Breaking News
सात दिवसांत अहवाल देण्याचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचे निर्देश
नवी दिल्ली : उत्तर प्रदेशातील हाथरसमध्ये एका 19 वर्षीय तरुणीवर सामूहिक बलात्कार करण्यात आला, गंभीर जखमी झालेल्या तरुणीचा मंगळवारी उपचारादरम्यान मृत्यू झाला. या घटनेनं संपूर्ण देशाला हादरून सोडले आहे. या प्रकरणाची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गंभीर दखल घेतली आहे. दोषींवर कठोर कारवाई करण्याबाबत मोदी यांनी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना सांगितले आहे. याप्रकरणी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी तीन सदस्यीय डखढ गठित केली आहे.
4 नराधमांनी बलात्कार केल्यानंतर तरुणीची जीभ कापली, पाठीचा कणा तोडला जेणेकरून मदतीसाठी तिला कुठे जाता येणार नाही. 14 दिवसांच्या लढाईनंतर मंगळवारी पीडित तरुणीचा मृत्यू झाला. या प्रकरणामुळे उत्तर प्रदेशच्या कायदा व सुव्यवस्थेवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. हाथरस प्रकरणात यूपी पोलिसांवर अनेक आरोप केले जात आहे. रात्री उशिरा पीडितेचा मृतदेह तिच्या गावी पोहोचला. मात्र यावेळी पोलिसांनी कुटुंबियांशिवाय जबरदस्तीने पीडितेवर अंतिम संस्कार केल्याचा आरोप कुटुंबीयांनी केला आहे. पोलिसांनी मृतदेह घरी नेण्याची परवानगीही दिली नसल्याचे कुटुंबियांचे म्हणणे आहे. मात्र, या मुलीवर तिच्या नातेवाईकांच्या संमतीनेच अंत्यसंस्कार केल्याचा दावा पोलिसांनी केला आहे.
या प्रकरणी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी तीन सदस्यीय डखढ गठित केली आहे. उत्तरप्रदेशचे गृहसचिव भगवान स्वरूप यांच्या अध्यक्षतेखाली यासाठी त्रिसदस्यीय एसआयटी स्थापन करण्यात आली आहे. डीआयजी चंद्र प्रकाश आणि आयपीएस पूनम यात सदस्य असतील. या प्रकरणाचा सविस्तर अहवाल सात दिवसांत देण्याचे निर्देश दिले आहेत. एवढेच नाही तर प्रकरण फास्ट ट्रॅक कोर्टात नेऊन आरोपींना लवकरात लवकर शिक्षा देण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. दरम्यान, प्रकरणात चारही आरोपींना यापूर्वीच अटक करण्यात आली असून तुरुंगात पाठविण्यात आले आहे.
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai