पनवेल रेड झोनमध्येच

पनवेल : कोरोनाच्या पार्श्‍वभुमीवर केंद्रसरकारने जिल्हानिहाय झोन तयार केले आहेत. यामधील रेड झोन मधील जिल्ह्यात निर्बंध कायम राहणार आहेत. मात्र पनवेल तालुका हा रायगड जिल्ह्यात येतो. रायगड जिल्हा ऑरेंज झोनमध्ये असला तरी पनवेल पालिका क्षेत्रात रेड झोनची नियमावली कायम असणार आहे. 

पनवेल महानगर पालिका क्षेत्रात रुग्णांचा आकडा 90 पर्यंत पोहचला आहे. यामध्ये ग्रामीण भागाचे 12 सहभागी केल्यास एकट्या पनवेल तालुक्यात बाधितांचा आकडा 100 पेक्षा जात असल्याने पनवेल मध्ये रेड झोनचे निर्बंध असणार असल्याची माहिती पनवेल महानगरपालिका आयुक्त गणेश देशमुख यांनी दिली. पनवेल तालुका रायगड जिल्ह्यात येतो. रायगड जिल्ह्याचा सहभाग ऑरेंज झोनमध्ये करण्यात आला आहे. त्यामुळे पनवेल मधील निर्बंध शिथिल होणार असल्याची चर्चा नागरिकांमध्ये आहे. पनवेल पालिका क्षेत्रातील रुग्णांची वाढती आकडेवारी लक्षात घेता यापूर्वीच पोलीस प्रशासनाने पनवेल सर्वच ठिकाणी चोख बंदोबस्त ठेवला आहे. पनवेलमध्ये खारघर, नवीन पनवेल, कामोठे शहरात मोठ्या प्रमाणात कोरोना बाधित रुग्णांचा आकडा वाढत चालला आहे. जिल्ह्यातील उर्वरित तालुक्यांच्या तुलनेत एकट्या पनवेल मध्ये 90 टक्के कोविड 19 चे रुग्ण आढळल्याने पनवेलकरांसाठी रेड झोनचे निर्बंध कायम असणार आहेत. आजच्या घडीला शेकडो नागरिकांचे कोविड चे नमुने प्रतीक्षेत असल्याने दुर्दैवाने पनवेल परिसरात रुग्णांची वाढ होण्याची शक्यता आहे. याकरिता प्रशासनाने सतर्कता म्हणुन रेड झोनचे निर्बंध कायम ठेवले आहेत.