क्रेनखाली दबून दोन मजुरांच्या मृत्यू
- by Aajchi Navi Mumbai
- Aug 22, 2026
- 29
नवी मुंबई : ऐरोलीतील पटणी रोडवरील माईंडस्पेस परिसरातील रहेजा बिल्डिंगच्या बांधकाम साईटवरील टॉवर क्रेनमधून लोखंडी स्टील रॉड उचलताना झालेल्या भीषण दुर्घटनेत दोन मजुरांचा जागीच मृत्यू झाल्याची घटना सोमवारी 17 ऑगस्ट रोजी दुपारी घडली होती. बांधकाम साईटवर आवश्यक सुरक्षा उपाययोजना न करता काम सुरू ठेवण्यात आल्यानेच दोन मजुरांना जीव गमवावा लागल्याचा प्राथमिक निष्कर्ष तपासात समोर आला आहे. त्यानुसार पोलिसांनी या दुर्घटनेला जबाबदार असलेल्या क्रेन ऑपरेटरसह साईट इंजिनिअर/सुपरवायझर व साईट व्यवस्थापनावर गुन्हा दाखल केला आहे.
ऐरोलीतील पटणी रोडवरील माइंडस्पेस परिसरातील रहेजा बिल्डिंगच्या बांधकाम साईटवर गत 17 ऑगस्ट रोजी दुपारी क्रेनद्वारे जड लोखंडी रॉड उचलण्याचे काम सुरू होते. यावेळी क्रेनचे लिफ्टिंग मेकॅनिझम (वायर रोप/असेम्ब्ली) अचानक निकामी झाल्याने वजनदार लोखंडी रॉड खाली काम करणाऱ्या मजुरांवर कोसळला होता. या दुर्घटनेत बॉबी रॉय (41) आणि राहुल मिश्रा (33) या दोघांचा जागीच मृत्यू झाला. रॉय हा मूळचा बिहारचा, तर मिश्रा हा उत्तर प्रदेशचा रहिवासी होता. दोघेही रहेजा बिल्डिंग येथील लेबर कॅम्पमध्ये राहत होते.
या दुर्घटनेनंतर रबाळे पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद करून तपास सुरू केला होता. या तपासात क्रेनद्वारे जड लोखंडी रॉड उचलण्याचे काम सुरू असताना, संभाव्य ‘फॉल झोन’मधून मजुरांना सुरक्षित अंतरावर हलवण्यात आले नसल्याचे तसेच क्रेनच्या कार्यक्षेत्राभोवती आवश्यक बॅरिकेडिंग अथवा एक्सक्लुजन झोन तयार करण्यात आला नसल्याचे आढळून आले. बांधकाम साईटवर आवश्यक सुरक्षा उपाययोजना न करता काम सुरू ठेवण्यात आल्यानेच दोन मजुरांना जीव गमवावा लागल्याचा प्राथमिक निष्कर्ष तपासात समोर आला आहे.
त्यानुसार पोलिसांनी सुरक्षेच्या नियमांकडे दुर्लक्ष करून निष्काळजीपणे क्रेनचे लिफ्टिंग ऑपरेशन केल्याप्रकरणी टॉवर क्रेन ऑपरेटर केशव कमलेश निषाद (34), साईट इंजिनिअर / सुपरवायझर रूपेश प्रकाश शिरसाठ (34), याच्यासह मे. व्हीआरबी एलएलपी आणि मे. गिगा फ्लेक्स इस्टेट प्रा.लि. यां कंपनीच्या संबंधित व्यवस्थापन व जबाबदार अधिकाऱ्यांवर भारतीय न्याय संहिता, 2023 मधील कलम 106(1) तसेच भादंवि कलम 304(अ) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सीसीटीव्ही फुटेज, क्रेनची तांत्रिक स्थिती, सुरक्षा उपाययोजना आणि संबंधितांची जबाबदारी याबाबत पोलिसांकडून तपास सुरू आहे.
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai