न्यायालयाची स्थगिती असतानाही जमीन मोजणीचा प्रयत्न?
- by Aajchi Navi Mumbai
- Nov 20, 2026
- 25
उरणच्या कोप्रोलीत शेतकऱ्यांचा तीव्र विरोध; बेस्ट रोडवेजचे मालक जयकुमार गुप्ता यांच्याविरोधात एल्गार
उरण : न्यायालयाची स्थगिती असल्याचा दावा करूनही उरण तालुक्यातील कोप्रोली येथे जमीन मोजणीचा प्रयत्न करण्यात आल्याने शेतकरी आक्रमक झाले आहेत. बेस्ट रोडवेजचे मालक जयकुमार गजानन गुप्ता यांच्या मागणीनुसार शासकीय अधिकारी जमीन मोजणीसाठी गावात दाखल होताच शेतकऱ्यांनी एकत्र येत या कारवाईला जोरदार विरोध केला. न्यायालयाचा स्पष्ट आदेश मिळाल्याशिवाय जमीन मोजणी करू देणार नाही, अशी भूमिका ॲड. पर्जन्य म्हात्रे यांच्यासह शेतकऱ्यांनी घेतली. याशिवाय शेतकऱ्यांच्या जमिनीवर उभारलेले कथित अनधिकृत रस्ते, वेअरहाऊस आणि उभी केलेली वाहने हटविण्याची मागणीही करण्यात आली.
बेस्ट रोडवेजचे मालक जयकुमार गुप्ता गेल्या 20 वर्षांपासून शेतकऱ्यांवर अन्याय करीत असल्याचा आरोप स्थानिक शेतकऱ्यांनी केला आहे. या जमीन विवादातून 15 हून अधिक शेतकऱ्यांनी त्यांच्याविरोधात न्यायालयात दावे दाखल केले आहेत. पनवेल आणि उरण दिवाणी न्यायालयाचे आदेश असतानाही दोन प्रकरणांमध्ये त्यांचे उल्लंघन करून रस्त्यांचे काँक्रीटीकरण आणि गोडाऊन उभारण्यात आल्याचा गंभीर आरोप ॲड. पर्जन्य म्हात्रे आणि शेतकऱ्यांनी केला आहे. शेतकऱ्यांच्या पिकत्या जमिनींमध्ये भराव टाकून काँक्रीटचे रस्ते तयार करण्यात आल्याचा आरोप आहे. या कामांसाठी आवश्यक परवानग्या घेतल्या आहेत का, तसेच नियमानुसार रॉयल्टी भरली आहे का, असा सवालही शेतकऱ्यांनी उपस्थित केला आहे. याशिवाय शेतकऱ्यांच्या जागेत कंटेनर आणि टेम्पो उभे करून व्यावसायिक वापर केला जात असल्याने शेतीचे नुकसान होत असल्याचे त्यांचे म्हणणे आहे.
विशेष म्हणजे, संबंधित ठिकाणी उभारण्यात आलेल्या कथित अनधिकृत वेअरहाऊसमध्ये एखादी दुर्घटना किंवा अनुचित प्रकार घडल्यास त्याची जबाबदारी कोण घेणार, असा प्रश्नही आंदोलकांनी उपस्थित केला आहे. शेतकऱ्यांच्या जमिनींचा व्यावसायिक वापर होत असताना प्रशासनाकडून ठोस कारवाई होत नसल्याची नाराजी त्यांनी व्यक्त केली. याप्रकरणी उरण पोलीस ठाणे, सहाय्यक पोलीस आयुक्त, पोलीस उपायुक्त कार्यालय, जिल्हाधिकारी, एमएमआरडीए आणि तहसीलदार यांच्याकडे वारंवार तक्रारी करण्यात आल्या आहेत. तसेच मोर्चे काढूनही दखल घेतली जात नसल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला. दुसरीकडे, बेस्ट रोडवेजच्या मालकांच्या एका अर्जावर मात्र पोलीस यंत्रणा तत्परतेने हालचाल करते, अशी टीका आंदोलकांनी केली.
शेतकरी आणि ग्रामस्थांच्या मूलभूत सुविधांसाठी रस्ते तयार करण्यास आपला विरोध नसून, व्यावसायिक फायद्यासाठी शेतजमिनींमधून कथित बेकायदेशीर रस्ते तयार करण्यास विरोध असल्याचे ॲड. पर्जन्य म्हात्रे यांनी स्पष्ट केले. न्यायालयाचा आदेश प्राप्त झाल्यानंतरच जमीन मोजणीची कार्यवाही करावी, अशी मागणी त्यांनी केली. दरम्यान, शेतकऱ्यांच्या जमिनीतील कथित अनधिकृत रस्ते आणि वेअरहाऊस हटवावेत, तसेच त्यांच्या जागेत उभी केलेली कंटेनर व अन्य वाहने तातडीने काढावीत, अशी मागणी कोप्रोलीतील शेतकऱ्यांनी केली आहे. न्यायालयीन आदेशांचे पालन आणि शेतकऱ्यांच्या जमिनींचे संरक्षण याबाबत प्रशासनाने तातडीने भूमिका स्पष्ट करावी, अशी मागणीही जोर धरत आहे.
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai