनमंत्री गणेश नाईक यांनी जनता दरबारात इमारतींवर निष्कासनाची कारवाई करण्याचे आदेश पालिका प्रशासनाला दिले तर या उलट भाजपा आ. मंदा म्हात्रे यांनी रहिवाशांच्या संरक्षणार्थ उभे राहत कारवाईला ठाम विरोध केला होता. ज्यांना घर देता येत नाही त्यांनी तोडायची भाषा करु नये असा अनाहुत सल्ला मंत्री गणेश नाईक यांना दिला होता. - आता चौकशी समितीच्या अहवालामुळे इमारतींचे बांधकाम नियमानुसारच असल्याचे सिद्ध झालेच त्याबरोबर रहिवाशी बेघर होण्याचे संकट ‘गणेश’ चतुर्थीतच निकाली निघाल्याने पुन्हा एकदा आ. म्हात्रे यांनी नाईकांवर कुरघोडी केल्याची चर्चा नवी मुंबईत आहे.
महापालिकेत सत्ताधारी मनमानी करीत आहेत. खरे तर आयुक्तांनी चौकशी करुन तसा ठराव सर्वसाधारण सभेत आणायला हवा होता. मात्र सत्ताधारी लोकप्रतिनिधींनी नियमबाह्य ठराव करुन एका चांगल्या अधिकाऱ्याला बदनाम करणे योग्य नाही. वनमंत्री गणेश नाईक यांनी 5 तारखेला इमारत तोडायचे आदेश दिले होते. आमच्या इमारतीविरोधात कटकारस्थाने रचणाऱ्यांना आम्ही सोडणार नाही. - किशोर पाटकर, नगरसेवक, शिवसेना
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai