सीबीएसई शाळेला माजी महापौर कै. तुकाराम नाईक यांचे नाव
- by Aajchi Navi Mumbai
- Nov 20, 2026
- 27
वनमंत्री गणेश नाईक यांच्या हस्ते नामकरण सोहळा; महापालिकेच्या जडणघडणीत योगदानाचा गौरव
नवी मुंबई : नवी मुंबई महानगरपालिकेच्या कोपरखैरणे सेक्टर 11 येथील सीबीएसई शाळा क्रमांक 94 ला माजी महापौर कै. तुकाराम रामचंद्र नाईक यांचे नाव देण्यात आले आहे. महाराष्ट्राचे वनमंत्री गणेश नाईक यांच्या हस्ते या शाळेचा नामकरण सोहळा पार पडला. महापालिकेच्या जडणघडणीत आणि नवी मुंबईच्या विकासात कै. तुकाराम नाईक यांनी दिलेल्या योगदानाच्या स्मरणार्थ हा नामकरण निर्णय घेण्यात आला.
सभागृहनेते तथा स्थानिक नगरसेवक सागर नाईक यांनी यासंदर्भातील नामकरण प्रस्ताव मांडला होता. महापालिकेच्या सर्वसाधारण सभेने त्याला मंजुरी दिल्यानंतर सेक्टर 11 मधील शाळेला ‘कै. तुकाराम रामचंद्र नाईक विद्यालय’ असे नाव देण्यात आले. कै. तुकाराम नाईक यांनी नवी मुंबई महापालिकेच्या स्थापनेपासून शहराच्या जडणघडणीत महत्त्वपूर्ण भूमिका बजावली होती. 1998-99 मध्ये त्यांनी महापालिकेचे सभागृहनेते म्हणून काम पाहिले, तर 1999-2000 या कालावधीत महापौरपदाची जबाबदारी सांभाळली. त्यांच्या महापौरपदाच्या कार्यकाळात नवी मुंबईच्या विकासासंदर्भात अनेक महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले. महाराष्ट्र महापौर परिषदेचे अध्यक्षपद भूषविताना त्यांनी नवी मुंबईत राज्यातील विविध शहरांच्या महापौरांचे राज्यस्तरीय अधिवेशनही आयोजित केले होते.
या नामकरण सोहळ्याला माजी खासदार संजीव नाईक, माजी आमदार संदीप नाईक, उपमहापौर दशरथ भगत, स्थायी समिती सभापती अशोक पाटील, सभागृहनेते सागर नाईक, माजी महापौर तथा नगरसेवक जयवंत सुतार, आरोग्य समिती सभापती डॉ. जयाजी नाथ, प्रभाग समिती अध्यक्ष चंद्रभागा मोरे, पाणीपुरवठा समिती सभापती रविकांत पाटील, नगरसेवक मुनावर पटेल, वैष्णवी नाईक, अदिती नाईक, संदीप म्हात्रे, डी. आर. पाटील, शिरीष पाटील, मीनाक्षी पाटील यांच्यासह माजी नगरसेवक आणि विविध पदाधिकारी उपस्थित होते.यावेळी परिमंडळ-2 चे उपआयुक्त संजय शिंदे, कोपरखैरणे विभागाच्या सहाय्यक आयुक्त साधना पाटील, शिक्षणाधिकारी अशोक कडुस, जनसंपर्क अधिकारी महेंद्र कोंडे आणि उपअभियंता संतोष शिकतोडे उपस्थित होते. नगरसेविका वैष्णवी वैभव नाईक यांनी उपस्थितांचे स्वागत केले. या सोहळ्याला नागरिकांचीही मोठ्या संख्येने उपस्थिती होती.
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai