बॉयलर क्षेत्रात ‘सेफ्टी फर्स्ट’ला प्राधान्य द्या
- by Aajchi Navi Mumbai
- Oct 09, 2026
- 34
आधुनिक तंत्रज्ञान, कौशल्य विकास आणि सुरक्षिततेसाठी शासन कटिबद्ध : कामगार मंत्री आकाश फुंडकर
नवी मुंबई : ऊर्जा निर्मितीपासून साखर, वस्त्रोद्योग, रसायने, पेट्रोकेमिकल्स, अन्नप्रक्रिया, औषधनिर्मिती आणि रिफायनरीजपर्यंत विविध उद्योगांमध्ये बॉयलर हा उत्पादन प्रक्रियेचा महत्त्वाचा भाग आहे. त्यामुळे बॉयलरची सुरक्षितता, कार्यक्षमता आणि विश्वासार्हता यांना सर्वोच्च प्राधान्य देत आधुनिक तंत्रज्ञान व कौशल्य विकासाला चालना देण्यासाठी शासन कटिबद्ध असल्याचे कामगार मंत्री ॲड. आकाश फुंडकर यांनी सांगितले.
वाशी येथील सिडको प्रदर्शन केंद्रात कामगार विभागाच्या बाष्पके संचालनालयाच्या वतीने आयोजित ‘बॉयलर इंडिया 2026’ कार्यशाळा, चर्चासत्र आणि प्रदर्शनाचे उद्घाटन फुंडकर यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते. बॉयलर क्षेत्रात कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर वाढविण्याची गरज व्यक्त करताना फुंडकर म्हणाले की, बिघाड झाल्यानंतर सूचना मिळण्याऐवजी बिघाड होण्याची शक्यता आधीच ओळखून प्रतिबंधात्मक उपाययोजना करता येतील का, यावर उद्योग व तज्ज्ञांनी गांभीर्याने विचार करावा. ‘बॉयलर इंडिया 2026’च्या माध्यमातून आधुनिक तंत्रज्ञान, नवीन संकल्पना आणि औद्योगिक सुरक्षिततेवरील उपायांवर चर्चा होणे अपेक्षित असल्याचे त्यांनी सांगितले. शासनाच्या 150 दिवसांच्या कार्यक्रमांतर्गत ई-गव्हर्नन्स आणि नागरिककेंद्री सेवांवर भर देण्यात आला आहे. या उपक्रमात बाष्पके संचालनालयाने राज्यातील 68 विभागांमध्ये चौथा क्रमांक मिळविल्याबद्दल फुंडकर यांनी संचालनालयाचे अभिनंदन केले. बॉयलर क्षेत्रातील तपासणी, मान्यता आणि लेखापरीक्षण प्रक्रियेत अधिक सुलभता आणण्याचे प्रयत्न सुरू असल्याचेही त्यांनी सांगितले.नागपुरात कौशल्य विकास केंद्रबॉयलर क्षेत्रासाठी मोठ्या प्रमाणावर कुशल मनुष्यबळाची गरज असून, उच्चदाब वेल्डिंग, बॉयलर निर्मिती, तपासणी, विनाशरहित चाचणी, देखभाल, स्वयंचलन आणि प्रगत बॉयलर संचालन या क्षेत्रांमध्ये प्रशिक्षित मनुष्यबळ आवश्यक आहे. यासाठी नागपुरात कौशल्य विकास केंद्र सुरू करण्यात येत असून, त्याचे रूपांतर बॉयलर कौशल्य, वेल्डिंग, तपासणी आणि औद्योगिक सुरक्षिततेच्या उत्कृष्टता केंद्रात करण्याचा शासनाचा प्रयत्न आहे. यामुळे युवकांना कौशल्य प्रमाणपत्रासह रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील, असा विश्वास फुंडकर यांनी व्यक्त केला. बॉयलर उद्योगात उच्च दाब, उच्च तापमान आणि गुंतागुंतीच्या औद्योगिक प्रक्रियांचा समावेश असल्याने कामगारांच्या सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य देणे आवश्यक आहे. ‘सेफ्टी फर्स्ट’ ही केवळ घोषणा न राहता प्रत्येक उद्योगातील प्रत्यक्ष कार्यपद्धती झाली पाहिजे, असे फुंडकर यांनी स्पष्ट केले.
वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे यांनीही बॉयलर निर्मितीतील प्रत्येक टप्प्यावर तांत्रिक मानके आणि सुरक्षा निकषांचे काटेकोर पालन आवश्यक असल्याचे सांगितले. ‘बॉयलर इंडिया’च्या माध्यमातून उत्पादक, विक्रेते आणि ग्राहकांना एकाच व्यासपीठावर आणले जात असून, यामुळे उद्योग क्षेत्राला नव्या व्यावसायिक संधी उपलब्ध होतील, असे त्यांनी नमूद केले.
देश-विदेशातील 246 प्रदर्शकांचा सहभाग
कामगार विभागाच्या अपर मुख्य सचिव आय.ए. कुंदन यांनी ‘बॉयलर इंडिया 2026’च्या आयोजनाचे कौतुक केले. हे या प्रदर्शनाचे चौथे आयोजन असून यंदा देश-विदेशातील सुमारे 246 प्रदर्शकांनी सहभाग घेतला आहे. ऊर्जा कार्यक्षमता वाढविणे, कार्बन उत्सर्जन कमी करणे आणि स्वच्छ ऊर्जेच्या वापरातही बॉयलरची भूमिका महत्त्वाची असल्याचे त्यांनी सांगितले. केंद्रीय बाष्पके मंडळाचे सचिव तथा तांत्रिक सल्लागार संदीप कुंभार यांनी केंद्र शासनाच्या सुधारणा व नव्या नियामक व्यवस्थेची माहिती दिली. उत्पादक, वापरकर्ते, दुरुस्तीदार, फॅब्रिकेटर्स आणि अभियंत्यांमध्ये ज्ञानाची देवाणघेवाण करण्यासाठी ‘बॉयलर इंडिया’ महत्त्वाचे व्यासपीठ ठरत असल्याचे त्यांनी सांगितले.अ
आधुनिक उपकरणे, तंत्रज्ञानाची पाहणी
कामगार मंत्री आकाश फुंडकर आणि वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे यांनी प्रदर्शनातील विविध स्टॉलना भेट देऊन बॉयलर, आधुनिक उपकरणे, तंत्रज्ञान आणि सुरक्षा उपाययोजनांची माहिती घेतली. यावेळी बॉयलर तंत्रज्ञानावर आधारित लघुचित्रपट दाखविण्यात आला. तसेच बॉयलर क्षेत्रातील तंत्रज्ञान, सुरक्षा, नियम व कार्यपद्धती यावरील माहितीपूर्ण पुस्तकांचे प्रकाशन करण्यात आले.
यावेळी नवी मुंबईच्या महापौर सुजाता पाटील, अपर मुख्य सचिव आय.ए. कुंदन, विकास आयुक्त (असंघटित कामगार) सुशील खोडवेकर, संदीप कुंभार, बाष्पके संचालनालयाचे संचालक संदीप चिवटे यांच्यासह विविध राज्यांतील अधिकारी, अभियंते, तज्ज्ञ, उत्पादक, औद्योगिक प्रतिनिधी, ऑपरेटर आणि प्रदर्शक उपस्थित होते. कार्यक्रमात ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai