नगरविकास विभागाचा इन्क्लुझिव्ह हाऊसिंग घोटाळा
- by Aajchi Navi Mumbai
- Oct 09, 2026
- 33
नागरिकांच्या सूचना व हरकतींशिवाय युडीसीपीआरमध्ये नियम 3.8.4 चा समावेश
नवी मुंबई ः शासनाने नवी मुंबई महापालिकेत समावेशक गृहनिर्माण योजनेत झालेल्या घोटाळयाबाबत नेमलेल्या चौकशी समितीच्या कामकाजात युडीसीपीआरमधील नियम 3.8.4 हा बेकायदा व नियमबाह्य मार्गाने अंतर्भुत केल्याचे उघडकीस आल्याने नगरविकास विभागाचे पितळ उघडे पडले आहे. या नियमाच्या आधारे नगरविकास विभागाने अनेक विकासकांना समावेशक गृहनिर्माण योजनेतून सवलत दिल्याने हजारो गरीबांच्या घरांच्या स्वप्नावर घाला घातला आहे. त्यामुळे सदर नियमबाह्य नियमाच्या आधारे मंजुरी देणाऱ्या अधिकाऱ्यांची जबाबदारी निश्चित करण्याची मागणी होऊ लागली आहे.
सरकारने राज्यातील 10 लाखांहून अधिक लोकसंख्या असलेल्या महानगरपालिकांना 4000 चौ.मी.पेक्षा जास्त क्षेत्रफळ असलेल्या भुखंडांवर 20 टक्के क्षेत्रावर गरीबांसाठी समावेशक गृहनिर्माण योजनेअंतर्गत घरे बांधणे अनिवार्य केले आहे. सदर योजनेची नियमावली संबंधित महापालिकांना बंधनकारक करण्यात आली होती. या योजनेअंतर्गत बांधण्यात आलेली घरे म्हाडाला हस्तांतरीत करण्यात येऊन ती घरे बांधकाम खर्च अधिक 25 टक्के नफा या अनुषंगाने आर्थिक दुर्बल घटकांना वितरीत करण्यात येत होती. त्यामुळे हजारो गरीबांना वाजवी दरात नागरी भागात घरे उपलब्ध झाली होती.
शासनाने राज्यातील सर्व महानगरपालिकांना एकच बांधकाम नियमावली लागू करावी म्हणून महाराष्ट्र प्रादेशिक व नगररचना अधिनियम 1966 मधील कलम 37(1)(अअ) अंतर्गत नागरीकांच्या सूचना व हरकती मागवण्यासाठी एकत्रित बांधकाम नियंत्रण आणि प्रोत्साहनात्मक नियमावलीची अधिसूचना 8 मार्च 2019 रोजी प्रसिद्ध केली होती. नागरिकांना सूचना व हरकती देण्यासाठी 7 एप्रिल 2019 ही शेवटची तारीख होती. सदर प्रसिद्ध झालेल्या बांधकाम नियमावलीत सध्याच्या युडीसीपीआर मधील नियम क्र. 3.8.4 चा समावेश नसल्याची धक्कादायक बाब उघडकीस आली आहे. सदर नियमावलीत वरील अट नसताना ही अट सिडको व्यवस्थापकीय संचालकांच्या दि. 13/10/2020 च्या पत्राच्या अनुषंगाने तत्कालीन नगरविकास प्रधान सचिव भुषण गगराणी यांनी ही अट समाविष्ट केल्याचे दिसत आहे. वास्तविक पाहता, नागरिकांच्या सूचना व हरकतींशिवाय कोणतीही अट नव्याने नियमावलीत अंतर्भुत करता येत नाही याची जाणिव असतानाही गगराणी यांनी हा भुषण प्रताप केल्याचे उघडकीस आले आहे.
2 डिसेंबर 2020 रोजी एकत्रित बांधकाम नियंत्रण आणि प्रोत्साहनात्मक नियमावली राज्यात लागू करण्यात आली असून नवी मुंबई महापालिकेचे विद्यमान सहसंचालक सोमनाथ केकाण यांनी याच नियमबाह्य व बेकायदेशीर नियमावलीचा आधार घेऊन प्रधान सचिव असीम गुप्ता व अवर सचिव निर्मल कुमार चौधरी यांच्या मंजुरीने अनेक विकासकांना समावेशक गृहनिर्माण योजेनेतून सूट दिली आहे. नगरविकास विभागानेच केलेल्या या घोटाळ्यामुळे गरीबांसाठी बांधण्यात येणारी घरे निर्माण होण्यास मोठा अडसर निर्माण झाला आहे. शासनाने नेमलेल्या चौकशी समितीच्या कामकाजात ही धक्कादायक बाब उघडकीस आली असतानाही समितीचे अध्यक्ष असीम गुप्ता यांनी नगरविकास विभागाच्या गलथान कारभारावर पांघरुण घातले आहे. त्यामुळे या अहवालाची दखल येत्या हिवाळी अधिवेशनात विधान परिषद सभापती राम शिंदे कशी घेतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
- रक्षकच बनले भक्षक
राज्यातील बांधकाम परवानगीबाबत झालेली अनियमितता दूर करण्याची जबाबदारी प्रधान सचिव नगरविकास 1 यांची आहे. परंतु, नवी मुंबई महानगरपालिकेत झालेला समावेशक गृहनिर्माण घोटाळा हा प्रधान सचिव असीम गुप्ता यांच्या मंजुरीने अवर सचिव निर्मल कुमार चौधरी यांनी विकासकांना दिलेल्या पत्रांमुळे झाला आहे. शासनाने ज्यांच्या मंजुरीने विकासकांना सवलत दिली त्यांच्याच अध्यक्षतेखाली ही चौकशी समिती गठित करण्यात आली हाच सर्वात मोठा घोटाळा असल्याचे बोलले जाते. त्यामुळे या समावेशक गृसनिर्माण योजनेत रक्षकच भक्षक बनल्याची चर्चा नवी मुंबईत आहे. - गगराणींचे आठवावे प्रताप
सिडकोत असताना भुषण गगराणी यांनी केलेले प्रताप आजची नवी मुंबईने उघडकीस आणले होते. एका विकासकाला 182 कोटींचा अनुचित लाभ दिला होता तर नेरुळ येथील एल ॲण्ड टी प्रकल्पाला न्यायालयाच्या आदेशाविरोधात भुवापर मंजुर केला होता. त्याचबरोबर या गृहप्रकल्पात एल ॲण्ड टी ला समावेशक गृहनिर्माण योजनेतून सूट मिळावी म्हणून हा प्रकल्प खाजगी-सार्वजनिक भागिदारीत असल्याचा निर्णय घेतला होता. मुळ प्रारुप नियमावलीत नियम 3.4.8 अंतर्भुत नसताना गगराणी यांनी मागच्या दाराने सदर नियम युडीसीपीआरमध्ये अंतर्भुत केला आहे.
नियम 3.8.4 काय?
सार्वजनिक प्राधिकरणाने युडीसीपीआर नियमावली लागू होण्यापूर्वी निविदेव्दारे वितरित केलेल्या भूखंडांच्या अनुषंगाने त्यामध्ये समावेशक गृहनिर्माणची अट नमूद नसलेल्या भूखंडास समावेशक गृहनिर्माणाची अट लागू होणार नाही.
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai