भारताच्या विकासाचे पुढील केंद्र नवी मुंबईच!
- by Aajchi Navi Mumbai
- Aug 14, 2026
- 33
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे प्रतिपादन ; खारघरमध्ये मेघालय भवन; जमीन हस्तांतरण व भूमीपूजन सोहळा उत्साहात
नवी मुंबई : नवी मुंबई, ठाणे आणि रायगड हा परिसर भारताच्या भविष्यातील अर्थव्यवस्थेचा प्रमुख केंद्रबिंदू ठरणार आहे, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला. खारघर सेक्टर 16 येथील प्लॉट क्रमांक 14 वर साकारण्यात येणाऱ्या मेघालय भवनाच्या जमीन हस्तांतरण व भूमीपूजन सोहळ्यात ते बोलत होते.
महाराष्ट्र आणि मेघालय ही ‘एक भारत, श्रेष्ठ भारत’ संकल्पनेला बळ देणारी सहोदर राज्ये असल्याचे सांगत फडणवीस यांनी दोन्ही राज्यांमधील सांस्कृतिक व आर्थिक संबंध अधिक दृढ करण्यावर भर दिला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते मेघालयचे मुख्यमंत्री कॉनराड के. संगमा यांच्याकडे मेघालय भवनसाठीच्या जमिनीची कागदपत्रे हस्तांतरीत करण्यात आली. या सोहळ्यात उपस्थितांशी संवाद साधताना मुख्यमंत्री फडणवीस यांनी दोन्ही राज्यांमधील ऐतिहासिक आणि सांस्कृतिक अनुबंधांवर प्रकाश टाकला. नवी मुंबईत 12 जागतिक दर्जाची विद्यापीठे असलेली एज्यु-सिटी, आंतरराष्ट्रीय दर्जाची मेडी-सिटी आणि मोठ्या प्रमाणात डेटा सेंटर क्षमता विकसित होत असून, हा परिसर न्यू-एज व डीप-टेक उद्योगांचे केंद्र बनत असल्याचे फडणवीस यांनी सांगितले. मेघालय भवनाचे बांधकाम लवकरात लवकर आणि उत्कृष्ट दर्जात पूर्ण करण्यासाठी सिडको किंवा राज्य सरकारच्या यंत्रणांमार्फत सर्वतोपरी सहकार्य केले जाईल, असे आश्वासनही फडणवीस यांनी यावेळी दिले.
मेघालय भवनासाठी जमीन उपलब्ध करून दिल्याबद्दल मुख्यमंत्री संगमा यांनी फडणवीस, सिडको आणि स्थानिक आमदार मंदा म्हात्रे यांचे आभार मानले. पूर्व आणि पश्चिम भारताला जोडणारा दुवा म्हणून या भवनाकडे पाहत असल्याचे त्यांनी सांगितले. आगामी काळात महाराष्ट्र आणि मेघालयमध्ये व्यापार, कृषी, क्रीडा व संस्कृती क्षेत्रातील सहकार्य वाढविण्याचा मानस संगमा यांनी व्यक्त केला. मेघालयची प्रसिद्ध लाखडोंग हळद, संगीत आणि क्रीडा क्षेत्रातील क्षमता महाराष्ट्राच्या माध्यमातून जगभर पोहोचवण्याची इच्छाही त्यांनी व्यक्त केली. मेघालय भवनामुळे नवी मुंबईच्या विकासासोबतच महाराष्ट्र-मेघालय संबंधांनाही नवी उंची मिळणार आहे.
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai