8 तासापेक्षा जास्तीच्या कामांसाठी मिळणार अतिरिक्त पगार

नवी दिल्ली ः 8 तासांपेक्षा जास्त काम केल्यावर आता कर्मचार्‍यांना ओव्हरटाईम देण्यास सरकार तयार आहे. नवीन कामगार कायद्यांबाबत सरकार नवीन आराखडा तयार करणार आहे. माध्यमांच्या वृत्तानुसार सरकार कामाचे तास मर्यादित ठेवण्याचा विचार करीत आहे. यासह, जर अधिक तास काम केले गेले तर त्यासाठी ओव्हरटाईम देखील द्यावे लागेल. स्टॅण्डर्ड नियम सध्या 8 तास काम आहे. याच्या आधारे कर्मचार्‍याचा पगार निश्‍चित केला जातो.

महत्त्वाचे म्हणजे 2019 मध्ये सरकारने नवीन वेतन कोड पास केला, ज्यामध्ये असे म्हटले होते की, कामकाजाचे तास 8 किंवा 12 तास असतील. त्यानंतर, याबद्दल संभ्रम आहे. नवीन कामगार कायदा कर्मचार्‍यांना 12 तास काम करू देतो असा गैरसमज होता, असे सूत्रांनी सांगितले. हा गैरसमज दूर करण्यासाठी हे पाऊल उचलण्यात आले आहे.

15 ते 30 मिनिटांच्या अतिरिक्त कामाला ओव्हरटाईम मानले जाईल

फॅक्टरी अ‍ॅक्टनुसार कंपन्या आपल्याकडे काम करणार्‍यांना 9 तासांपेक्षा जास्त काम देतात, परंतु त्यांना ओव्हरटाईम देत नाहीत. कारण सध्याच्या सिस्टीमनुसार श्रम जर आपल्या कामाच्या तासांनंतर 30 मिनिटांपेक्षा कमी वेळ देत असेल तर ते ओव्हरटाईम मानले जाणार नाही. परंतु नवीन कामगार नियमांनुसार आता 15 मिनिट ते 30 मिनिटांचा कालावधी अर्धा तास जादा कामाचा कालावधी म्हणून विचार केला जाईल.