राज्यात आज 170 नवे कोरोना बाधित

मुंबई : राज्यात आज कोरोनाच्या 170 नवीन रुग्णांची नोंद झाली. त्यामुळे राज्यातील कोरोनाबाधितांची संख्या 2801 वर पोहोचली आहे. यात सर्वाधिक मुंबईत 66 जणांची नोंद झाली. तर, त्याखालोखाल 44 रुग्ण पुणे महापालिका हद्दीत सापडले आहेत. (ही आकडेवारी दुपारी पावणेतीन पर्यंतची आहे) मुंबईतील कोरोना हॉटस्पॉटची संख्या सातवर गेली आहे. एकूण रूग्णांपैकी सात वॉर्डमध्येच 50 टक्क्यांहून अधिक रूग्णांची नोंद करण्यात आली. 

सध्या राज्यात 67 हजार 701 व्यक्ती घरगुती अलगीकरणात (होम क्वॉरंटाईन) असून 5647 जण संस्थात्मक क्वॉरंटाईनमध्ये आहेत. आतापर्यंत अडीचशेहून अधिक कोरोना बाधित रूग्णांना बरे झाल्यानंतर घरी सोडण्यात आले आहे. कोरोनाचा संसर्ग वाढू नये यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आधीच 30 एप्रिलपर्यंत लॉकडाऊन वाढवण्याची घोषणा केली होती. त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तीन मे पर्यंत लॉकडाऊन वाढवले आहे. मात्र, आता कोरोना बाधित रुग्णांच्या संख्येनुसार राज्यातील जिल्ह्यात झोन करण्यात येणार आहे.