कोपरखैरणेमध्ये पोलीसांचा जनजागृतीपर लाँगमार्च

नवी मुंबई ः महानगरपालिका क्षेत्रातील कोरोना बाधीतांची संख्या कमी करण्यासाठी सर्व पातळीवर प्रयत्न करण्यात येत असून कोपरखैरणे व तुर्भे विभागातील कोरोना बाधीतांची मोठी संख्या लक्षात घेता शुक्रवारी नवी मुंबई पोलीस आयुक्तालयामार्फत कोपरखैरणे परिसरात लाँगमार्च काढण्यात आला. यामध्ये कोरोनाशी जिद्दीने लढणार्‍या पोलीस व आरोग्य विभागातील अधिकारी, कर्मचारी यांचे मनोबल वाढविण्यासाठी महापालिका आयुक्त अण्णासाहेब मिसाळ या लाँगमार्चमध्ये सहभागी झाले होते.

लॉकडाऊनच्या काळात नागरिकांनी घरातच थांबून संसर्गाव्दारे पसरणारी कोरोनाची वाढती साखळी खंडीत करावी असे आवाहन लाँगमार्चमध्ये सहभागी पोलीसांनी केले. या लाँगमार्चमध्ये परिमंडळ 1 चे पोलीस उपायुक्त पंकज डहाणे व परिमंडळ 2 चे महापालिका उपायुक्त डॉ. अमरिश पटनिगिरे सहभागी झाले होते.