शिवसैनिकांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश

नवी मुंबई : नेरूळ येथील शिवसेनेचे उपशाखाप्रमुख हेमंत पोमण तसेच त्यांचे समर्थक व शेकडो शिवसेना कार्यकर्त्यांनी बेलापूर विधानसभा क्षेत्राच्या आमदार मंदाताई म्हात्रे व नवी मुंबई भाजपा जिल्हाध्यक्ष डॉ.रामचंद्र घरत यांच्या उपस्थितीत भारतीय जनता पार्टी पक्षामध्ये पक्षप्रवेश केला. 

शिवसेनेमध्ये असणारी एकाधिकारशाही, सामान्य कार्यकर्त्यांना देण्यात येणारी वागणूक यामुळे पक्ष सोडण्याचा निर्णय घेतला असून भारतीय जनता पक्षाची विचारधारा, आमदार मंदाताई म्हात्रे यांचे नेतृत्व, जिल्हाध्यक्ष रामचंद्र घरत, युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष दत्ता घंगाळे व मंडळ अध्यक्ष राजू तिकोणे यांचे संघटन या सर्व गोष्टींनी प्रभावित होऊन भारतीय जनता पक्षात प्रवेश घेतला असल्याचे हेमंत पोमण यांनी सांगितले. यावेळी आमदार मंदाताई म्हात्रे यांनी सांगितले कि, संपूर्ण नवी मुंबईमध्ये भाजपामय वातावरण निर्माण झाल्यामुळे विविध पक्षातील पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी भारतीय जनता पक्षात पक्षप्रवेश करणे सुरु केले असून केवळ राजकीय पक्षातीलच नव्हे तर नागरिकही भारतीय जनता पक्षाचे सदस्य बनत चालले आहेत. पक्षाने माझ्या नेतृत्वाची दखल घेऊन माझ्यावर जबाबदारी दिली आहे, ती मी समर्थपणे पार पडून नवी मुंबई महानगरपालिकेवर भारतीय जनता पक्षाचा झेंडा रोवणार असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला.  

यावेळी भाजपा जिल्हाध्यक्ष रामचंद्र घरत यांनी सांगितले कि, गेली 20 वर्षे शिवसेना पक्षासाठी अथक कार्य करूनही पक्षश्रेष्ठी दाद देत नसल्याने नेरूळ प्रभाग क्रमांक 87 मधील उपशाखाप्रमुख हेमंत पोमण यांनी त्यांच्या शेकडो कार्यकर्त्यांसह आ. मंदाताई म्हात्रे यांच्या नेतृत्वात भारतीय जनता पार्टीत पक्षप्रवेश केला. भारतीय जनता पार्टीला हेमंत पोमण यांच्या रूपाने एक युवा नेतृत्व मिळाले असून पक्षश्रेष्ठी नक्कीच याची दखल घेईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. यावेळी युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष दत्ता घंगाळे, युवती अध्यक्ष सुहासिनी नायडू, उत्तर भारतीय सेलचे अध्यक्ष विनोद शाह उपस्थित होते.