केरूमाता लेणी नष्ट केल्याप्रकरणी ठिय्या आंदोलन

कारवाई करणार्‍यांवर गुन्हे दाखल करण्याची मागणी  

पनवेेल : केरूमाता लेणी परिसरात सिडकोने केलेल्या कारवाईच्या निषेधार्थ पनवेेल पोलीस स्टेशनसमोर जोरदार आंदोलन करण्यात आले. सिडकोच्या कारवाईमुळे बौद्ध समाजाच्या भावना दुखावल्या असून लेणी नष्ट करणार्‍या गुन्हेगारांवर व मुख्य आरोपी सिडको यांच्या विरोधात गुन्हा दाखल करावा, यासाठी आरपीआयचे जिल्हाध्यक्ष जगदीश गायकवाड यांनी सर्व जातीभेद, पक्षभेद विसरून बुध्दाला माननार्‍यांनी मोठ्या संख्येने पनवेल शहर पोलिस ठाण्यात येण्याचे आवाहन केले होते. त्यानुसार मोठ्या संख्येने पनवेल शहर पोलीस स्टेशनसमोर बौद्ध अनुयायी एकत्रीत झाले होता. 

गेल्या काही महिन्यांपासून केरूमाता लेणी वाचवण्यासाठी शेतकरी प्रबोधिनीचे अध्यक्ष राजाराम पाटील यांच्या पुढाकाराने सिडको विरोधात आंदोलन चालू होते. या आंदोलनाला विविध सामाजिक संस्था संघटना, विविध समाजबांधवांचा तसेच बौद्ध अनुयायांचा मोठा पाठिंबा मिळत होता. अशातच सिडकोने दोन दिवसांपूर्वी रात्रीच्या अंधाराचा फायदा घेत जेसीबी पोकलेनच्या साह्याने केरूमाता लेणी संपूर्ण जमीनदोस्त करून मूळ ढाचा देखील नष्ट केला. इतकेच नाही तर तेथे कोणतेही आवश्यक पुरावे उपलब्ध होऊ नये म्हणून ते सर्व परस्पर डंपरच्या सहाय्याने बाहेर कुठेतरी नेण्यात आले. सिडकोच्या या कारवाई विरोधात जोरदार आंदोलन पनवेल पोलीस स्टेशनसमोर जोरदार आंदोलन करण्यात आले. यावेळी काँग्रेसचे मागासवर्गीय सेलचे रायगड जिल्हा अध्यक्ष मोहन गायकवाड, नगरसेविका विद्या गायकवाड, पिपल्स एज्युकेशन सोसायटी बेलापूर बी.बी.पवार, नवी मुंबई आरपीआयचे नेते महेश खरे इत्यादी उपस्थित होते. आंदोलकांचा दबाव लक्षात घेत पोलिसांनी देखील त्यांची तक्रार नोंदवून येत्या दोन दिवसात या विरोधात चौकशी करून योग्य ती कार्यवाही करण्यात येईल, असे आश्‍वासन देण्यात आल्यामुळे तात्पुरत्या स्वरूपात आंदोलक शांत झाले आहेत. परंतु गुन्हेगारांवर कारवाई न झाल्यास येत्या 21 तारखेला पुन्हा एकदा सिडको विरोधात आंदोलन करण्यात येईल, असे यावेळी जगदीश गायकवाड यांनी स्पष्ट केले आहे. सिडको विरोत विनापरवानगी आंदोलन केल्याने पोलिस आयुक्तांच्या मनाई आदेशाचा भंग झाल्याने पनवेल शहर पोलीसांनी आंदोलकांवर गुन्हे दाखल केले आहेत.