रुग्णालयावरील विघ्न टळले ; लवकरच श्रीगणेशा
- by Aajchi Navi Mumbai
- Aug 28, 2026
- 26
न्यायालयाचा आ. मंदा म्हात्रे व फोर्टी प्लस संघटनेलाही दिलासा
नवी मुंबई ः नवी मुंबईकरांना अत्याधुनिक आरोग्यसेवा उपलब्ध व्हावी म्हणून आमदार मंदा म्हात्रे यांच्या प्रयत्नामुळे बेलापूर येथे 800 कोटी रुपये खर्च करुन उभारण्यात येणाऱ्या सुपरस्पेशालिटी रुग्णालय व वैद्यकीय महाविद्यालय प्रकल्पाला मुंबई उच्च न्यायालयाने हिरवा झेंडा दाखवला आहे. त्याचवेळी नेरुळ येथील भुखंड क्र. 107 हा याचिकाकर्ते फोर्टी प्लस संघटनेला खेळाच्या मैदानासाठी उपलब्ध करुन दिल्याने दोन्ही बाजुंना दिलासा मिळाला आहे. विघ्नहर्त्याच्या आगमनापुर्वीच संकट दूर झाल्याने आता रुग्णालयाचा श्रीगणेशा करण्याचे सर्व मार्ग मोकळे झाले आहेत.
कोरोना काळात नवी मुंबईतील ढासळलेली आरोग्य व्यवस्था समोर ठेऊन बेलापुरच्या आमदार मंदा म्हात्रे यांनी बेलापुर येथे सुपर स्पेशालिटी रुग्णालय व वैद्यकिय महाविद्यालय प्रस्तावित केले होते. सदर रुग्णालय फोर्टी प्लस या संघटनेने विकसीत केलेल्या मोकळ्या भूखंडावर प्रस्तावित केल्याने मोठा रोष स्थानिक भुमीपुत्रांकडून व्यक्त होत होता. सदर भूखंडाचे काही क्षेत्र सीआरझेड-2 मध्ये मोडत असल्याने सुरुवातीला नवी मुंबई महापालिकेने सदर भुखंडावर खेळाच्या मैदानाचे आरक्षण प्रस्तावित केले होते. परंतु, त्याठिकाणी सुपरस्पेशालिटी रुग्णालय व वैद्यकिय महाविद्यालयाचा प्रस्ताव प्राप्त झाल्यावर सदर आरक्षणात फेरबदल करण्यात आले. सदर भूखंडाची किंमत 117 कोटी होतीपण तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचेकडून म्हात्रे यांनी 50 टक्के सवलतीच्या दरात भुखंड पदरात पाडला. त्याचबरोबर सुमारे 18 कोटी रुपयांचा जीएसटी कर ही शासनाकडून माफ करण्यात आल्याने महापालिकेला मोठा दिलासा मिळाला आहे. या भूखंडापोटी महापालिकेने 56 कोटी रुपये सिडकोला भरले असल्याचे समजते.
नवी मुंबई महापालिका स्थापन होऊन 35 वर्षांचा कालावधी उलटला तरी महापालिकेने स्वतःचे एकही सुपरस्पेशालिटी रुग्णालय विकसीत केले नसल्याचे आ. म्हात्रे यांचे म्हणणे आहे. तसेच स्वतःचे वैद्यकिय महाविद्यालय महापालिकेने उभारल्यास रुग्णांच्या उपचारासाठी मोठा डॉक्टर वर्ग उपलब्ध होईल या भावनेने म्हात्रे यांनी बेलापुर येथे सदर रुग्णालय प्रस्तावित केले आहे. हे रुग्णालय फोर्टी प्लस मैदानावर बांधण्यात येऊ नये म्हणून फोर्टी प्लस संघटनेने त्यास मोठा विरोध केला होता.
दरम्यान, 14 गावातील नगरसेवक भरत भोईर यांनी रुग्णालयाचा प्रस्ताव रद्द करुन तो 14 गावात उभारण्याचा प्रस्ताव पालिकेला दिला होता. या खेळाच्या मैदानावरील रुग्णालायाचा प्रस्ताव रद्द करावा म्हणून फोर्टी प्लस संघटना न्यायालयात गेली होती. 27 ऑगस्ट रोजी झालेल्या सुनावणीत मुख्य न्यायाधीशांनी याचिकाकर्त्यांची याचिका निकाली काढताना त्यांना विकास आराखड्यातील भूखंड क्र. 107 वर खेळण्याची मुभा दिली असून त्यात अडथळा आल्यास सिडको आणि महापालिका यांना त्यांच्या अडचणी दूर करण्याचे निर्देश दिले आहेत.
पालिकेने याबाबत रुग्णालयाच्या बांधकामाची निविदा प्रक्रिया पुर्ण केली असून या निर्णयामुळे पालिकेला सदर बांधकाम सुरु करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. याबाबत आ. म्हात्रे यांची प्रतिक्रिया घेतली असता त्यांनी विघ्नहर्त्याच्या आगमनापुर्वीच सर्व विघ्ने टळल्याने लवकरच कामाचा श्रीगणेशा राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व सुनेत्रा पवार यांच्या हस्ते करण्यात येईल असे सांगितले.
- आमदार मंदा म्हात्रे यांच्या प्रयत्नांना यश
सुपर स्पेशालिटी रुग्णालयासाठी भूखंड मिळवणे, सवलतीच्या दरात भूखंड उपलब्ध करून घेणे आणि प्रकल्पाला प्रशासकीय मंजुरी मिळवण्यासाठी आमदार मंदा म्हात्रे यांनी सुरुवातीपासूनच कंबर कसली होती. त्यांनी शासन स्तरावर आणि स्थानिक प्राधिकरणाकडे केलेल्या पाठपुराव्यामुळे अखेर त्यांच्या प्रयत्नांना यश आल्याचे मानले जातेे. - फोर्टी प्लसला दिलासा
रुग्णालयासाठी निवडलेल्या भूखंडावर अस्तित्वात असलेले खेळाचे मैदान कायम राहावे, यासाठी फोर्टी प्लस संघटनेने न्यायालयात धाव घेतली होती. न्यायालयाने याचिका निकाली काढताना विकास आराखड्यातील भूखंड क्रमांक 107 वर संघटनेला खेळण्याची मुभा दिली आहे. त्यामुळे रुग्णालयाच्या प्रकल्पासोबतच खेळाच्या मैदानाबाबतही संघटनेला दिलासा मिळाला आहे. - विरोधक सर्वोच्च न्यायालयात जाणार?
रुग्णालयाच्या प्रस्तावाला विरोध करत काम थांबवण्याची मागणी करणाऱ्या विरोधकांना मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्णयामुळे मोठा धक्का बसलाआहे. याचिका निकाली निघाल्याने रुग्णालयाचे काम सुरू करण्यातील न्यायालयीन अडथळा दूर झाला असला तरी विरोधकांनी या आदेशाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान देण्याची तयारी सुरु केल्याची चर्चा नवी मुंबईत आहे. विरोधकांच्या राजकीय कुरघोडीत हा प्रकल्प लांबण्याची शक्यता आहे.
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai