नवी मुंबईतील विकासकामांना मिळणार गती
- by Aajchi Navi Mumbai
- Aug 08, 2026
- 52
ऐरोली ते तुर्भे-खारघर लिंक रोडपर्यंतच्या प्रकल्पांचा वनमंत्री नाईकांकडून आढावा; विकासकामे गुणवत्तापुर्ण व कालमर्यादेत पुर्ण करण्याचे संबंधित अधिकाऱ्यांना निर्देश
नवी मुंबई : नवी मुंबई महानगरपालिका कार्यक्षेत्रातील विविध महत्त्वपूर्ण विकासकामांचा शुक्रवारी वनमंत्री गणेश नाईक यांनी प्रत्यक्ष पाहणी दौरा करून त्यांच्या प्रगतीचा सविस्तर आढावा घेतला. ऐरोली नाट्यगृह, छत्रपती शिवाजी महाराज पूर्णाकृती स्मारक, ऐरोली-कटई नाका वाहतूक सुधारणा आणि तुर्भे-खारघर लिंक रोड (रस्ता व बोगदा) या महत्त्वाकांक्षी प्रकल्पांचा सविस्तर आढावा घेत संबंधित अधिकारी व अभियंत्यांना कामाच्या गुणवत्तेशी कोणतीही तडजोड न करता निर्धारित कालमर्यादेत प्रकल्प पूर्ण करण्याचे स्पष्ट निर्देश त्यांनी दिले.
पाहणी दौऱ्याची सुरुवात ऐरोली नाट्यगृह प्रकल्पापासून झाली. नाट्यगृहाच्या उभारणीची सद्यस्थिती, कामाचा वेग, दर्जा, आवश्यक पायाभूत सुविधा आणि उर्वरित कामांचे नियोजन याचा सविस्तर आढावा घेतला. नवी मुंबईकरांना आधुनिक आणि सुसज्ज सांस्कृतिक व्यासपीठ उपलब्ध करून देणारा हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प कोणत्याही विलंबाशिवाय पूर्ण करण्याचे निर्देश देण्यात आले. त्यानंतर ऐरोलीतील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पूर्णाकृती स्मारकाच्या कामांची पाहणी करण्यात आली. हे स्मारक केवळ स्थापत्य नसून स्वाभिमान, शौर्य, दूरदृष्टी आणि राष्ट्रनिष्ठेचे चिरंतन प्रतीक असल्याचे सांगण्यात आले. स्मारकाच्या उभारणीतील प्रत्येक घटकाचा बारकाईने आढावा घेत परिसराचे सुशोभीकरण, स्वच्छता, नागरिकांसाठी आवश्यक सुविधा आणि आकर्षक विकास यावर विशेष भर देण्याच्या सूचना संबंधित अधिकाऱ्यांना देण्यात आल्या. दौऱ्यात ऐरोली-कटई नाका परिसराचीही पाहणी करण्यात आली. वाढती लोकसंख्या, वाहनांची संख्या आणि भविष्यातील वाहतूक गरजा लक्षात घेता या महत्त्वाच्या वाहतूक दुव्यावरील रस्ते, वाहतूक व्यवस्थापन आणि नागरिकांच्या सुरक्षिततेसंदर्भातील उपाययोजनांचा सखोल आढावा घेण्यात आला. वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी आवश्यक सुधारणा, रस्त्यांचे उन्नतीकरण आणि नियोजित विकासकामे वेगाने पूर्ण करण्यावर भर दिला. भविष्यातील वाहतुकीचा वाढता ताण लक्षात घेऊन पायाभूत सुविधा अधिक सक्षम करण्याचे निर्देश संबंधित विभागाला देण्यात आले. यावेळी तुर्भे-खारघर लिंक रोड (रस्ता व बोगदा प्रकल्प) या नवी मुंबईच्या अत्यंत महत्त्वाकांक्षी प्रकल्पाचीही प्रत्यक्ष पाहणी करण्यात आली. हा प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर तुर्भे, खारघर आणि नवी मुंबईतील विविध भागांमधील प्रवास अधिक जलद, सुरक्षित आणि सुलभ होणार असून वाहतूक कोंडीत मोठी घट होईल. यामुळे नागरिकांचा वेळ, इंधन आणि प्रवास खर्चाचीही मोठ्या प्रमाणात बचत होणार आहे. प्रकल्पाच्या प्रगतीचा आढावा घेत कामाच्या गुणवत्तेशी तडजोड न करता निर्धारित वेळेत काम पूर्ण करण्याचे निर्देश संबंधित अधिकारी आणि अभियंत्यांना देण्यात आले. यावेळी विकासकामांच्या अंमलबजावणीत नागरिकांना कमीत कमी गैरसोय होईल, याची विशेष दक्षता घेण्याच्या सूचनाही दिल्या. प्रत्येक प्रकल्प हा नागरिकांच्या हिताला केंद्रस्थानी ठेवून नियोजनबद्ध, सुरक्षित आणि उच्च दर्जाचा असावा, यावर भर दिला.
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai