Breaking News
नवी दिल्ली ः कृषी कायद्यांविरोधात गेल्या 18 दिवसांपासून दिल्लीच्या वेशीवर शेतकर्यांचं आंदोलन सुरु आहे. आज या आंदोलनाचा एकोणवीसावा दिवस आहे. सोमवारी सर्व शेतकरी संघटनांचे अध्यक्ष उपोषणाला बसले आहेत. शेतकर्यांचं हे उपोषण संध्याकाळी पाच वाजेपर्यंत सुरु राहणार आहे. यादरम्यान, सर्व जिल्ह्यांच्या मुख्यालयांच्या ठिकाणी धरणं आंदोलनही केलं जाणार आहे.
या उपोषणासाठी दिल्ली बॉर्डरजवळ आणखी 10 हजार शेतकरी पोहोचले आहेत. त्यामुळे आज दिल्लीत मोठ्या आंदोलनाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. या आंदोलनाला दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल हे देखील बसणार आहेत. शेतकरी नेते गुरनाम लिंब चढूनी म्हणाले की, सोमवारी सकाळी आठ वाजल्यापासून ते संध्याकाळी पाच वाजेपर्यंत हे उपोषण 14 डिसेंबरपासून आंदोलन अधिक तीव्र करण्याच्याच योजनेचा हिस्सा आहे. चढूनी यांनी सिंघू बॉर्डरवर पत्रकार परिषद घेऊन सांगितलं की, सर्व शेतकरी नेत आपापल्या ठिकाणी उपोषण करणार आहेत. काही संघटना आंदोलन मागे घेत आहेत आणि सांगत आहेत की, ते सरकारने लागू केलेल्या नव्या कृषी कायद्यांच्या बाजूने आहेत. आम्ही स्पष्ट करतो की, ते आमच्यासोबत नाहीत. त्यांचे सरकारसोबत सलोख्याचे संबंध आहेत. त्यांनी आमचं आंदोलन कमकुवत करण्याचं षड्यंत्र रचलं आहे. सरकार शेतकर्यांचं हे आंदोलन संपवण्याचा कट रचत आहे. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी घोषणा केली आहे की, ते शेतकर्यांसोबत सोमवारी एक दिवसाचा उपवास ठेवणार आहेत. त्यांनी आम आदमी पार्टीच्या कार्यकर्त्यांना आणि सर्व समर्थकांना एक दिवसाचा उपवास करण्याचं आवाहन केलं आहे. त्याचसोबतच त्यांनी केंद्र सरकारवर निशाणा साधला आणि म्हणाले की, काही केंद्र सरकारचे मंत्री आणि भाजप नेते म्हणत आहेत की, शेतकरी आंदोलन राष्ट्राच्या विरोधी आहे. अनेक माजी सैनिक, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय खेळाडू, गायक, दिग्गज, डॉक्टर, व्यापारी शेतकर्यांचं समर्थन करत आहेत. भाजपला विचारायचं आहे की, मग हे सर्व लोक देशद्रोही आहेत का? शेतकरी नेते शिवकुमार कक्का म्हणाले की, सरकारी एजेन्सी शेतकर्यांना दिल्ली पोहोचण्यापासून रोखत आहे. परंतु, जोपर्यंत त्यांच्या मागण्या मान्य होत नाहीत, तोपर्यंत आंदोलन सुरुच राहणार आहेत. आमचा हेतू स्पष्ट आहे. आमची मागणी आहे की, तिनही कृषी कायदे रद्द करावे. या आंदोलनात सहभागी असलेले सर्व शेतकरी संघटना एकत्र आहेत. शेतकरी नेते संदीप गिड्डी म्हणाले की, 19 डिसेंबरपासून शेतकर्यांचं अनिश्चित काळासाठी केलं जाणारं उपोषण रद्द करण्यात आलं आहे. त्याऐवजी सर्व शेतकरी सोमवारी दिवसभर उपोषणाला बसणार आहेत. एकीकडे उपोषणाला सुरुवात होणार असून दुसरीकडे उत्तरप्रदेश, हरियाणा, उत्तराखंडचे शेतकरी संगठन केंद्र सरकारसोबत वार्ताच्या तयारीत आहेत. शेतकरी संयुक्त मोर्चाचे भाकियू (भानू) आणि वीएम सिंह यांनी बाहेर पडून सरकारसोबत चर्चा करण्यास तयारी दर्शविली आहे. त्यामुळे आता तरी सकारात्मक चर्चा होणार का? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai