सकाळपासून प्रवासाची परवानगी हवी

महिला प्रवाशी वर्गाची मागणी

मुंबई : 21 ऑक्टोबरपासून महिलांसाठी लोकल प्रवासाला मुभा देण्यात आल्याने महिला प्रवासीवर्गाला दिलासा मिळाला आहे.  तब्बल 7 महिन्यानंतर लोकल प्रवास करायला मिळत असल्याचा आनंद या महिलांच्या चेहर्‍यावर दिसत होता. मात्र लोकल प्रवासाची वेळ बदलण्याची आग्रही मागणीही यावेळी मोठ्या प्रमाणात व्यक्त करण्यात आली. ऑफीसलाही लोकलने जाता यावे यासाठी सकाळपासून प्रवासाची परवानगी देण्याची मागणी होत आहे. 

लोकल प्रवास सुरु झाल्याने पहिल्या दिवशी बर्‍याच रेल्वे स्थानकात महिलांनी मोठी गर्दी केली होती. तिकीट काउंटर, रेल्वे प्लॅटफॉर्म भरलेला दिसू लागला. गेल्या 7 ते 8 महिन्यांपासून महिलांसाठी बंद असलेली लोकलसेवा आता सुरु झाल्याने बस मधून सहा-सात तास प्रवास करत हाल-अपेष्टा सहन करणार्‍या महिलांनी आनंद व्यक्त केलेला आहे.

कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर लागू करण्यात आलेल्या लॉकडाऊनच्या काळानंतर आता अनलॉकच्या टप्प्याअंतर्गत मुंबईत अखेर सर्व महिलांना सरसकट लोकल प्रवासाची मुभा देण्यात आली आहे. काही दिवसांपूर्वीच नवरात्रोत्सवाचं औचित्य साधच सर्व महिलांसाठी लोकल सुरु करण्यासाठी महाविकास आघाडी सरकारने पुढाकार घेतला होता. पण, यामध्ये काही अडचणी आल्या  होत्या. अखेर या अडचणी दूर झाल्या असून, सर्व महिलांसाठी लोकल प्रवास सुरु झाला. मात्र केवळ 11 तो 3 आणि सायंकाळी 7 ते 12 पर्यंतच महिलांना प्रवास करण्यास मुभा आहे. या वेळेत बदल करण्याची मागणी महिला प्रवाशी वर्गाकडून होत आहे. सकाळी ऑफीसलाही लोकलने जाता यावे म्हणून सकाळपासून प्रवासाची परवानगी देण्याची मागणी महिला प्रवाशी वर्गाकडून होत आहे.