Breaking News
सातारा : मराठी सुप्रसिद्ध अभिनेत्री आशालता वाबगावकर यांचं आज पहाटे कोरोनाच्या संसर्गामुळे निधन झालं आहे. ’आई माझी काळूबाई’ या मालिकेतील 27 जणांना कोरोनाची लागण झाली. कोरोनाची लागण झाल्यामुळे आशालता यांची प्रकृती चिंताजनक होती. त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आलं होतं. पण अखेर आज त्यांनी अखेरचा श्वास घेतला.
गेले चार दिवस आशालता वाबगावकर यांच्यावर सातार्यात उपचार सुरू होते. मालिकेच्या सेटवर त्यांना कोरोनाची लागण झाली होती. अखेर आज पहाटे त्यांची प्राणज्योत मालवली. जवळपास 40 हून अधिक वर्षांसाठी त्या रंगभूमी, सिनेमा आणि मालिकांमधून काम करत होत्या. तसेच नाट्यसंगीतामधूनही त्यांनी आपली एक वेगळी ओळख निर्माण केली. आशालता या मूळच्या गोव्याच्या असून, त्यांनी कोकणी आणि मराठी चित्रपटांच्या माध्यमातून अभिनयाला सुरुवात केली. त्यांनी आत्तापर्यंत मराठी आणि हिंदी अशा सुमारे 100 हून अधिक चित्रपटांमधून काम केले आहे. ’गुंतता हृदय हे, रायगडाला जेव्हा जाग येते, चिन्ना आणि महानंदा’ यामध्ये त्यांनी प्रमुख भूमिका साकारल्या. संगीत नाटक मत्स्यगंधाच्या माध्यमातून त्यांनी आपल्या नाटकातील कारर्कीदीस सुरुवात केली. तर बासू चटर्जी यांच्या ’अपने पराये’या चित्रपटाच्या माध्यमातून त्यांनी हिंदी चित्रपटसृष्टीत पदार्पण केले. याच चित्रपटातील सहायक अभिनेत्रीच्या भूमिकेसाठी त्यांना फिल्म फेअरसाठी उत्कृष्ट सहायक अभिनेत्रीचे नामांकनही मिळालं होतं. मराठी चित्रपट सृष्टीत ’उंबरठा, सूत्रधार, नवरी मिळे नवर्याला, वहिनीची माया, माहेरची साडी’ हे त्यांचे गाजलेले चित्रपट होते.
गेल्या महिन्याभरापासून सातार्यात ’माझी आई काळुबाई’ मालिकेचं चित्रिकरण सुरू होते. या सेटवरच्या तब्बल 27 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. शिवाय, या मालिकेतील महत्वाच्या भूमिकेत असणार्या ज्येष्ठ अभिनेत्री आशालता वाबगावकर यांनाही लागण झाली होती.
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai