पनवेल महापालिकेच्या सभेत विविध विकासकामांना मंजुरी
- by Aajchi Navi Mumbai
- Nov 20, 2026
- 29
कर्मचाऱ्यांसाठी कॅशलेस आरोग्य विमा; महिला स्वच्छतेसाठी सॅनिटरी पॅड व्हेंडिंग मशीन खरेदीचा निर्णय
पनवेल : पनवेल महानगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेत विविध विकासकामांसह नागरिकांच्या आरोग्य, स्वच्छता आणि मूलभूत सुविधांशी संबंधित महत्त्वपूर्ण विषयांना मंजुरी देण्यात आली. महापालिका अधिकारी व कर्मचाऱ्यांना कुटुंबासह कॅशलेस वैद्यकीय आरोग्य विमा लागू करणे, महिलांसाठी सॅनिटरी पॅड व्हेंडिंग मशीन व इन्सिनेटर खरेदी करणे, तसेच शहरातील विविध भागांतील रस्त्यांचे काँक्रीटीकरण आणि पावसाळी गटारांची कामे करण्याच्या प्रस्तावांचा यात समावेश आहे. मात्र, कार्यकारी अभियंता (स्थापत्य) वर्ग-1 या पदावर तात्पुरत्या स्वरूपात पदोन्नती देण्याचा प्रस्ताव नामंजूर करण्यात आला.
महापालिकेची सर्वसाधारण सभा क्रमांक 14 गुरुवारी (19 नोव्हेंबर) आद्य क्रांतीवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहात महापौर नितीन पाटील यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. यावेळी उपमहापौर प्रमिला पाटील, सचिव नानासाहेब कामठे, अतिरिक्त आयुक्त गणेश शेटे आदी उपस्थित होते. सभेत विविध विषयांवर चर्चा करून त्यांना मंजुरी देण्यात आली. महापालिकेतील कंत्राटी कर्मचारी वगळता सर्व अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना त्यांच्या कुटुंबीयांसह कॅशलेस वैद्यकीय आरोग्य विमा सुविधा सुरू करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला. तसेच सेवा संकल्प अभियानांतर्गत महापालिकेच्या प्रभाग समिती क्षेत्रासह 29 गावे आणि त्यांमधील वाड्या-वस्त्यांवर वैद्यकीय आरोग्य शिबिरे आयोजित करण्यास आर्थिक व प्रशासकीय मान्यता देण्यात आली. महिलांच्या मासिक पाळीतील स्वच्छतेच्या दृष्टीने महापालिका क्षेत्रातील महिला व मुलींसाठी सॅनिटरी पॅड व्हेंडिंग मशीन आणि इन्सिनेटर मशीन खरेदी करण्याच्या प्रस्तावालाही मंजुरी मिळाली. याशिवाय हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे नागरी लोककल्याण अभियानांतर्गत मराठी शाळांमधील शौचालयांची दुरुस्ती, सुधारणा व नूतनीकरण करण्याच्या कामास मान्यता देण्यात आली.
शहरातील पायाभूत सुविधांच्या विकासालाही सभेत प्राधान्य देण्यात आले. पनवेल शहरातील प्रभाग क्रमांक 19 मधील मार्केट यार्ड परिसरात रस्त्यांचे काँक्रीटीकरण आणि पावसाळी गटारांची कामे करण्यास मंजुरी देण्यात आली. तसेच नवीन पनवेल पूर्व येथील सेक्टर 19 मधील क्रिकेट मैदानावर नवीन हिरवळ विकसित करणे आणि त्यासाठी आवश्यक यंत्रसामग्री खरेदी करण्याच्या प्रस्तावास मान्यता देण्यात आली. खांदा कॉलनीतील प्रभाग क्रमांक 15 मध्ये सेक्टर 10 ते सेक्टर 11 तसेच सेक्टर 8 ते सेक्टर 6 दरम्यान रस्त्यांचे काँक्रीटीकरण व पावसाळी गटार बांधण्याच्या कामांना मंजुरी देण्यात आली. पनवेल शहरातील साईबाबा मंदिर ते हॉटेल आर्या (स्टेशन रोड), संत सावतामाळी हॉल परिसर तसेच इच्छापूर्ती गणेश मंदिर ते भाग्यलक्ष्मी अपार्टमेंटपर्यंत रस्त्यांचे काँक्रीटीकरण करण्याचा मार्गही मोकळा झाला.
ग्रामीण भागातील सुविधांचाही विचार करण्यात आला. पालेखुर्द येथील जिल्हा परिषद मराठी शाळा ते चिंध्रण गावाकडे जाणाऱ्या स्मशानभूमीपर्यंत रस्त्याचे काँक्रीटीकरण करण्यास मंजुरी देण्यात आली. खारघरमधील ओवे पेठ गावात नवीन व्यायामशाळा बांधण्याच्या प्रस्तावालाही हिरवा कंदील मिळाला. याशिवाय नवीन महापालिका मुख्यालयासमोर संविधान स्तंभ उभारण्याच्या कामास प्रशासकीय मंजुरी देण्यात आली.एकूणच, आरोग्य सुविधा, महिला स्वच्छता, शैक्षणिक सुविधांमधील सुधारणा आणि शहरासह ग्रामीण भागातील रस्ते विकास अशा विविध विषयांवर सभेत निर्णय घेण्यात आले.
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai